म. ह. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ. राजेंद्र पोंदे
म. ह. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ. राजेंद्र पोंदे
कोल्हापूर:मारुती फाळके
तिसंगी (ता. गगनबावडा ) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. राजेंद्र पोंदे यांची नुकतीच निवड झालेली आहे. यावेळी ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.जी.शिंदे,सचिव स्वप्नील शिंदे,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एस. पडवळ यांच्या हस्ते त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रा. डॉ. पोंदे गेली तीस वर्षे अध्यापन क्षेत्रात काम करत आहेत.त्यांनी या अगोदर विलिंग्डन महाविद्यालय,सांगली येथे इंग्रजी विभागप्रमुख, उपप्राचार्य म्हणून काम केलेले आहे.
प्राचार्य डॉ. पोंदे यांचे साहित्य,कला, क्रीडा वन्यजीवन,पर्यावरण या विषयावर आत्तापर्यंत दोनशेपेक्षा जास्त लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच इंग्रजी साहित्य आणि पर्यावरण या विषयावरील अठरा शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.त्यांची एकूण सात पुस्तके आहेत. त्यामध्ये ‘चौफेर’हे पुस्तक माणूस, निसर्ग, खेळ, पर्यावरण यावर आधारित आहे. त्यांनी एम.फिलच्या प्रबंधात प्रसिद्ध शिकारी व लेखक जिम कॉर्बेटच्या निवडक पुस्तकांचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे तर पीएच.डी.प्रबंधामध्ये जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन यांच्या जंगलकथांचा तौलणिक अभ्यास केला आहे. वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाच्या कामासाठी त्यांनी डब्ल्यू.डब्ल्यू. एफ व वसुंधरा या संस्थांच्या विविध प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.तसेच महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव विभागाच्या विविध उपक्रमामध्येही सहभाग घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विविध समित्यांमध्ये ते सक्रियपणे काम करत आहेत.
प्रा. डॉ.पोंदे यांनी नुकतेच पोर्टलँड (अमेरिका )येथे तसेच गुटनबर्ग विद्यापीठ, जर्मनी व लिस्बन विदयापीठ, पोर्तुगाल येथे विशेष व्याख्याते म्हणून ‘साऊथ एशियन एन्व्हायरमेंटस’ या विषयावर व्याख्यान दिले आहे.
नुकताच त्यांनी म. ह. शिंदे महाविद्यालयात प्राचार्यपदाचा पदभार हाती घेतला आहे.महाविद्यालयात गुणात्मक पातळीबरोबरच नैसर्गिक, पर्यावरणीय आणि साहित्य, सांस्कृतिक पातळीवर महत्त्वपूर्ण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.










