May 14, 2026

५५८ कोटींवर ठेवी,२०%लाभांश,कर्जमर्यादा ४२लाख-चेअरमन बाळ डेळेकर

0
Screenshot_20230916_152127_2--800

५५८ कोटींवर ठेवी,२०%लाभांश,कर्जमर्यादा ४२लाख – चेअरमन बाळ डेळेकर, कोजिमाशि ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.
कोल्हापूर/मारुती फाळके:

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ठेवी ३१ मार्च २०२३ अखेर ५५८ कोटी तीन लाख ७३ हजार ९९५ रुपये इतक्या झाल्या असून सभासदांना यंदा एकूण २० टक्के लाभांश वाटप होईल. यामध्ये पंधरा टक्के लाभांश व पाच टक्के उत्तेजनार्थ मिळून एकूण चार कोटी २५ लाख ५५ हजार १२३ रुपये इतकी रक्कम सभासदांना वितरीत केली जाणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळ डेळेकर यांनी संस्थेच्या ५३ व्या वार्षिक सभेत केले. आगामी काळात पतसंस्थेच्या ठेवी ७०० कोटीपर्यंत वाढवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. तसेच एकूण कर्जमर्यादा ४२ लाखापर्यंत वाढविण्याची घोषणा केली.
कोजिमाशिची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बाळ डेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (१६ सप्टेंबर) झाली. या सभेत बोलताना चेअरमन डेळेकर यांनी “आकस्मिक कर्ज एक लाखावरून दोन लाख व आकस्मिक कर्जाचा व्याजदर साडेनऊ टक्के करण्याची घोषणा केली.” महासैनिक दरबार हॉल येथे सभा झाली. जवळपास अडीच तास सभा झाली. चेअरमन डेळेकर व तज्ञ संचालक लाड यांनी सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली.

दुपारी अडीच वाजता सभेला सुरुवात झाली. संस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला.” पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. कोजिमाशिचे सभासद शिक्षक आहेत. आपण शिक्षक असल्यामुळे सगळ्यांनी शिस्त ठेवली पाहिजे.”असे लाड यांनी प्रारंभीच स्पष्ट केले. संस्थेच्या सभासदासाठी लवकरच कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केला जाईल” असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील अकरा विषय मंजूर करण्यात आले. या सभेत अनेक शिक्षक सभासदांनी, सेवानिवृत्त शिक्षकांना पतसंस्थेचे सभासद करून घ्यावे अशी मागणी केली. यावर सत्ताधारी संचालक मंडळाने सेवानिवृत्तांना सभासद करून घेण्याविषयी वर्षभरात निर्णय घेऊ असे सांगितले. दरम्यान चेअरमन डेळेकर यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ३१’ मार्च २०२३ तारखेला संस्थेचे ९७३७ इतके सभासद आहेत. संस्थेच्या ठेवी ५५८ कोटीवर तर कर्जवाटप ४६१ कोटी ६१ लाखावर आहे. संस्थेचे २०२२-२३ मध्ये वार्षिक उलाढाल २१२३ कोटी ९८ लाख इतकी झाली आहे. संस्थेला ऑडिट अ वर्ग मिळाला आहे. पतसंस्थेतर्फे मयत सभासदांचे १३ कोटी ४७ लाख रुपये इतके कर्ज माफ केले आहे असे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत अशोक मानकर, अशोक कांबळे, प्रा. सुहास जाधव भाग्यश्री काळे, आनंदा कांबळे, शंकर संकपाळ, रवींद्र कांबळे, आदींनी सहभाग घेतला. सभासदांनी कर्जाचा व्याजदर कमी करावा, कोजिमाशी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावेत, थकबाकी वसुली, दीपावलीला वितरीत करण्यात येणाऱ्या भेटवस्तूंची एकूण आकडेवारी व किंमती जाहीर कराव्यात आदी सूचना केल्या. विनोद उत्तेकर यांनी पगारातून कपात होणारी शेअर्स वर्गणीची रक्कम भाग भांडवलात जमा करावी असा मुद्दा मांडला तसेच पतसंस्थेचे १७३ थकबाकीदार असताना केवळ ७१ थकबाकीदार वरच कारवाई का ? असा सवाल केला. यावर लाड यांनी सरसकटपणे सगळ्या थकबाकीदार सभासदवर कारवाई करता येणार नाही‌. नियमानुसार ७१ थकबाकीदारांच्या वर कारवाई केली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

 

सभेला व्हाईस चेअरमन प्रकाश कोकाटे, संचालक अनिल चव्हाण, दत्तात्रय घुगरे, शरद तावदारे, पांडुरंग हळदकर, राजेंद्र रानमाळे, दीपक पाटील श्रीकांत पाटील, उत्तम पाटील, सुभाष खामकर मदन निकम, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील- भडगावकर, अविनाश चौगुले, सचिन शिंदे, श्रीकांत कदम, राजाराम शिंदे, जितेंद्र म्हैशाळे, ऋतुजा पाटील, शितल हिरेमठ व्यासपीठार होते. क्रीडाशिक्षक शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सभेला शिक्षक सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
…………..…… दादासाहेब लाड  तज्ञ संचालक
“गेल्या निवडणुकीवेळी सभासदांना १८ वचने दिली होती. ही सगळी वचने आगामी निवडणुकीपर्यंत पूर्ण केली जातील. कर्जावरील व्याजदर निश्चित कमी केला जाईल. पतसंस्थेचा कारभार उत्तम सुरू आहे. सभासदांच्या सर्वंकष हिताचा विचार करून सत्ताधारी संचालक मंडळ निर्णय घेत आहे. पतसंस्थेमध्ये आम्ही कोणाला विरोधक मानत नाही. सगळे आम्ही एकच आहोत या भावनेने पतसंस्थेचे कामकाज सुरू आहे” – दादासाहेब लाड, तज्ञ संचालक
……………………………….……………
काही अतिउत्साही सभासद……. सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सभा चांगल्या पद्धतीने हाताळली. चेअरमन डेळेकर व तज्ञ संचालक लाड यांनी सभासदांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे सुरुवातीला स्पष्ट केले. त्यानुसार सभासदांना प्रश्न विचारण्याची मुभा व प्रश्नाचे अनुषंगाने समर्पक उत्तरे दिली यामुळे सभा खेळीमेळीत झाली. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे हे विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करत असताना सभागृहात पहिल्या रांगेत बसलेले काही उत्साही शिक्षक सभासद विषयांचे वाचन सुरू होण्याअगोदरच मंजूर मंजूर असा घोष करत होते. हा किरकोळ अपवाद वगळता सभा व्यवस्थित पार पडली. या वार्षिक सभेला एखादा दुसऱ्याचा अपवाद वगळता विरोधी आघाडीच्या शिक्षक सभासदांनी पाठ फिरवली‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!