राजकीय आकसापोटीच शिक्षक बँकेच्या माजी संचालकांवर कारवाई- प्रशांत पोतदार
राजकीय आकसापोटीच शिक्षक बँकेच्या माजी संचालकांवर कारवाई- माजी संचालक प्रशांत पोतदार
दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कर्मचारी भरती प्रकरण
कोल्हापूर टाइम्स 24
कोल्हापूर /प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील भरती सहकार विभागाच्या परवानगीने कामगार संघटनांच्या देखरेखीखाली केली आहे. कामकाज चुकीचे होते, तर सहकार विभागाने गेल्या सात वर्षांत आक्षेप का घेतला नाही? केवळ राजकीय आकसापोटी माजी संचालकांवर कारवाई सुरू असून, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी पत्रकातून दिली.
पत्रकात म्हटले आहे की, कर्मचारी गत साडेचार वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कामगार न्यायालयानेही त्यांना कमी करता येणार नाही, असा अंतरिम आदेश दिला आहे. विद्यमान संचालक सुनील एडके, शिवाजी रोड़ें- पाटील, माजी संचालक सुरेश कांबळे यांनी सहकार न्यायालय क्र. १ यांच्याकडे दाखल केलेला दावा फेटाळला.
सहकार न्यायालयाचा आदेश अंतरिम असताना सहकार विभागाला हस्तक्षेप करता येत नसताना एकतर्फी आदेश दिले. उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस काढली असून त्याला योग्य खुलासा देणार आहोत, पण माजी संचालकांवर कारवाई झाली या आविर्भावात संचालक मंडळ आहे. सभासदांची समंती न घेता अमृत संजीवनी मयत सभासद कल्याण योजना लागू केली. त्याला विरोध केल्याने सभासदांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही उठाठेव सुरू आहे.










