March 24, 2026

रिमझीमणाऱ्या पाऊससरीत रंगली ‘प्रयोदी’ ‘अश्वघोष’ची संगीतमैफल!

0
IMG-20240609-WA0034

रिमझीमणाऱ्या पाऊससरीत रंगली ‘प्रयोदी’ व ‘अश्वघोष’ची संगीतमैफल!

सुमधुर गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
‘प्रयोदी’ व ‘अश्वघोष’ ची संगीत मेजवानी

कोल्हापूर/मारुती फाळके

शाहू स्मारक सभागृहाबाहेर रिमझीमणारा पाऊस आणि सभागृहात रिमझिम गीतांची बरसात या आल्हाददायक वातावरणात अवीट गीतांची मेजवानी सादर करत प्रयोदी फौंडेशन व अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने पाऊसगाण्याची मैफल शनिवारी रात्री शाहू स्मारक भवनमध्ये रंगली. मनात रुंजी घालणारी,ठेका धरायला लावणारी आणि काही काळ भूतकाळातील अबोल भावनांना जागे करणारी एकापेक्षा एक सुरेल सरस हिंदी मराठी पाऊसगाणी सादर करत मैफल रंगली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात ठेका धरायला लावणाऱ्या गाण्याचा आस्वाद घेत गायक कलाकारांना दाद दिली.

निमित्त होते, प्रयोदी फाउंडेशन आणि अश्वघोष आर्ट अँड कलचरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रिमझिम गिरे सावन…’ या सांगीतिक मैफिलीचे!. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमात अम्रपाली कुरणे यांनी गायलेल्या ‘ऋतू हिरवा…’ या गाण्याने कार्यक्रमाला सुरूवात झाली. संग्राम पाटील ‘घन आज बरसे…’ व साई लकडे यांनी ‘झुंजूर मुंजूर…’ ही गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कबीर नाईकनवरे यांनी ‘रिमझिम गिरे सावन,आवोगी जब..बरसेगा सावन,घडी बरसात मे,चिंब पावसानं अशी कर्णमनोहर गीते सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

गायक प्रशांत शिराळे, आम्रपाली कुरणे यांनी गायलेल्या ‘निसर्ग राजा…’ या गाण्यावर तर प्रेक्षक डोलायला लागले. त्यानंतर सई लकडे आणि कबीर नाईकनवरे यांनी ‘चिंब पावसान… हे गीत सादर करताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरकरीत ताल घरला होता. त्यानंतर संग्राम व अम्रपाली यांनी ‘मेघा रे मेघा रे…. रवींद्र इनामदार यांनी ‘आज मौसम बड़ा बेईमान है… अशी गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘गारवा…. निले निले अंबर…’, सावन में लग गई आग…. ‘अधिर मन झाले…’ या गाण्यांचे सादरीकरण केले. हृदयी वसंत फुलताना…’ हे गीत सर्वच गायकांनी एकत्रित सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. ्र

यावेळी संयोजक प्रयोदी फाऊंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. प्रविण कोडोलीकर, अश्वघोष आर्ट अँड कलचरल फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे,प्रा.डॉ. सरोज बिडकर, राज्य मंत्रालय गृह विभागाचे उपसचिव विजय पोवार, मंदार पाटील, ऋतुराज माने , अभिजित राऊत, बाळासाहेब भोसले, संपदा मुळेकर, किशोर घाडगे, अनिल लवेकर,रणजीत माजगांवकर डॉ.सत्यजित कोसंबी,मदन पवार,सागर बगाडे,विजय टिपूगडे,रमेश भोसले,डॉ.समाधान बनसोडे,राजेंद्र बनसोडे उपस्थित होते. प्रविण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद भोजने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!