जि.प.कर्मचारी सोसायटीला ३ कोटी १५ लाख नफा,१२. ५० टक्के लाभांश
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला तीन कोटी १५ लाख नफा ! १२. ५० टक्के लाभांश !!
५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्टाफिंग पॅटर्नला मान्यता देण्यात आली. सहकार विभागानेही सोसायटीत कर्मचारी भरतीला मंजुरी दिली आहे. सोसायटीसाठी आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती होईल. सभासदांच्या पाल्यांतून ही भरती केली जाईल अशी घोषणा सवसाधारण सभेत करण्यात आली. सोसायटीचे चेअरमन उत्तम वावरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सोसायटीच्या श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सभेला सुरुवात झाली. सभेपुढील विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी मिळाली. संस्था कर्मचारी स्टाफिंग पॅटर्नचा विषय हा आठव्या क्रमांकावर होता. व्यवस्थापक व्ही. एन बोरगे यांनी, ‘सहकार विभागाने कर्मचारी भरतीला परवानगी दिली आहे. ३१ कर्मचारी संख्या मंजूर केली आहे. या भरती प्रक्रियेविषयी प्रत्येक सभासदाला पत्राद्वारे माहिती घरपोच कळविली जाईल. लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा अशा दोन टप्प्यात भरती प्रक्रिया होईल. सोसायटीत भरती करताना संस्थेला आवश्यक तितके कर्मचारी भरती केली जातील. सोसायटीवर आर्थिक ताण पडणार नाही याची दक्षता घेऊन भरती होईल.’असे स्पष्ट केले
यावेळी सभासदांनी काही सूचना केल्या. केवळ लेखी परीक्षा घ्या असेही काहींनी सुचविले. चेअरमन वावरे यांनी, सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांतूनच कर्मचारी भरती होईल.’असे स्पष्ट केले.संस्थेची आर्थिक उलाढाल,सभासद संख्या विषयी माहिती सांगताना चेअरमन वावरे म्हणाले, ’३१ मार्च २०२४ अखेर सभासद संख्या ३२४४ इतकी आहे. मार्च २०२४ अखेर सोसायटीतील ठेवी १९० काटी १३ लाखाच्या आहेत. तर कर्ज वाटप २०५ कोटी १२ लाख रुपये इतके आहे.
सोसायटीची उलाढाल ८५९ कोटी १० लाखापर्यंत आहे. सोसायटीला मार्च २०२४ अखेर तीन कोटी १५ लाख ९३ हजार ६९९ इतका नफा झाला आहे. लाभांश १२.५० टक्के दराने दिला जाणार आहे. एकूण सभासदांना मिळून एक कोटी ३५ लाख रुपये लाभांश वाटप होणार आहे. लाभांश, कायम ठेव व्याज व वर्गणी ठेव व्याज रक्कम १८ जून २०२४ रोजी सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ’असेही वावरे यांनी सांगितले. सभासद सचिन कोळी यांनी ज्या सभासदांची वार्षिक वर्गण थकीत आहे त्यांचे सभासदत्व रद्द करा अशी सूचना केली. त्यावर चेअरमन वावरे यांनी, संबंधितांना नोटीसा पाठविल्याचे सांगितले.
संचालक श्रीकांत चव्हाण यांनी स्वागत केले. संचालक बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्हाइस चेअरमन सचिन गुरव यांनी आभार मानले. सभेला संचालक रणजित पाटील, मुजम्मिल अहमद नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रविंद्र जरळी, अजय शिंदे, महावीर सोळांकुरे, संजय शिंदे, सुनील पाटील, सरदार दिंडे, नंदीप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, बाबासो साळोखे, पांडूरंग इंगळे, नारायण आयरे, प्रकाश सोहनी, पांडूरंग पोवार आदी उपस्थित होते.
सुकाणू समितीचे पदाधिकारी व मार्गदर्शक एम. आर. पाटील, एम. एम. एम. पाटील, रवी पाटील, राजीव परीट, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, साहेबराव शेख, के. आर. किरुळकर, साताप्पा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.वंदे मातरम ने सभेची सांगता झाली.










