रा. शाहू गव्ह. सर्व्हटस बँकेतर्फे “पद्माराजे पारितोषिक” व इतर समारंभ उत्साहात
रा. शाहू गव्ह. सर्व्हटस बँकेतर्फे “पद्माराजे पारितोषिक” व इतर समारंभ उत्साहात
कोल्हापूर/प्रतिनिधी
राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस को-ऑप. बँक लि., कोल्हापूर बँकेमार्फत “पद्माराजे पारितोषिक ” वितरण व ” सेवानिवृत्त सभासद सत्कार,ग्राहक मेळावा,आरोग्य तपासणी असा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ” कार्यक्रमास प्रमुख वक्ते डॉ. संजय कळमकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप माने उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ तर डी.डी. शिंदे कार्यकारी अभियंता, वारणा कालवा विभाग, इस्लामपूर यांचे प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करणेत आले. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष श्री. मधुकर श्री. पाटील (एम.एम्.) यांनी प्रास्ताविक करुन बँकेच्या प्रगतीदर्शक आढाव्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये श्री. पाटील यांनी बँकेने “१०७ वर्षे पूर्ण ” करुन “१०८ व्या वर्षात पदार्पण ” केले असलेचे सांगितले. शतकोत्तर वाटचाल करणारी आपली बँक ही महाराष्ट्र राज्यातील पगारदार नोकरांची प्रथम क्रमांकाची सहकारी बँक आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील २ ऱ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेचे सांगितले. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केले असलेचे नमूद करुन मार्च २०२४ अखेरची सांपत्तिक स्थितीची माहिती दिली. बँकेमार्फत राबविणेत येणाऱ्या विविध योजनांबाबत “ग्राहक मेळावा ” मध्ये माहिती दिली, बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासली असलेचे नमूद करुन पारितोषिक पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच सेवानिवृत्त सभासदांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख वक्ते डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या भाषणामध्ये “संस्काराची पहिला शाळा ही कुटुंब आहे.” त्यामुळे मुलांना घडवित असताना सवयीपेक्षा संस्कार करणे गरजेचे आहे. याकरीता पालकांनी स्वतःवर काही निर्बंध घालणे आवश्यक असलेचे सांगून मुलांचे भविष्य उज्वल होणेकरीता याकडे लक्ष देण्याची गरज असलेचे असे नमूद केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल मुळे लहान मुलांमध्ये निर्माण होणारी आभासी विचारदृष्टी, त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत तसेच मोबाईलमुळे एकमेकांमधील संवाद कशा पध्दतीने हरवत चालला आहे हे विविध उदाहरणांतून विनोदी शैली मध्ये पटवून दिले. त्याचबरोबर उपस्थित सेवानिवृत्त सभासदांना संबोधित करताना “आनंद देत राहा तुम्हाला आनंद मिळत राहिल” असा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला.व बँकेच्या कारभाराबद्दल चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालकांचे कौतुक केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. दिलीप माने म्हणाले, मुलांचे संगोपन करीत असताना संस्कारांचे महत्व अधिक आहे. मुलांना संवेदनशील बनविणे ही आजच्या काळाची गरज असलेचे त्यांनी यावेळी नमूद केले. बँकेचे संचालक मंडळ उत्तमरित्या कामकाज सुरु करीत असून सेवानिवृत्ती नंतरच्या काळात निरोगी व आनंदी कसे रहावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच देहदान, नेत्रदान यासारख्या उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना देवून त्याचे महत्व सांगितले. बँकेने सलग तेरा वर्षे एन.पी.ए शून्य टक्के केल्याबद्दल विशेष कौतुक केले. बँकेने जोपासलेल्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांनी प्रेरणादायी कार्याचे कौतूक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित मा.डी.डी. शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये राजर्षि शाहू महाराजांनी ज्या हेतूने बँकेची स्थापना केली तो हेतू खऱ्या अर्थाने साध्य होत आहे. बँकेचे आर्थिक नियोजन, कर्ज वितरण यावर बँकेची प्रगती अवलंबून असून असते. रिझर्व्ह बँकेने नेमून दिलेले सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन केलेले आहे हे सांपत्तिक स्थितीवरुन दिसून येते. बँकेने यापुढेही अशाप्रकारे उत्तम कामकाज करावे असे नमूद केले. यावेळी बँकेतर्फे राबविणेत येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली व बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील, उपाध्यक्ष अरविंद आयरे, संचालक सर्वश्री रविंद्र पंदारे, शशिकांत तिवले, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संजय खोत, किशोर पोवार, संचालिका सौ. हेमा पाटील, श्रीमती मनुजा रेणके, संचालक प्रकाश पाटील, तज्ञ संचालक दिपक पाटील, गणपत भालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह सेवानिवृत्त सभासद,पाल्य,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत कंदले तर आभार उपाध्यक्ष अरविंद आयरे यांनी मानले.
चौकट- गुणिजनांचा सत्कार!
समारंभामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सभासदांबरोबरच, इयत्ता ४थी ते ९वी आणि १० वी व १२ वी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या सभासदांच्या मुलींचा पद्माराजे पारितोषिक अंतर्गत प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर रोख बक्षिसे प्रदान करुन गौरव करणेत आला. तसेच कै. छनुसिंग चव्हाण यांचे स्मरणार्थ इ.१० वी व इ. १२ वी परिक्षेत जास्तीत जास्त गुण प्राप्त केले असतील त्या पैकी गुणांनुक्रमे पहिल्या फक्त पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देणेत आला. एकत्रित ७० विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर रोख बक्षिसे प्रदान करून गौरविणेत आले. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करणेत आला. यावेळी नेत्रतपासनी व इतर रोग निदान शिबिराचा जवळपास २२० सभासदांनी लाभ घेतला.
फोटो ओळी—-राजर्षी शाहू गव्ह.सर्व्हटस बँकेतर्फे “पद्माराजे पारितोषिक व इतर कार्यक्रमात गुणिजनांचा सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील,अरविंद आयरे,रवींद्र पंदारे,डॉ.संजय कळमकर,डॉ.दिलीप माने,अतुल जाधव,संजय खोत,सर्व संचालक,मान्यवर.










