स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सत्यजित पाटील-सरूडकर यांना पाठिंबा- वसंत पाटील
शेतकरी,सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी शेतकरी संघटनेचा सत्यजित पाटील-सरूडकर यांना पाठिंबा- वसंत पाटील
बांबवडे येथे शाहूवाडी-पन्हाळ्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पत्रकार परिषद.
भेडसगाव/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई केली,शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच आंदोलनाच्या माध्यमातून सरकार दरबारी संघर्ष केला. याच विचारांच्या मुशीतून सर्वसामान्यासाठी लढा देणाऱ्या शाहूवाडी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील- सरूडकर यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहुवाडी पन्हाळा विधानसभा प्रमुख वसंत पाटील यांनी बांबवडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, चळवळीच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना यांची विचारधारा एकच आहे.कोरोना महापूर यासारखी परिस्थिती उद्भवली, तालुक्यातील जनता तेव्हा अडचणीत असताना सत्यजित पाटील लोकांना मदत करण्यात आघाडीवर होते.तालुक्यात कोणताच शाश्वत विकास झाला नाही. सर्वसामान्य जनतेच्या न्याय हाक्काच्या लढाईसाठी,मतदारसंघाच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्यजित पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे वसंत पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकात शाहुवाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाउटकर म्हणाले,आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय हक्क देण्यासाठी सतत चळवळीत कार्यरत राहिलो आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदैव रस्त्यावरच्या लढाईसाठी बळ दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई केली. या पुढच्या काळातही शेतकरी संघटना सर्वसामान्यांच्या न्याय -हक्कासाठी सदैव तत्पर असेल. चळवळीच्या वेळी चळवळ आणि आंदोलनाच्या वेळी संघर्ष करण्यासाठी संघटना कधीच मागे पुढे पाहणार नाही.
यावेळी बोलताना विवेक बच्चे म्हणाले, दोन्ही संघटनांची कार्यधारा एकच असून या तालुक्यातून पैशाच्या जीवावर राजकारण करणारी प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी विधानसभेला कंबर कसून सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राबतील असा विश्वास त्यांनी दिला. विजयी पताका साकारण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असेही ते म्हणाले.
—————-
चौकट-
भाजप आणि भाजप शक्तीला समर्थन देणाऱ्या प्रवृत्तीला हद्दपार करा.- भाई भारत पाटील
शेकाप चे नेते भाई भारत पाटील म्हणाले, भाजप आणि भाजपला समर्थन देणाऱ्या सर्व शक्तीचा पराभव करण्यासाठी,सामान्य घरातील नेतृत्वाला संधी देण्यासाठी सत्यजित पाटील यांना पाठिंबा देत आहोत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल मनातून काढण्याची हीच वेळ आहे. शाहूवाडी व पन्हाळ्यातील जनतेला अभिमान वाटेल,चळवळीला कार्यकर्त्याला सन्मान- आधार मिळेल असा निर्णय राजू शेट्टीने घेतल्याबद्दल त्यांनी राजू शेट्टी यांचे आभार मानले. विकासाच्या नावावर काही माणसांना हाताशी धरुन भ्रामक स्वप्नांच्या दुनियेत लोकांना गुंग करण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या तालुक्यामध्ये लोकांना पैशावर विकत घेण्याचा प्रकार चालू आहे. पैसा,लबाडीच्या जोरावर विकास गंगा पोहोचवली असे खोटे सांगितले जात आहे. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विकास गंगा पोहोचवली हे विरोधकांचे धोरण साफ खोटे आहे. भाजप आणि भाजप विचारांच्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी लोकांनी यावेळी सत्यजित पाटील यांना पाठबळ द्यावे असे आवाहन भाई भारत पाटील यांनी केले.
—————————-
लोकांच्या मनातील अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली.- सत्यजित पाटील- सरूडकर
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील म्हणाले, राजू शेट्टी आणि आमची मैत्री २००२ सालापासून ची आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उसाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवणारा आदर्श लोकप्रतिनिधी राजु शेट्टी आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहापासून ते संसदेत आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारा देशातील एक नावाजलेला लोकप्रतिनिधी म्हणून राजू शेट्टी यांची जनसामान्यात वेगळी ओळख आहे. भविष्यात तालुक्यातील सर्व निवडणुका मानसिंगराव गायकवाड गट,शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व समविचारी पक्ष, संघटना एकत्र येऊन लढवतील. उद्याच्या काळातही शेतकरी सर्वसामान्य, कष्टकरी, दीन दलित लोकांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ शेतकरी संघटनेच्या पाठबळामुळे उपलब्ध झाले आहे.भविष्यात आम्हाला एकत्र काम करण्यासाठी कोणतीच अडचण नाही. मानसिंगदादा गायकवाड गट व सरूडकर गट यांची युती गेल्या दहा वर्षाची आहे.यामध्ये सुद्धा कोणतेच समज- गैरसमज झाले नाहीत.आमच्या सर्व समविचारी निर्णयामुळे प्रत्येक निवडणुकीत आम्ही लोकांना सोबत घेऊन सामोरे गेलो आहे. इथून पुढच्या तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारातील सर्व निवडणुका या आमच्या युतीच्या माध्यमातून आम्ही सामोरे जाणार आहोत. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ही दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आहेत. माझी व कार्यकर्त्यांची गेल्या कित्येक वर्षाची इच्छा पूर्ण झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठबळामुळे शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षांची लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. सध्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे वातावरण अतिशय दूषित झाले आहे.दडपशाही, पैशांचा पाऊस, लोकांना वेगळी प्रलोभने अमिषे दाखवणे असे गैरप्रकार सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत पैशाचा इतका प्रचंड वापर होऊनही राजू शेट्टी व मला मिळालेली मते ही पैशाच्या मतापेक्षा जास्त आहेत ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. भविष्यातल्या कोणत्याही निवडणुका या सर्वांच्या विचारविनिमय- संवादाने लढवल्या जातील.सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेला शब्द आणि झालेली चर्चा यामध्ये कोणत्याही स्वरूपाची गल्लत होणार नाही असा शब्द सत्यजित पाटील देतो.नेहमीच सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान व सर्वसामान्यांच्या हिताचेच राजकारण व समाजकारण केले जाईल. असेही सत्यजित पाटील म्हणाले.
पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहुवाडी पन्हाळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, रायसिंग पाटील, संतोष पाटील, विकास सिंघन, हरीश पाटील, संतोष पाटील,पन्हाळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित पाटील, विवेकानंद बच्चे,विजय सावंत, रंगराव शिपुगडे,शामराव पाटील, धनाजी दळवी (सरकार), भिवाजी कुंभार, बबन पानसकर, बाबा पाटील, ऋषी गायकवाड, चंद्रकांत पाटील,यासह शिवसेनेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील, नामदेव गिरी, दत्ता पवार,पांडुरंग पाटील, प्रकाश पाटील,विजय खोत,भीमराव पाटील, सुरेश पारळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो ओळी- विजयाची खूण दाखवून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील – सरूडकर याना पाठिंबा देताना शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,कार्यकर्ते.)










