शिक्षक बँकेला पावणेतीन कोटीहून अधिक नफा, साडेसात टक्के लाभांश ! कर्जमर्यादा ५० लाखापर्यंत- चेअरमन शिवाजीराव रोडे –पाटील
शिक्षक बँकेला पावणेतीन कोटीहून अधिक नफा, साडेसात टक्के लाभांश ! कर्जमर्यादा ५० लाखापर्यंत- चेअरमन शिवाजीराव रोडे –पाटील
कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला एकूण चार कोटी १५ लाख रुपये इतका नफा झाला आहे. बीडीडीआर तरतूद तरुपये एक कोटी ३० लाख नफा पूर्व करुन दोन कोटी ८५ लाख ७२ हजार १०१ रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना यंदा साडेसात टक्के लाभांश वाटप करण्यात येईल. तसेच सभासदांना ५० लाख रुपयापर्यत कर्ज वितरण व बँकेकडे पगार असणाऱ्या सभासदांना पाच लाख रुपयापर्यंत कॅश क्रेडिट मंजूर केले जाणार आहे.’असे चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिक्षक बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (७ सप्टेंबर २०२५) दुपारी एक वाजता आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर बॅँकेच्या कामगिरीविषयी माहिती सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी, विरोधी आघडीने केलेले विरोध आरोप फेटाळून लावले. ‘खर्चात काटकसर व समाधानकारक लाभांशामुळे सभासदांमध्ये बँकेचे विश्वासार्हता वाढत आहे. सत्ताधारी संचालक मंडळाच्या कामकाजावर विश्वास ठेवून सभासद संख्या वाढत आहे. ठेवीमध्ये वाढ होत आहे, नेमके हेच विरोधी आघाडीच्या मंडळीचे पोटदुखीचे कारण आहे. बँकेच्या कामकाजासंबंधी त्यांनी कुठेही चौकशीची मागणी करावी. त्याला विलंब लावू नये’ असा पलटवार केला.
‘राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून सभासदांच्या विश्वासावर सत्तेत आल्यावर तीन वर्षात बँकेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवली हे संचालक मंडळाचे यश आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षकांच्या ज्या अन्य बॅँका आहेत, त्यांच्याशी तुलना केली तर सर्वाधिक लाभांश देणारी कोल्हापुरातील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आहे. बँकेने गेल्या तीन वर्षात कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ केली नाही. वचननाम्याचे पहिले पाऊल म्हणून आकस्मिक कर्जाला ९.५० टकके व्याजदर केला आहे. भविष्यात कर्जाला एक अंकी व्याजदर आणि सभासदांना दोन अंकी लाभांश दिला जाईल. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या तीन अंकी होणार नाही.’असेही चेअरमन म्हणाले.
विरोधी आघाडीचे आरोप फेटाळून लावत चेअरमन रोडे-पाटील म्हणाले, ‘सध्या बँकेकडे ४३८ कोटी ९९ लाखाच्या ठेवी आहेत. ऑगस्ट २०२५ अखेर सभासद संख्या ६७६२ इतकी झाली आहे. शिवाय शालार्थ आयडी प्राप्त होताच शिक्षक सेवकांना नवीन सभासद करुन घेतले जाते. त्यांना देण्यात येणाऱ्या तीन लाख रुपयांच्या कर्जात वाढ केली आहे. त्यांना पाच लाख कर्ज वितरित करण्यात येणार आहे. विरोधी आघाडीचे आरोप चुकीचे आहेत. त्यांच्याच कालावधीत सेवानिवृत्तीनंतरही अनेक वर्षे काहींनी संचालकपदावर काम केले आहे. बजरंग लगारे हे सेवानिवृत्तीनंतर किती वर्षे संचालक होते ? हे एकदा सांगावे’
बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर म्हणाले, ‘पूर्वीच्या संचालक मंडळांने जन्मतारीख बदलून ७०० हून अधिक जणांना कर्ज वितरीत करत सेवानिवृत्तीनंतरही बँकेचे कर्जाचे हप्ते चालू ठेवले होते. पूर्वीच्या संचालकांनी कर्ज वसुलीकडे दुर्लक्ष केले होते. जिल्हा बाहेर गेलेल्या शिक्षकांना दिलेल्या कर्जाची वसुली आम्ही करत आहोत.जुन्या काळातील कर्ज वाटपातील तीन कोटीपैकी आतापर्यंत एक कोटी २० लाख वसूल केले आहेत.’
एकाधिकारशाहीपेक्षा आमचा सामूहिक कारभार उत्तमच
विरोधी आघाडीने सत्ताधाऱ्यावर आरोप करताना पदांची खांडोळी केली तसेच तेरा संचालक नेमले. मिटिंग खर्च वाढला आहे. ऑडिट फी जास्त भरावी लागत आहे, मग हे तज्ज्ञ संचालक काय करतात ? असा सवाल केला होता. त्याचाही चेअरमन रोडे-पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी बँकेत राजाराम वरुटे यांची एकाधिकारशाही सुरू होती. दरम्यान राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने साऱ्यांना विश्वासात घेत कामकाज केले. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. आमचा कारभार उत्तम आहे. सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाचा कारभार हा बँकेला प्रगतीकडे नेणारा व सभासदांच्या हिताचा आहे. यामुळे सध्याच्या कारभाराविषयी आपल्या बँकेची व अन्य बँकेशी तुलना करायला मी केव्हाही तयार आहे.’असे आव्हानही त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन सुरेश कोळी, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, राजेंद्र पाटील, बाळकृष्ण हळदकर, शिवाजीराव बोलके, अमर वरुटे, रामदास झेंडे, एस. व्ही. पाटील, नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, गजानन कांबळे, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, गौतम वर्धन, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.










