कोल्हापूरची शुभ्रा खाडे महाराष्ट्राची सुपरस्टार! स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘छोटे उस्ताद’कार्यक्रमाची महाविजेती
कोल्हापूरची शुभ्रा खाडे महाराष्ट्राची सुपरस्टार!
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘छोटे उस्ताद’कार्यक्रमाची महाविजेती
कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्रातील लोकप्रिय स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार- छोटे उस्ताद’पर्व ४ या सांगीतिक कार्यक्रमात टेंबलाईवाडी कोल्हापूर अवघ्या १३ वर्षाची गोड गळ्याची गायिका महाविजेती ठरली. पहिल्या फेरीपासूनच शुभ्रा ने सुरेल अवीट गाणी सादर करत परीक्षक प्रसिध्द अभिनेते, गायक सचिन पिळगावकर,गायक आदर्श शिंदे,वैशाली सामंत यांची वाहवा मिळवली.गेली ४ महिने स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रत्येक आठवड्यातील कार्यक्रमात शुभ्रा खाडे यांनी शास्त्रीय,लोकसंगीत, भावगीत, भक्तीगीत, सुगम,चित्रपट गीते अशा सर्वच गायन प्रकारातील गाणी सुरेलरित्या गाऊन रसिकांची मने जिंकली. रविवार ३ मे रोजी झालेल्या अंतिम फेरीत महाविजेतेपदाचा बहुमान पटकावत तिने यशाला गवसणी घातली. स्टार प्रवाह वाहिनीकडून तीन लाखाचे बक्षीस प्रसिद्ध तालवाद्य, संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शुभ्रा खाडे हिने पात्रता फेरीपासूनच आपल्या गायकीची विलक्षण चुणूक दाखवत स्पर्धेतील आपले उत्तमोत्तम स्थान टिकवून ठेवले होते. काल झालेल्या महाअंतिम सोहळ्यामध्ये प्रसिद्ध गायिका शरयू दाते सोबत ही गुलाबी हवा-जुगलबंदी, कळीदार कपुरी पान, चंद्रा या लावणी तसेच क्लासिकल यॉडलिंग अशी प्रत्येक धाटणीची गाणी सादर करत प्रेक्षकांची तसेच परीक्षकांची वाहवा मिळवली.
शुभ्रा खाडे सध्या कोल्हापुरातील सुप्रसिद्ध गायक संगीतकार सुर नवा ध्यास नवा,आवाज महाराष्ट्राचा विजेते प्रल्हाद जाधव,रोहित फाटक यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेत आहे. तिच्या या सांगीतिक प्रवासामध्ये गुरूंच्या बरोबर तिचे वडील सचिन खाडे यांचा त्याग अवर्णनीय आहे.आई व कुटुंबीय यांचे अनमोल योगदान आहे शुभ्राकडे सध्या आठवीमध्ये प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षण घेत असून पहिली ते सातवी पर्यंतचे तिचे शिक्षण मनपा विद्यालय टेंबलाईवाडी या महानगरपालिकेच्या शाळेत झाले आहे.
तिच्या या यशामुळे कोल्हापूरच्या सांगीतिक सन्मानात आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
व्हरसेटाइल सिंगर-शुभ्रा खाडे
शुभ्रा ने आपल्या गायकी,सूर लय,ताल,ठसका व अदाकारीने छोटे उस्ताद पर्व ४ मध्ये ही गुलाबी हवा, नावाची गोजिरी, दिस चार झाले, बाई मी पतंग उडवीत होते, पुनवेच्या तारांगणी, का कळेना मन हरवते कसे, नका सोडून जाऊ रंगमहाल, येऊ कशी प्रिया, शोधू कुठे रं,राज शिवबा राजं, आईचा गोंधळ अंबाबाईचा गोंधळ, दार उघड बये, नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, धिंगाणा धिंगाणा, कलीदार कपुरी पान, चंद्रा लावणी, यॉडलिंग अशी विविध जॉनर ची गाणी सादर करत आपली गुणवत्ता व व्हरसेटाईल गायकी सिध्द करून दाखवली.या गाण्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम रसिक आणि परीक्षकांची मने जिंकली.
—————————————————–
बाळा, तुझे खूप खूप अभिनंदन ! आदरणीय प्रेक्षकांसमोर तुझा सांगीतिक प्रवास आता सुरू होत आहे. त्यामुळे अशीच मेहनत करत राहा आणि नम्र राहा (जमिनीवर पाय असू दे). तसेच, तुझ्या सर्व आदरणीय गुरूंबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त कर. हे फक्त एकदाच नाही, तर आयुष्यभर लक्षात ठेव.
प्रल्हाद जाधव
-सुप्रसिद्ध गायक,संगीतकार(शुभ्रा चे गुरू)
———————————————–
कोरोनाच्या काळात आवड म्हणून शुभ्रा ने गुरू प्रल्हाद जाधव,रोहित फाटक यांच्याकडे गायन शिक्षण घेण्यास सुरुवात केली.आज तिला जे मिळालेले यश आहे ते सर्व गुरूंचे आशीर्वाद व तिच्या साधनेचे फळ आहे.पहाटे उठून तिने रियाझ केला आहे.अजूनही पुढे खूप पल्ला गाठायचा आहे.,इथून पुढेही गुरूंच्या मार्गदर्शनाने वाटचाल सुरू राहील.
– सचिन खाडे
(शुभ्रा चे वडील)










