May 14, 2026

‘आई तू सर्वकाही’ तून आईच्या वात्सल्याचा जागर प्रा.निशांत गोंधळी प्रस्तुत आईच्या मायेचा जयजयकार करणारी सांगीतिक मैफल

0
IMG-20260505-WA0046

आई तू सर्वकाही’ तून आईच्या वात्सल्याचा जागर

प्रा.निशांत गोंधळी प्रस्तुत आईच्या मायेचा जयजयकार करणारी सांगीतिक मैफल

कोल्हापूर/मारुती फाळके

प्रा.निशांत गोंधळी निर्मित आणि गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट व लोकमत सखी प्रस्तुत “आई तू सर्वकाही” हा कविता व गाण्यांच्या माध्यमातून आईच्या विश्वाचे हळवे, भावस्पर्शी आणि जिवंत चित्र उभे करणारा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व दिमाखात देवल क्लब येथे रंगला.’आई तू सर्वकाही’या मैफिलीतून  आईच्या वात्सल्याचा जागर करणारी भावस्पर्शी सांगीतिक मेजवानी रंगली,खुलली,फुलली आणि प्रत्येक सादरीकरतुन उपस्थित रसिकांना भावनिक करून गेली.  जणू आईच्या मायेचा जयजयकारच या सांगीतिक मैफलीतून प्रतीत होत होता.

या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना प्रा. निशांत गोंधळी यांची होती. येऊ घातलेल्या मातृदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला आणि आईच्या प्रेमाची, त्यागाची व निस्वार्थ भावनेची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने करून दिली.’आई तू सर्वकाही’ या शीर्षकाला साजेसा आशय कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणातून प्रकट होत होता. सादर केलेल्या अनेकविध कविता आणि गायक कलाकारांनी सादर केलेली गाणी ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती नव्हती, तर ती प्रत्येकाच्या आयुष्यातील ‘आई’ या अनमोल नात्याचा सखोल अनुभव देणारी होती.

आई माझा गुरू, प्रेम स्वरूप आई या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर एकामागोमाग नीज माझ्या नंदलाला, आईसारखे दैवत, आई पहिला संस्कार, लुकाछुपी, माय असावी साऱ्याले, मेरी माँ, घाल घाल पिंगा वाऱ्या, आई तुझं लेकरू, ती गेली तेव्हा रिमझिम, या चिमण्यांनो, मागू कसा मी, एकाच या जन्मी जणू यासारख्या गाण्यांनी कोल्हापूरकर रसिकमनाचा ठाव घेतला. विशेष म्हणजे प्रत्येक गाण्याबरोबरच प्रा. निशांत गोंधळी यांनी सादर केलेल्या आईविषयक निवडक, भावस्पर्शी कविता कार्यक्रमाला एका उंचीवर घेऊन गेल्या.

कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध निवेदक, कवी, गायक निशांत गोंधळी, ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम प्रल्हाद जाधव व गायिका हर्षदा परीट यांचा स्वरसाज होता. तर शिवाजी सुतार (कीबोर्ड), संदेश खेडेकर (तबला), केदार गुळवणी (व्हायोलिन), गणेश साळोखे (गिटार), विक्रम परीट (ऑक्टोपॅड, पर्कशन) या वादकांची साथसंगत लाभली. ध्वनी संयोजन श्रीधर जाधव, प्रकाशयोजना अभिजित मळगे तर मंच व्यवस्था मिलिंद अष्टेकर, सागर भोसले यांची होती.
आईच्या मायेची ऊब, तिच्या त्यागाची कहाणी, तिच्या कष्टांची जाणीव आणि तिच्या प्रेमाची अपारता या सर्व भावना रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या ठरल्या.
कार्यक्रमाचे नियोजन, सादरीकरण आणि वातावरण हे अत्यंत उत्कृष्ट होते. प्रत्येक सादरीकरणात भावना, अभिव्यक्ती आणि समर्पण यांचा सुंदर संगम दिसून आला. कलाकारांनी आपल्या कलेद्वारे आईच्या विविध रूपांचे दर्शन घडवले. कधी ती प्रेमळ, कधी कठोर पण हितचिंतक, तर कधी संघर्षांत साथ देणारी आधारवड. अशाप्रकारचे सांस्कृतिक उपक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून ते मूल्यांची जपणूक करणारे आणि समाजाला संवेदनशील बनवणारे असतात, हे पुन्हा आई तू सर्वकाही या अनोख्या संकल्पनात्मक कार्यक्रमाने अधोरेखित झाले.

एकूणच, “आई तू सर्वकाही” हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उपक्रम न राहता, प्रत्येकाच्या हृदयात आईविषयी असलेल्या भावनांना उजाळा देणारा एक संस्मरणीय अनुभव ठरला. अशा उपक्रमांचे आयोजन करून गंधार चॅरिटेबल ट्रस्टने समाजात सकारात्मक विचार आणि संस्कारांची पेरणी केली, अशा रसिकांच्या उत्स्फूर्त भावना होत्या.

कार्यक्रमप्रसंगी दै. लोकमतचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट मकरंद देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, स. ब. खाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, श्री. अमेय आसगावकर, लोकमत सखी मंचचे श्री. दीपक मनाठकर, सौ. राजश्री घोरपडे, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्सचे मार्केटिंग हेड व्यंकटेश माळकर, राजश्री इंगळे, शशिराज मसालेचे डॉ. संतोष वाघमोडे, रोहिणी वाघमोडे, यशोदा फार्मसीच्या श्रुती तवटे उपस्थित होत्या. तसेच कोल्हापुरातील संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार व रसिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

●चौकट●

हृदयस्पर्शी संगीत मैफल


        कविता आणि त्यानुरूप गाणी हा कार्यक्रमाचा गाभा होता. प्रा. निशांत गोंधळी यांनी सादर केलेल्या आई विषयक कवितांनी रसिकांचे डोळे पाणावले. ग्रामीण, अहिराणी भाषेतील गेय कवितांनी तर रसिकांची वाहवा मिळाली.कवितांमधून आपली आई मूर्तिमंत अशी डोळ्यांसमोर उभारल्याची प्रतिक्रिया अनेक रसिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!