शिक्षक बँकेच्या सभेत वादावादी, ८६ वी वार्षिक सभा गाजली.
शिक्षक बँकेच्या सभेत वादावादी
८६ वी वार्षिक सभा गाजली.
अमृत संजीवनी योजना,गुंतवणूक खर्च, स्टाफिंग पॅटर्न,लाभांश यावरून शिक्षक बँकेची सभा गाजली.
कोल्हापूर/प्रतिनिधी
लावा पुढची स्लाईड,असा शिक्षक बँकेच्या कारभाराचा पोलखोल करत चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांनी शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा प्रास्ताविकपर भाषणातून सभासद,विरोधी आघाडीच्या प्रश्नांना सामोरे गेले,लांबलेल्या प्रास्ताविकात विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती करत निंबाळकर यांनी उत्तर द्यावे असा आग्रह धरला पण सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देणार,सभा शेवटपर्यंत चालवणार आहे असे सांगत निंबाळकर यांनी शिक्षक बँकेच्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सारथ्य केले.पण लांबलेल्या प्रास्ताविकामुळे विरोधी आघाडीच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत असा सूर धरत विरोधी आघाडीने सभात्याग करत समांतर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.अमृत संजीवनी योजना,पन्हाळा शाखा, स्टाफिंग पॅटर्न,लाभांश यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.
प्रारंभी स्वागत संचालक राजेंद्र पाटील यांनी केले.
सभेचे प्रास्ताविक चेअरमन बाळासाहेब निंबाळकर करत असताना विरोधी आघाडीने जो जो विषय येईल त्याबाबत प्रश्न विचारण्यास सुरवात केली.
प्रास्ताविकात विषय येईल त्याप्रमाणे डिजिटल स्क्रीन वर स्लाईड दाखवली जात होती. प्रारंभी अहवालात छापलेल्या मुद्रणातील चुकीमुळे विरोधकांनी चेअरमन निंबाळकर व संचालक मंडळ यांना धारेवर धरले.रेग्युलर कर्ज ऐवजी सेक्युलर तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असे न छापता प्रजासत्ताक दिन यावरून सुरवातीला गोंधळ झाला., प्रास्ताविकात जसे विषय येतील त्यावर स्पष्टीकरण करावे असा विरोधी आघाडी ने आग्रह धरला यावर दमानं घ्या की,दाखवणार आहे की,सांगणार आहे की !असे प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करत निंबाळकर यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.,तब्बल २ तास त्यांनी प्रास्ताविकात बँकेच्या आर्थिक घडीचे विश्लेषण केले.
गोंधळ,माईक हिसकावणे,घोषणा अशा वातावरणात प्रास्ताविकानंतर अहवालवाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी केले.
पहिल्यापासून शेवटपर्यंत गोंधळाचा पाढा ऐकावयास मिळाला. अमृत संजीवनी योजना, नफ्याची तरतूद यावरुन सत्ताधारी व विरोधकांत अनेकदा शाब्दिक चकमक उडाली. प्रश्नोत्तराला सुरुवात होताच सत्ताधारी समर्थक सभासदांनी विरोधकांना उद्देशून वापरलेला अपशब्द, विरोधी आघाडीकडून माइक हिसकावुन घेण्याचा प्रकार, बँकेच्या कामकाजावरुन सध्याचे सत्ताधारी व मागील संचालक मंडळाची उणीदुणी काढण्याच्या घटना यावरुन धक्काबुक्की आणि अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. या गोंधळातच विरोधी आघाडीच्या सभासदांनी, सत्ताधाऱ्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत प्रश्नोत्तर तासादरम्यान सभात्याग केला. तर सत्ताधारी संचालकांनी, सभासदांच्या सगळया प्रश्नांची उत्तरे देण्यास संचालक मंडळ बांधिल आहे. प्रत्येक सभासदाच्या शंकेचे निरसन होईपर्यत सभा चालू राहील असे सांगत सभेचे कामकाज कायम ठेवले. जवळपास तीन तासाहून अधिक काळ सभा झाली.
चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत साडेसात टक्के लाभांश वाटपास मंजुरी देण्यात आली. शिवाय पन्हाळा शाखा वगळून बँकेच्या ११९ जागांच्या स्टाफिंग पॅटर्नला सभेत मंजुरी मिळाली. बँकेच्या लवकरच तीन शाखा विस्तारित करण्यात येणार आहेत. यामुळे स्टाफिंग पॅटर्नचा विषय मंजुरीला ठेवला. ११९ चा स्टाफिंग पॅटर्न मंजूर झाला असला तरी, कर्मचारी भरती संख्या १०० च्या पुढे जाणार नाही असे चेअरमन निंबाळकर यांनी सांगतिले. चेअरमन निंबाळकर यांनी तब्बल दोन तास प्रास्ताविक केले. एक वाजून २३ मिनिटाला भाषणाला उभे राहिलेल्या चेअरमनांनी तीन वाजून २२ मिनिटापर्यंत गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. तसेच सध्याच्या संचालक मंडळ व मागील संचालक मंडळातील जमा खर्च, नफा-तोटा यासंबंधीची आकडेवारी सादर करत विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी विरोधी सदस्यांनी, गेल्या वर्षभरात सत्ताधारी संचालक मंडळाच्या वाढत्या खर्चावर, चेअरमनांच्या प्रवास खर्चावर बोला असे सांगत त्यांची कोंडी करण्याची खेळी केली. यावरुन भाषणा दरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
चेअरमनांच्या प्रास्ताविकानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी तीन वाजून तेवीस मिनिटाला विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू केले. सात मिनिटात पंधरा विषय मंजूर केले. यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रश्नोत्तराला सुरुवात होताच सत्ताधारी समर्थक सभासद दिलीप पवार यांनी सध्याच्या संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक करताना मागील संचालक मंडळाच्या कारभारावर तिखट शब्दांत निशाणा साधला. मागील संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या नोकर भरती करुन सभासदांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले असा आरोप केला. त्या आरोपाला विरोधी आघाडीच्या संभाजी बापट व अन्य सभासदांनी जोरदार आक्षेप घेतला. यावेळी बापट व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही संचालक मंडळाविषयी अपशब्द वापरणे चुकीचे असल्याचे ठणकावत पाटील यांच्या हातातील माइक हिसकावून घेतला. तेव्हा चेअरमन निंबाळकर यांनी, सभासदांच्या हातातील माइक हिसकावून घेणे योग्य नाही असे बजावण्याचा प्रयत्न केला. एव्हाना गोंधळात भर पडली. कोणीही कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विरोधी सभासदांना बोलण्यासाठी पुरेशा प्रमाणात माइकची व्यवस्था नाही, विरोधकांना बोलू दिले जात नाही. सत्ताधाऱ्यांचा कारभार हा मनमानी स्वरुपाचा आहे असा आरोप विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधी आघाडी व समर्थक सभासदांनी सभात्याग केल्यानंतर सत्ताधारी संचालक मंडळांनी प्रश्नोत्तराचा तास चालू ठेवला. विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सभेला व्हाइस चेअरमन बाळासाहेब निंबाळकर, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, शिवाजी बोलके, अमर वरुटे, साताप्पा वि. पाटील, शिवाजी रोडे पाटील, बाळकृष्ण हळदकर, गजानन कांबळे, नंदकुमार वाईंगड, बाबू परीट, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, तानाजी घरपणकर, सतीश तेली, रईस अहमद पटेल, तौफिक मोमीन, सुकाणू समितीचे जोतिराम पाटील, रवी पाटील, विलास चौगुले,सुनील पाटील,प्रमोद तोउंदकर,संजय दाभाडे, संजय कुर्डुकर, आदी उपस्थित होते.
………………..
अमृत संजीवनी योजनेवरुन मतभेद कायम
चेअरमन निंबाळकर यांनी बँकेच्या सभासदासाठी कर्जमाफी व मदतीसाठी अमृत संजीवनी योजना उपयुक्त असल्याचे समर्थन केले. तसेच भविष्यात या योजनेत वाढ करू अशी ग्वाही दिली. तर डीसीपीसीधारकांची बाजू मांडताना नागेश शिनगारे यांनी, अमृत संजीवनी योजना फसवी आहे. पूर्वी पंधरा हजार भरले की पाच लाख मदत मिळण्याची योजना होती. आता अमृत संजींवनी योजनते पन्नास हजार भरले की साडेसात लाख मिळतात. मग ही योजना चांगली कशी ? ५०००० च्या देय रकमेत dcps लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी विचारणा त्यांनी सभासदांना केली.
……………………………..
सत्ताधारी संचालक मंडळाचा निषेध करत सभात्याग
विरोधी आघाडीचे संभाजी बापट, राजमोहन पाटील, जी एस पाटील,दिलीप पाटील,प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, साहेबराव शेख, जी एस पाटील, दिलीप पाटील, मारुती दिंडे, सर्जेराव सुतार, संदीप पाडळकर, संजय ठाणेकर, श्रीकांत चव्हाण, नागेश शिनगारे,डी एस पाटील,संभाजी पाटील, साताप्पा पाटील,पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, एस के. पाटील, तुषार पाटील, शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या स्मिता डिग्रजे, श्वेता खांडेकर,नसीम मुल्ला, अनुराधा पाटील, लता नाळे आदी जण सत्ताधारी संचालक मंडळाचा निषेध करत सभात्याग केला. पुरोगामीचे प्रसाद पाटील यांनी बँकेच्या कामकाजासंबंधी सोळा प्रश्ने उपस्थित केली असून त्याचे निवेदनही सभास्थळी दिले. सभासदांना बँकेकडून कागदपत्रे दिली जात नाहीत असा आरोप केला. विरोधी आघाडीच्या सभासदांना बोलायला माइक दिला नाही, बोलताना माइकचा आवाज कमी करण्याचे प्रकार सत्ताधाऱ्यांनी केले असा आरोप श्वेता खांडेकर यांनी केला. हा आरोप चेअरमन निंबाळकर यांनी फेटाळून लावला, माइकचा आवाज कमी-जास्त करण्याचा प्रयत्नच नाही. शिवाय विचार मोठे हवेत, आवाज नको असे म्हणत विरोधकांना डिवचले.शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या संगीता अस्वले यांनी जनरल सभेस महिला मोठ्या संख्येने आल्या आहेत,आम्हाला बँकेचा कारभार समजून घ्यायचा आहे,गोंधळ करू नका,असे विरोधी आघाडीला सांगितले यावर प्रश्नांची उत्तरे मिळावीत असे विरोधी आघाडीने मत व्यक्त केले.
चौकट-१
चांगल्या कामाचे कौतुक तर करा…
आरबीआय कडे अनेक तक्रारी गेल्या.अडीच वर्षात शिक्षक बँकेच्या कारभाराबाबत विरोधकांनी आरबीआयकडे,सहकार विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. पण चांगल्या कारभाराबद्दल कधीच अभिनंदन केले नाही, बँकेच्या चांगल्या कारभाराचे कौतुक नको पण तक्रार तरी करू नका, असा सवाल निंबाळकर यांनी केला.
चौकट-२
विरोधकांच्या प्रश्नाचे समाधान झाले नाही.
निंबाळकर यांच्या लांबलेल्या प्रास्ताविकात आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत,शेवटपर्यंत सभा चालवणारे चेअरमन यांनी सभासदांची दिशाभुल केली.बँकेचा नफा, अमृत संजीवनी योजना फसवी आहे असे मत माजी संचालक राजमोहन पाटील,संभाजी बापट,प्रसाद पाटील यांनी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आक्षेप घेतला.
चौकट-२
नोकर भरती नाहीच..
यापूर्वी ४०० कोटीच्या व्यवसायासाठी १२९ कर्मचारी भरले, सध्याच्या आर्थिक उलाढालीवरून १८९ कर्मचारी भरता येतात पण आम्ही कर्मचारी भरणार नाही. कर्मचाऱ्यांची संख्या आहे तीच राहील असे स्पष्ट करत चेअरमन निंबाळकर यांनी नोकर भरतीच्या मुद्द्याला फुली मारली.
चौकट-३
बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध
एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हिडंड यासाठी राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी वचनबद्ध आहे.बँकेची आर्थिक वृद्धी करण्यावर भर, इंटरनेट बँकिंग, सभासदांचा पगार 100% शिक्षक बँकेत होणे, सभासदांना जास्तीत जास्त सुविधा देणे, बँकेच्या शाखा स्वमालकीच्या असणे यासाठी लवकरच राधानगरी शाखेचे कामकाज सुरू करणार असल्याचे चेअरमन निंबाळकर यांनी सांगितले.
चौकट-४
फौजदारी गुन्हा दाखल करा!
बोगस पन्हाळा शाखा दाखवून सभासदांची दिशाभूल करणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पांढरे यांनी केला. यावर सत्ताधारी समर्थकांनी या गोष्टीला पुष्टी देत घोषणाबाजी केली. यावरून वातावरण चांगलेच तापले.
चौकट-५
टाळुवरचे लोणी…
दिलीप पवार या शिक्षकांने सभासदांच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्यांना जागा दाखवा,असे भडक बोलताच वातावरण संतप्त झाले. यावर संभाजी बापट यांनी पवार यांना सुनावत हस्तक्षेप केला.
चौकट-६
महिलांची संख्या लक्षणीय!
प्रत्येक वर्षीच्या तुलनेत या सर्वसाधारण सभेस जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून महिला शिक्षिका सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचा कारभार समजून घ्यायचाय !असे सांगत समितीच्या जिल्हाध्यक्षा संगीता अस्वले यांनी तसेच श्वेता खांडेकर,स्मिता डिग्रजे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
चौकट-७
डिव्हीडंड दिला हे सत्य!
बँकेचे चेअरमन निंबाळकर यांनी परवा घेतलेल्या पत्रकार परिषदेत यापूर्वीच्या संचालक मंडळांनी कधीही डिव्हीडंड दिला नाही हे विधान केले होते.,पण गेल्या संचालक मंडळाने सभासदांना डिव्हिडंड दिल्याचे खुद्द निंबाळकर यांनी आपल्या प्रस्ताविकात नमूद केले., यावर संभाजी बापट यांनी हे खुद्द चेअरमन यांनी मान्य केल्याचे उपस्थित सभासदांच्या निदर्शनास आणून दिले.
चौकट-८
अमृत संजीवनी योजनेत dcps धारकांचे पूर्वी १५ हजार रुपये कपात करून ५ लाख लाभ दिला होता,आता ५० हजार रुपये कपात करून किती लाभ मिळायला हवा? जुन्या योजनेच्या तुलनेत मिळणारी भरपाई अधिक मिळायला हवी,
असा प्रश्न नागेश शिनगारे विचारला तेव्हा चेअरमन निंबाळकर यांनी त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ असे सांगितले. पण मुळात dcps कर्मचाऱ्यांना यातून अधिक आर्थिक लाभ होत नाही हे शिनगारे व श्वेता खांडेकर यांनी निदर्शनास आणून दिले.
चौकट-९
एक अंकी व्याजदराचे काय?
आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षक बँकेच्या निवडणुकीला सामोर जात असताना राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने सभासदांना एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हीडंड असा वचननामा दिला होता. परंतु आज या सत्तेला अडीच वर्षे लोटली असतानाही एक अंकी व्याजदर व दोन अंकी डिव्हिडंड देण्यात संचालक मंडळींना अपयश आले आहे.आता शिक्षक बँक निवडणुकीच्या तोंडावर एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हीडंड देणार काय अशी चर्चा उपस्थित सभासदांच्यात होती.
चौकट-१०
डिजिटल स्क्रीनद्वारे कारभाराचा पोलखोल..!
सत्ताधारी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या संचालक कारभारी मंडळींनी यंदा सर्वप्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभेत डिजिटल स्क्रीनद्वारे बँकेच्या कारभार सभासदांसमोर मांडला. या कारभाराच्या वेगवेगळ्या स्लाईड्स डिजिटल स्क्रीनद्वारे समोर ठेवून वार्षिक सर्वसाधारण सभा चालली. प्रास्ताविकपर भाषणात बाळासाहेब निंबाळकर यांनी बँकेच्या कारभाराचा खुलासा केला.यावर विरोधी आघाडीने वेळोवेळी हस्तक्षेप करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.










