महिला शिक्षकांनी लुटला कलाविष्कारातून मनमुराद आनंद शिक्षक संघ (शि. द.पाटील)गटातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात
महिला शिक्षकांनी लुटला कलाविष्कारातून मनमुराद आनंद
शिक्षक संघ (शि. द.पाटील)गटातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात
कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) कोल्हापूर जिल्हा महिला शाखेतर्फे राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात झाले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम नुकताच झाला. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ प्राथमिक शिक्षिकांना ” राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमाला मोठी गर्दी होती.
जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई म्हणाल्या, “आज समाजामध्ये महिला सुरक्षित आहेत का याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. समाजामध्ये महिलांनी निर्भयपणे वावरणेसाठी वातावरण तयार होणे आज काळाची गरज आहे. महिलांच्या अंगी अनेक चांगले गुण आहेत. ते सादर करण्यासाठी शिक्षक संघाने खूप सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच आदर्श पुरस्कार देवून महिलांच्या कामाची दखल घेतली आहे.” प्रमुख पाहुण्या म्हणून शालेय पोषण अधिक्षक वसुंधरा कदम पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कागलच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, शिरोळच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, करवीरच्या शिक्षण विस्तार अधिकारी अर्चना पाथरे उपस्थित होत्या.
पहिल्या सत्रातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळेतील महिला शिक्षिकांनी आपल्या कौटुंबिक व शैक्षणिक जबाबदारीतून स्वतःसाठी वेळ काढत उत्कृष्ट कलाविष्कार सादर केला यामध्ये एकूण १८ ग्रुप डान्स सादरीकरणाबरोबरच २६ शिक्षिकांनी कराओके वर सुंदर अशा नव्या जुन्या गाण्यांचे गायन केले.
शिक्षक संघाच्या महिला आघााडीच्या पदाधिकारी श्वेता खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. अनिता निटवे,स्मिता डिग्रजे, नसिम मुल्ला, नीता ठाणेकर, नूरजहाँ मुल्लाणी, वर्षा सनगर, जोत्स्ना महात्मे,जयश्री गोरवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मनीषा एकशिंगे, अलका कारंजकर,प्रमिला कुंभार व शिवनंदा लहाने यांनी सूत्रसंचालन केले. लता नायकवडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी शिक्षक संघाचे सर्व कार्यकर्ते ,जिल्हा,तालुका पुरुष- महिला कार्यकारिणीने परिश्रम घेतले.
(फोटो ओळी-जिल्ह्यातील महिला शिक्षकांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान करताना वेतन पथकाच्या अधीक्षिका वसुंधरा कदम पाटील,सोबत अनिता निटवे,नसीम मुल्ला,भाग्यश्री कोळी, शकुंतला वरुटे, मनीषा देसाई, श्वेता खांडेकर,स्मिता डिग्रजे, लता नायकवडे आदी.)










