पुरोगामी विचारांच्या धाग्याने जुळली शतजन्माची लग्नगाठ! अनाथालयात अनिल व स्नेहा कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह आहेरातून समाजउपयोगी वस्तू स्वीकारत समाजाला दिल्या दान! शाहूवाडीतल्या शिक्षकाचा संवेदनशील विचार जपणारा विवाहसोहळा.
पुरोगामी विचारांच्या धाग्याने जुळली शतजन्माची लग्नगाठ!
अनाथालयात अनिल व स्नेहा कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह
आहेरातून समाजउपयोगी वस्तू स्वीकारत समाजाला दिल्या दान!
शाहूवाडीतल्या शिक्षकाचा संवेदनशील विचार जपणारा विवाहसोहळा
कोल्हापूर/मारुती फाळके
हल्ली विवाह म्हटलं की भरमसाठ खर्च..भव्य डामडौल.. वर आणि वधू पक्षांकडील मंडळींचा हौस-मौज असा आनंदाचा उत्सव असतो.पण या सगळ्या गोष्टींना फाटा देत शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील अनिल कांबळे आणि स्नेहा चौधरी यांनी अनाथालयात सत्यशोधक पध्दतीने लग्न करून, लग्नाला समाजात प्रबोधन करणाऱ्या साहित्यपर आहेराचा स्वीकार करून सॅनिटरी नॅपकिन ग्रामीण भागासाठी व शैक्षणिक साहित्य अनाथलयाला भेट देत पुरोगामी विचारांची कास धरत विधायक पध्दतीने विवाह करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
अनिल कांबळे व स्नेहा चौधरी दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत. अनिल कांबळे हे शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम नांदारी धनगरवाडा व स्नेहा चौधरी या वारूळ पैकी कांबळेवाडी शाळेत शिक्षण सेविका म्हणून कार्यरत. स्नेहा चौधरी या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील किटाळी ता.चिमूर इथल्या.कोल्हापूर पासून शेकडो किलोमीटर अंतर.स्पर्धा परीक्षेतून त्यांनी त्या ७ महिन्यांपूर्वी शाहूवाडी तालुक्यात सेवेत रुजू झाल्या आहेत.त्यांच्यावर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव.प्रगल्भ वाचन,व्यासंग,विचारांची पक्की बैठक. २ वेळेस त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आहे.सध्याही त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत.
तर अनिल कांबळे हे सुद्धा याच मुशीतले बिनीचे कार्यकर्ते.उपक्रमशील-आदर्श शिक्षक,अनेक पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय लघुचित्रपटांचे पारितोषिक विजेते.शासनाच्या वेगवेगळ्या स्पर्धेत सन्मान मिळवलेले शिक्षक. स्वतः सामाजिक कार्यकर्ते.. धनगरवाडे-वंचित-शोषित-उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी काम करणारा अवलिया शिक्षक.
दोघांची ओळख नवनियुक्त प्रशिक्षणातून झाली..ओळखीचे रूपांतर.. विचारांत झाले..आणि दोघांचे भावविश्व जुळले..परिवर्तनवादी चळवळीत काम करण्याचा दोघांचाही पिंड..या ओळखीला शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार यांचा आशीर्वाद लाभला आणि दोघांच्याही जीवनाचे सूत जुळले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला लग्न करायचे असा दोघांनीही विचार प्रत्यक्ष कृतीत आणला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. दोघांच्याही घरची दोघांनीही संमती घेऊन सत्यशोधकी पद्धतीने विवाह विधीवत पार पडला. तो ही शून्य खर्चात. आणि हा सारा सोहळा घडवून आणला शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी. त्यांच्या पुढाकारातून हा सोहळा बालकांचा अनाथाश्रम असलेल्या रामनगर शिये ता.करवीर इथल्या करुणालय बालगृह शतजन्माच्या गाठी जुळल्या. संवेदनशीलतेच्या सावलीत नवं नातं उमललं.
गटशिक्षणाधिकारी सुतार व त्यांच्या पत्नी वैशाली सुतार यांनी वधू स्नेहा चौधरीचे पालकत्व निभावलं. स्वतःच्या घरातून वधूला तयार करून
मोजक्या व्हराडासोबत चारचाकी वाहनातून घरापासून २५ किमी अंतरावरील कार्यालयात घेऊन आले. गटशिक्षणाधिकारी डॉ. सुतार यांनी वाहनाचे सारथ्य केले. एक अधिकारी किती संवेदनशील असू शकतो याचे दर्शन यानिमित्ताने घडले. चंद्रपूरहून आलेल्या मुलीला एकटेपणा जाणवू नये म्हणून तिचे आईवडील बनून भक्कम आधार दिला. या अनोख्या विवाह सोहळयात व्हराडी बनले होते, प्राचार्य डॉ.जी.पी.माळी, डॉ.प्रविण चौगले,अनिस चे कृष्णात कोरे,वैशाली सुतार सगळेच परिवर्तनवादी विचाराने भारावलेले.विश्वास सुतार हे शिक्षकी पेशामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेले. समाजभान” समूहाचे संस्थापक आणि संवेदनशील काळीज असणारा अधिकारी.
या विवाह सोहळयात एका संवेदनशील वृत्तीच्या अधिकाऱ्याचे अनोखे दर्शन घडले. खरं तर, गटशिक्षणाधिकारी म्हणजे शाळांची देखरेख, शिक्षकांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे. मात्र नोकरीच्या पलीकडे जाऊन सुतार यांनी शिक्षकवर्गांशी एक बंधुत्वाचं, मार्गदर्शकाचं नातं निर्माण केले आहं. शिक्षकांच्या अडचणी दूर करणं, वैयक्तिक जीवनातील काही समस्या जाणून घेणे, त्याची सोडवणूक करणं यासाठी ते प्रयत्नशील असतात. अधिकारी म्हणून रुबाब मारणारे नव्हे तर, जीव जोडणारं व्यक्तिमत्व. त्यांनी, या त्यांनी या विवाहाला केवळ संमतीच दिली नाही तर हा विवाह घडवून आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. मंगलकार्य घडवून आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी नियोजित वधू आणि वर यांच्यात डोळसपणे चर्चा घडवून आणली. विवाह करण्याचे ठरविले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती. यादिनी ‘समता आणि विवेक’ यांच्या साक्षीने विवाह घडवून आणला. बालकांचे अनाथाश्रम असलेल्या करुणालय बालगृह येथे हा विवाह सोहळा झाला. नव्याने शिक्षक बनलेल्या जोडीस खर्चाची तोशीस लागू नये याची काळजी घेतली. म्हणून विवाह शून्य खर्चात करायचं ठरलं. सत्यशोधकी पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव कृष्णात कोरे व सुतार पती-पत्नी यांनी पौराहित्य केले. प्राचार्य माळी यांनी नव्या दांपत्याला आशीर्वाद दिले. सध्याच्या महागाईच्या काळात अतिशय कमी खर्चात विवाहाचा हा आनंदसोहळा साजरा करता येतो याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी समाजाला घालून दिला.
विशेष म्हणजे या नवं-दाम्पत्याने अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करताना ‘करुणालय बालगृह’ मधील विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजनाचा आनंद देऊन व या विद्यार्थ्यांना वह्या,पेन,सॅनिटरी नॅपकिन आदी शैक्षणिक व नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करून एक आदर्श व अनुकरणीय विवाह सोहळा संपन्न केला.
या विवाहप्रसंगी नव वधू-वरास शुभेच्छा देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मोजकी मंडळी उपस्थित होती.
विवाहात आहेर म्हणून सॅनिटरी नॅपकिनसाठी आवाहन करणारे हे प्राथमिक शिक्षक दाम्पत्य त्यांच्या प्रबोधनपर विचारासाठी आदर्श ठरले.विशेष म्हणजे मुलांच्या अनाथ आश्रमात o बजेट खर्च करून सत्य शोधक पध्दतीने विवाह करून पुरोगामीत्व जपले.
कांबळे वधू – वर दोघेही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असल्याने ते आपला विवाह अगदी धुमधडाक्यात साजरा करू शकले असते, परंतु मुळातच समाजबंध जपून सामाजिक कार्य करण्याचा पिंड असलेल्या या शिक्षक दाम्पत्याने रूढी- परंपरांना छेद देत सत्यशोधक पद्धतीने विवाह साजरा केला.
.या नावीन्यपूर्ण व आगळ्यावेगळ्या समाजभान जपणाऱ्या विवाहाला शाहूवाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार,ज्येष्ठ विचारवंत प्रा.जी. पी माळी,शिवाजी रोडे,संजय जगताप, दशरथ आयरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
हा आगळावेगळा सत्यशोधक विवाह साठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णात कोरे व वैशाली सुतार यांनी पुरोहित म्हणून काम पाहिले… विशेष मुलांच्या अनाथ आश्रमात विवाह संपन्न करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला या आश्रमातील विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
प्राथमिक शिक्षक असणाऱ्या या नवविवाहितांनी घालून दिलेल्या नव्या पायंड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट-
समाजासाठी नेहमी कष्टत राहणार!
हल्ली लग्नामध्ये आहेर म्हणून गृहउपयोगी वस्तू किंवा आर्थिक रक्कम स्वीकारली जाते. परंतु आम्ही दोघांनीही वही- पेन व सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठी आवाहन केले. मिळालेले साहित्य ते समाजासाठी बहाल करणार आहे. ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत पुरवत आहे.अजूनही ग्रामीण भागात याबद्दल अज्ञान आहे.या विधायक उपक्रमाला लोकांचं सहकार्य मिळावे यासाठी आपल्या विवाहात सॅनिटरी नॅपकिन आणण्यासाठी आवाहन केले. विवाहात सॅनिटरी नॅपकिन वही व पेन असं शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं हे साहित्य गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणार आहे.
सौ.स्नेहा,श्री.अनिल कांबळे
नवविवाहित शिक्षक दाम्पत्य
फोटो ओळी-
१.रामनगर ,शिये ता.करवीर येथील अनाथालयाला विवाहानिमित्त शैक्षणिक साहित्य देताना नवविवाहित अनिल व स्नेहा कांबळे, सोबत अनाथालयातील विद्यार्थी व मित्रपरिवार.
२.नवविवाहित अनिल व स्नेहा कांबळे यांना सत्यशोधक पद्धतीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देताना गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, वैशाली सुतार,सोबत अनिल व स्नेहा यांचे कुटुंबीय.










