मानवतेचं संचित आणि संवेदनातीर्थ- डॉ. सुनीलकुमार लवटे.अमृतमहोत्सवी वाढदिवस-विशेष लेख
मानवतेचं संचित आणि संवेदनातीर्थ- डॉ. सुनीलकुमार लवटे
आज अमृतमहोत्सवी वाढदिवस
विशेष लेख
मारुती फाळके/कोल्हापूर
संबंध देशाला समतेचा विचार देणाऱ्या ऐतिहासिक कोल्हापूरच्या पुरोगामी भुमीत जडणघडण झालेले निर्मोही, निरामयी, व्रतस्थ कर्मयोगी,आदर्श शिक्षक, कुशल प्रशासक,प्राचार्य,उन्मेष शालिनी प्रतिभा लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक,संपादक, समाजउद्धारक, चिंतनशील आणि प्रयोगशील व्यक्तिमत्त्व,अनेक वंचित, शोषितांचे आधारवड,समस्तांचे संवेदनातीर्थ डॉ.सुनील कुमार लवटे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस वैचारिक आणि कृतिशील कार्यक्रमाने संपन्न होत आहे त्यानिमित्त……..
प्रसंग २०१० सालचा. साहित्य निवास कॉलनी उजळाईवाडी इथल्या ज्येष्ठ साहित्यिक, गुरुवर्य प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या घरी भेटीसाठी गेलो असताना नलगे सरांच्या घरी लवटे सर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांची भेट झाली. या वर्षी झालेली अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणूक नलगे सरांनी लढवली होती. या निवडणुकीत साहित्यिक, तत्कालीन दै.सकाळचे संपादक उत्तम कांबळे निवडून आले होते. आणि कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठानने अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सत्कार करायचे नियोजन केलेले.या कार्यक्रमासाठी निवडणूक लढलेले नलगे सरांना निमंत्रण देण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे व लवटे सर आले होते. अनौपचारिक चर्चेला सुरुवात झाली आणि या तीन दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या सानिध्यात सुरू असलेली चर्चा मी नवखा शांत बसून ऐकत होतो. समोरून कोल्हापूरच्या नितळ संस्कार-संचित , विनम्रता असणाऱ्या आदर्शाचे बोलणे मी शांतपणे ऐकत होतो. संवाद एका जिव्हाळ्याच्या लयीवर गेला होता. लवटे सरांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या मृदू, विनम्र शब्दांचा- अतिव जिव्हाळा असणाऱ्या एकूण संवादाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो.
नलगे सरांनी मोठ्या मनाने उत्तम कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी येण्याचे आमंत्रण स्वीकारले आणि डॉ.लवटे आणि चंद्रकुमार नलगे यांची झालेली गळाभेट आठवली की आजही मला गलबलायला होते,कारण पुरोगामी विचार असणाऱ्या या तिघांमधल्या पक्क्या वैचारिक बैठकीचे हे बंध होते. कारण साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत पराभूत झालेला उमेदवार लवटे सरांना ‘कार्यक्रमाला येणारच’ असे सांगणे हे कोल्हापूरचे पुरोगामीत्व ठळकपणे अधोरेखित करणारे होते.म्हणूनच ही समतेची भूमी संबंध देशाला आणि देशाबाहेर ज्ञात आहे., हे लवटे सरांच्या लाघवी आणि विनम्र विचारांच्या मुशीतून प्रतीत होत होते.
हा संवाद-सहवास अनुभवताना या तिन्ही विचारवंत माणसांच्या चेहऱ्यावर झळकलेले हास्य आणि डोळ्यातील चमक ऋणानुबंध घट्ट करणारे होते.
महाराष्ट्राचं साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या कोल्हापूरच्या या दोन साहित्यिकात असलेले वैचारिक बंध हे माणूसपण अधोरेखित करणारे होते. आणि आजही आहेत.,विलक्षण नम्रता आणि साधेपणा हे लवटे सरांचे गुण यामुळे मला ते अधिक भावतात.
बापमाणुस
लवटे सर अनाथ म्हणून जन्माला आले असले तरी समाजातील अनेक वंचित, शोषित, पिडीत, अनेक रंजल्या गांजलेल्यांचे आधारवड म्हणून आजही कार्यरत आहेत.कोल्हापूर च्या रिमांड होम चे बालकल्याण संकुलामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांनी उपसलेले कष्ट आणि केलेला त्याग आजही समाज जाणून आहे.निराधाराना आधार देण्यासाठी हा ‘बापमाणूस’आजही अचल उभा आहे. आजही महाराष्ट्रातील कित्येक संस्थांचे ते प्रेरणास्रोत, ऊर्जास्रोत आहेत. कोणताही आवाज न करता कित्येक सामाजिक संस्थांना त्यांनी ‘हात’ दिला आहे.
स्मृतीसंग्रहालयाचे निर्माते
बहुआयामी लवटे सर महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीला लाभलेले प्रतिभावंत साहित्यिक आणि थोराप्रति संवेदना जागृत ठेवणारे चिंतनशील नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांच्या स्मृतीसंग्रहालयाचे निर्माते म्हणून लवटे सरांना संबोधले जाते. दातृत्व -कर्तृत्व -नेतृत्व या त्रयींचा संगम असलेले,उन्मेषशालिनी प्रतिभा लाभलेले साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या विचारसंकल्पनेतुन कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व शिरोडा येथे वि.स.खांडेकर स्मृतीसंग्रहालय, ‘वडघर’ येथे साने गुरुजी स्मृतीसंग्रहालय, तसेच बावची येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृतीसंग्रहालय, तसेच नाशिक येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीसंग्रहालय निर्माण करण्यात डॉ. लवटे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. थोरा मोठ्यांची स्मृतिस्थळे निर्माण व्हावीत, यासाठी लवटे सरांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीतून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व हे महाराष्ट्राला लाभलेले एक दीपस्तंभ आहेत.
साने गुरुजी यांचे सानिध्य व वि. स.खांडेकर यांचा सहवास
डॉ.लवटे यांना महाराष्ट्रातील थोर साहित्यिक साने गुरुजी यांचे सानिध्य लाभले तर विद्यार्थीदशेत व नोकरीत कार्यरत असताना मराठी साहित्य सृष्टीतील उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स खांडेकर यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. यामुळेच वि. स. खांडेकरांच्या साहित्याचा प्रभाव लवटे यांच्या साहित्यातून उमटतो.
अनेकविध साहित्यप्रकारात ‘प्रतिभेची’ मुशाफिरी
मराठी साहित्यातले अनेकविध साहित्यप्रकार लवटे यांनी लीलया हाताळले. मराठी साहित्यसृष्टीतील कथा, कादंबरी,लघुनिबंध, रुपककथा,पटकथा, संपादन, अनुवाद,भाषणे, मुलाखती असे अनेक साहित्य प्रकार लीलया हाताळले. प्रतिभेच्या प्रांतात व्यासंग आणि सजग लेखणीने नेहमीच वाचकाच्या मनाचा ठाव घेतला आहे. संवेदनशील मनाच्या या साहित्यकाने नेहमीच समाजप्रबोधनाचा वसा, वारसा आणि विचार सातत्याने लावून धरला आहे.आणि त्यातुन नवे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे. हिंदी हा विषय लवटे सरांच्या जिव्हाळ्याचा विषय.त्यामुळे हिंदी भाषेतही त्यांनी विपुल साहित्य संपदा निर्माण केली आहे.त्यांचे मराठी,हिंदी,इंग्रजी, गुजराती, आणि अगदी ब्रेल भाषेत सुद्धा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत; हे त्यांच्या साहित्य लेखनाचे वेगळेपण आहे.
‘ खाली जमीन आणि वर आकाश’या आत्मचरित्रातून ओथंबलेले डोळे आणि चिरलेले काळीज समस्त वाचकांनी अनुभवलेले आहे.
नुकतेच लवटे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अठरा खंडांचे संपादन करण्याचा विक्रम करून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे साहित्य प्रकर्षाने उजेडात आणले आहे. वयाच्या ७५ रीतही त्याच जोशाने, उत्साहाने लवटे सर आजही लिहीत आहेत.. चालत आहेत …बोलत आहेत..नवं संचित पेरत आहेत.!
लवटे यांच्या साहित्यातून
नवमानवतावादाचे उत्कट दर्शन
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या समग्र साहित्यामधून मानवी जीवनातील अनेक हिंदोळ्यांचे यथार्थ चित्रण आणि वर्णन साक्षेपीपणाने आढळते. त्यांच्या साहित्यामध्ये मानवतावादाची व्यापक संकल्पना व मानवतावादाचा व्यापक सार प्रतिबिंबित होतो.म्हणूनच लवटे सरांचे साहित्य हे पुरोगामी महाराष्ट्राच्या, समस्त वैचारिक आणि सामाजिक कृती करणाऱ्या मंडळींना दिशादर्शक आहे.
लिहिता हातांना बळ देणारा ऊर्जास्रोत!
डॉ.लवटे सर म्हणजे अनेक नवसाहित्यिकांना घडवणारे चालते बोलते विद्यापीठ आहे. पाठीवर थाप टाकणारा हा अखंड ऊर्जास्त्रोत तितक्याच साधेपणाने प्रत्येकाशी एकरूप होतो. कोणीतरी नवतरुण काहीतरी निर्माण करतोय, लिहितोय, सरांचं मार्गदर्शन- सहकार्य मागतोय अशा कित्येकांसाठी सुनीलकुमार लवटे हे दानाची शिदोरी भरभरून राहिलेले अखंड ऊर्जास्त्रोत आणि दानाचा संचय केलेले निर्मोही व्यक्तिमत्व म्हणून अनेक तरुणांना भावतात. समाजामधील अनेक नवसाहित्यिक,तरुण,कोणीतरी गरजू,उपेक्षित,वंचित लवटे यांच्याकडे काहीतरी मागण्यासाठी जाऊ देत अशा कित्येकांना बळ देण्यासाठी लवटे सर हे अखंड ऊर्जास्रोत आहेत. नवी पिढी, नवमानवतावाद घडवण्यासाठी लवटे सर आजही क्रियाशील आहेत. हे त्यांचे मोठेपण,विनम्रता, पाठीवर थाप टाकण्याचा अंतस्थ गुण माझ्यासारख्या कित्येक नवसाहित्यिकांनी ‘याची देही याची डोळा, अनुभवले आहे.
आजवर मिळालेले सर्व सन्मान.. समाजहिताला
प्रतिभावंत साहित्यिक डॉ. लवटे यांनी निर्माण केलेल्या मराठी- हिंदी साहित्यसृष्टीतील साहित्यिकृतीने आजवर अनेक मानसन्मान पुरस्कार मिळाले. आजवर मिळालेल्या सर्व पुरस्कारांची रोख रक्कम, सन्मान त्यांनी समाजहितासाठी खर्च केले आहेत.समाजहितासाठी अर्पण केले आहेत.
कोल्हापूरच्या सुपुत्राचा सन्मान उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने देणारा देण्यात येणारा हिंदी साहित्य सभेचा देशातील सन्मानाचा ‘सौहार्द सन्मान पुरस्कार डॉ.लवटे यांना देण्यात आला.या पुरस्काराच्या रोख रकमेसह, आजवर मिळालेल्या प्रत्येक पुरस्काराची रक्कम त्यांनी सामाजिक चळवळीसाठी, सामाजिक कार्यासाठी,कृतीसाठी दान दिलेली आहे. या त्यांच्या दानातून आज समाजामध्ये अगणित, आवाज न होता, चिरंतन देखणे सामाजिक चित्र निर्माण होण्यास, सामाजिक विचारांची पेरणी करण्यास आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
वंचित शोषितांचा आधारवड
डॉ. सुनीलकुमार लवटे हे कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्याच संस्थेत शिक्षक होते. सेवेच्या कालावधीत त्यांनी कित्येक गरजू, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत तर केलीच. अनेकांच्या शैक्षणिक फी भरल्या, राहण्या खाण्याची सोय केली, कित्येकांना आर्थिक पाठबळ दिले, अनेकांना स्वतःच्या पायावरती उभे करून यशस्वी जीवनाचा मूलमंत्र दिला.आजही लवटे सरांच्या सानिध्यात घडलेले त्यांचे अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहून यशस्वी जीवन जगत आहेत. अशा अनेक वंचित- शोषितांचा-गरजूचा आधारवड म्हणून डॉ. सुनीलकुमार लोटे यांच्याकडे पाहिलं जात. कोल्हापुरातील रिमांड होम चे बालकल्याण संकुलामध्ये रूपांतर करण्यामध्ये तसेच अनेक विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीमध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सामाजिक कार्यासाठी १ कोटी
अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त कोल्हापुरातील सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार गौरव समितीने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले. शिक्षण परिषद, लेखक आपल्या भेटीला तसेच अनेक सामाजिक आणि वैचारिक मंथन घडवणारे उपक्रम पार पडले. यामध्ये प्रसिद्ध विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे व्याख्यान झालेल्या कार्यक्रमांमध्ये डॉ. सुनीलकुमार लवटे व कुटुंबीयांनी सामाजिक कार्यासाठी एक कोटी देऊ केले.आयुष्यभर जमा केलेल्या पुंजीतून १ कोटी समाजासाठी देऊ केले.आज समाजामध्ये सगळीकडे -इतरत्र i don’t know , whats going on अशी परिस्थिती असताना लवटे यांनी ज्या समाजातून आपण पुढे आलो,त्या समूहाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक कार्यासाठी दिलेले १ कोटी रुपये हे निश्चितच आजच्या मोह माया जालातील भवतालासाठी उद्बोधक आहे. हे निश्चित!
जीव लावणारा गोतावळा!
लवटे यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस आजही लवटे सरांचा होऊन जातो.त्यांच्या सहवासात आलेली महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील कित्येक त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी लवटे सरांचा गोतावळा समृद्ध समृद्ध असल्याची अनुभूती देतात. लवटे सरांना मानणारा शिक्षकवर्ग, समाजातील कृतिशील वर्ग,सामाजिक संस्था, सुनीलकुमार लवटे यांचा मित्रपरिवार हा समृद्ध आणि तितक्याच संस्कारसंचिताने आशयघन झालेला आहे.
समाजातील अनेक शैक्षणिक चळवळींना बळ
डॉ. लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर आणि कोल्हापूर बाहेरील जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक संघटित होऊन शिक्षणातील नवे विचार, प्रवाह समजून घेण्यासाठी कार्यरत आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली पक्की बैठक आणि पक्के व्यासपीठ निर्माण केले आहे. यामध्येच क्रिएटिव्ह टीचर फोरमच्या नावाखाली, सरांच्या मार्गदर्शनाने क्रिएटिव्ह टीचर फोरमची नवी शैक्षणिक चळवळ कोल्हापूर आणि कोल्हापूरबाहेरील जिल्ह्यात शिक्षणामध्ये नवे विचार, नवे प्रवाह स्वीकारण्याचा,अंगिकरण्यासाठी क्रियाशील आहे.
लवटे सर,
आयुष्याच्या उतरणीला त्याच जोमाने, त्याच आत्मविश्वासाने, त्याच नवप्रेरणेने उतरत असताना आपल्या संस्कार संचितातून नवसंस्काराची प्रेरणी नव्या जोमाने होत राहू दे.
सर आपण आपल्या पायामधले बळ तेवढे वाढवत जा..
आपल्या पायाचे ठसे निश्चित येणारा भविष्यकाळात गडद होतील.वंचिताकडून संचिताकडे त्याग आणि समर्पण भावनेने असलेला आपला प्रवास निश्चितपणाने ऊर्जस्वल आहे.
याच मुशीतून समाजामध्ये आपल्या विचारांची.. संस्कारांची आणि संचिताची पेरणी होईल, याच सदिच्छेसह आपणास अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! शतायुषी व्हा!
————————————————————-
लेखन आणि संपादन-मारुती फाळके,कोल्हापूर.










