शिक्षक बँकेच्या सभासदांसाठी कर्जाच्या नवीन ३ योजना सुरू -चेअरमन शिवाजी रोडे-पाटील
शिक्षक बँकेच्या सभासदांसाठी कर्जाच्या नवीन ३ योजना सुरू -चेअरमन शिवाजी रोडे- पाटील
नियमित कर्ज नं २- ९.५% दराने देण्याचा निर्णय
वचनपुर्तीच्या दृष्टीने संचालक मंडळाचे दमदार पाऊल
कोल्हापूर/ मारुती फाळके
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखरसंस्था असलेल्या दि. प्राथमिक शिक्षक बँकेत सभासदांसाठी कर्जाच्या अभिनव ३ योजना सुरू करण्याचा निर्णय सत्ताधारी संचालक मंडळांनी घेतला असून दिनांक २१ सप्टेंबर पासून शिक्षक बँकेच्या सर्व शाखांत ३ नव्या योजना सुरू केल्याची माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे- पाटील यांनी दिली.
नुकतीच शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यामध्ये सत्ताधारी संचालक मंडळाने सभासदांना शब्द दिल्याप्रमाणे पगार तारण रेग्युलर कर्ज नं-२ रक्कम दहा लाखास ९.५% व्याजदराने देण्याची पहिली योजना सुरू केली आहे.
तसेच दुसऱ्या योजनेत बँकेकडे पगार खाते असणाऱ्या सभासदांना रुपये ८ लाखाचे क्लीन कॅश क्रेडिट कर्ज ३ वर्ष मुदतीने १०% व्याजदराने उपलब्ध केले आहे.
तिसऱ्या अभिनव योजनेत शिक्षण सेवक सभासदांची आकस्मिक कर्ज मर्यादा ३ लाखावरून ५ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नोकरीत नव्याने रुजू झालेल्या शिक्षणसेवक सभासदांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि निकडीचा निर्णय होण्यासाठी संचालक मंडळाने कृतीशील पाऊल टाकले आहे. वाढवलेल्या कर्ज मर्यादेमुळे शिक्षणसेवक सभासद बांधवांची कोणत्याही स्वरूपाची आर्थिक निकड या कर्ज योजनेनेतून भागवण्याची तरतूद या योजनेत केली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे बँकेची एकूण कर्ज मर्यादा ४० लाखावरून ५० लाख करण्यात आली आहे. सुकाणू समिती,सभासदांची सूचना व संचालक मंडळीने घेतलेल्या तीन अभिनव कर्जयोजनांमुळे पगार तारण रेगुलर कर्ज नंबर- २ ही योजना नव्यानेच अस्तित्वात आली असून या कर्जाचा व्याजदर नियमित कर्ज दारापेक्षा अर्धा टक्क्यांनी कमी आहे.क्लीन कॅश क्रेडिट कर्ज योजनेत सभासदांनी कर्जाचे केवळ व्याज भरून खात्याचे नूतनीकरण करावयाचे आहे. या योजनेस तीन वर्षे मुदत ठेवण्यात आली आहे.
सत्ताधारी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीने शिक्षक सभासदांना जाहीरनाम्यात दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करत असताना सभासद, सुकाणू समिती यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने अंमलात आणलेल्या कर्ज योजनेच्या ३ नव्या अभिनव कर्ज योजना लागू करून कर्जाचा व्याजदर अर्धा टक्क्यांनी कमी करून सभासदांना दसरा सणाच्या तोंडावर गोड बातमी दिली आहे. सत्ताधारी मंडळींनी जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाप्रमाणे वचनपुर्तीच्या दृष्टीने टाकलेले हे दमदार पाऊलच म्हणावे लागेल असे चेअरमन शिवाजी रोडे पाटील म्हणाले.
यावेळी शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश कोळी, संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर,शिवाजी बोलके, अमर वरुटे, रामदास झेंडे,एस व्ही पाटील, नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, गजानन कांबळे, गौतम वर्धन, महिला संचालिका पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, तज्ञ संचालक सुकुमार पाटील, आनंदा कांबळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.
चौकट-
“सर्व कर्जावरील व्याजदर एक अंकी करण्याकडे कृतिशील वाटचाल- चेअरमन शिवाजी रोडे-पाटील”
३ नवीन कर्ज योजना अंमलात येत असताना निवडणूकीच्या अगोदर राजर्षी स्वाभिमानी आघाडीने सभासदांना कर्जाचा व्याजदर एक अंकी करण्याचे वचन दिले होते, तो शब्द प्रत्यक्षात कृतीत आणण्याच्या दृष्टीने सत्ताधारी संचालक मंडळांने नियमित कर्ज नं २ मध्ये कर्जाचा व्याजदर एक अंकी करून एक ठोस पाहून टाकलेले आहे. उर्वरित कालावधीत येत्या दोन वर्षांमध्ये सर्वच प्रकारच्या कर्जावरील व्याजदर याचप्रमाणे एक अंकी करण्याचा संकल्प संचालक मंडळ करत असून तो निश्चितपणाने पूर्ण केला जाईल.










