June 5, 2026

शिक्षक संघाचे (शि.द.पाटील) उद्या जि. प. समोर मागण्यांसाठी आंदोलन- राजाराम वरुटे

0
IMG-20260524-WA0017(1)

शिक्षक संघाचे (शि.द.पाटील) उद्या जि. प. समोर मागण्यांसाठी आंदोलन-राजाराम वरुटे

कोल्हापूर/मारुती फाळके

प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) शाखा कोल्हापूर जिल्हाच्या वतीने सोमवारी (२५ मे) सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे राज्य सल्लागार, राज्य नेते राजराम वरूटे यांनी दिली.

संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या विविध प्रशासकीय आणि आर्थिक मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये २४ वर्षांनंतर मिळणाऱ्या निवडश्रेणी प्रस्तावांना तातडीने मंजुरी देणे, ५५ वर्षांनंतरच्या मुदतवाढ प्रस्तावांची निर्गत करणे, शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता वाढीसाठी बहिःस्थ परीक्षांना मान्यता देणे, तसेच सर्व संवर्गातील पदोन्नत्या TET निकष न लावता सेवाज्येष्ठतेनुसार देणे या मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय कुमार व कन्या शाळांच्या एकत्रीकरणामुळे शिक्षक व मुख्याध्यापक पदांमध्ये होणारी कपात थांबवावी, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, विषय शिक्षकांच्या वेतनत्रुटी दूर कराव्यात आणि रिव्हर्शन प्रक्रिया राबवावी, अशाही मागण्या संघटनेकडून केल्या आहेत.

संघटनेच्या मते, अनेक शिक्षक निवृत्त झाले तरी त्यांना निवडश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. तसेच ५५ वर्षांनंतरच्या मुदतवाढ प्रस्तावांतील विलंबामुळे पेन्शन प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. शैक्षणिक पात्रता वाढविणाऱ्या शिक्षकांचे प्रस्तावही प्रशासन स्तरावर प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला. सर्व पदोन्नत्या सेवाज्येष्ठतेच्या आधारेच व्हाव्यात, अशी मागणी करत संघटनेने अनुभवी शिक्षकांच्या अनुभवाचा लाभ प्रशासनाला होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच शाळा एकत्रीकरणाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील मंजूर शिक्षक संख्या कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलनानंतर आठ दिवसांत मागण्यांवर कार्यवाही झाली नाही, तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. “आता संघर्षाशिवाय पर्याय नाही,” अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
यावेळी संभाजी बापट,मनोज माळवदकर,बबन केकरे,प्रशांत पोतदार,बाजीराव कांबळे, राजमोहन पाटील,मारुती दिंडे,साहेब शेख,बजरंग लगारे, साताप्पा चोगुले,श्वेता खांडेकर,नसीम सनदी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!