May 14, 2026

समर्पण’भावनेच्या सेवेचा आदर्श वस्तुपाठ-अधीक्षक राजाराम फाळके.

0
IMG-20260418-WA0024(1)

समर्पण’भावनेच्या सेवेचा आदर्श वस्तुपाठ-अधीक्षक राजाराम फाळके.

सेवापूर्ती सदिच्छा गौरव सोहळा विशेष

भेडसगाव/मारुती फाळके

भेडसगावचे आनंदवन म्हणजे तात्यांनी स्थापिलेली आश्रमशाळा, समाजातील निराधार,वंचित,शोषित, गरीब -सामान्य कुटुंबातील मुलं शिकावीत, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडावा या उदात्त भावनेतून आनंद प्राथमिक आश्रम शाळेची स्थापना झाली.या आनंदवनाचे अधीक्षक आश्रमशाळेतील कित्येक अनाथांचे आई-बाप झालेले संवेदनशील, व्रतस्थ, कार्यकुशल अधीक्षक राजाराम फाळके आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल..तात्या नावाचं संवेदनातीर्थ राजाराम फाळके सरांसाठी उभं राहिलं आणि त्यांच्या आयुष्याचा सोनं झालं.

एकुलत्या एका लेकाला प्राध्यापक करण्यासाठी बापाने कॅनॉलचे दगड फोडले, आईने डोक्यावर वाळकं- कलिंगडाची बुट्टी घेऊन उन्हातानात रक्ताचे घास झेलले आणि मूलग्याला शिकवलं. मुलानेही गरिबीची जाणीव ठेवून परिस्थितीचे चटके सोसत MA पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले.थेट कुणाच्या तरी ओळखीने इस्लामपूर आताच्या ईश्वरपूर मध्ये नोकरीस सुरवात केली. संस्थेच्या प्रशासनाने ५-६ वर्ष बिनपगारी राबवून घेतले. जेव्हा सेवेत कायम करण्याची वेळ आली तेव्हा बेदखल केले. अशा संघर्षाच्या काळात मनामध्ये जीवन संपवण्याचा विचार येत असताना गावच्या मातीतील,शाहुवाडीच्या धवल क्रांतीचे शिल्पकार, अनेक गोर गरिबांचा आधारवड ‘तात्या’ नावाचं संचित उभं राहिलं आणि भेडसगावच्या आश्रमाशाळेत अधीक्षक म्हणून नोकरी दिली.

जीवनात कित्येक वेळा पायाला ठेचा लागल्या, पाय रक्तबंबाळ झाले, सारेच मार्ग संपले तिथे भेडसगावच्या ‘आनंदवनाचे’संचित कामी आले.
आचार्य जावडेकर हायस्कूल ते दरम्यानचा वाईट काळ आणि भेडसगावच्या आनंद आश्रमशाळेत हजर होईपर्यंतचा प्रवास साराच विलक्षण,उभारी देणारा ठरला. तात्या नावाच्या संचितामुळे फाळके सरांसारख्या कित्येकांच्या आयुष्याचं सोनं झालं.

शाळेतला पदभार हाती घेतल्यापासून पहिल्या दिवसापासून संस्थेच्या प्रगतीसाठी, पटसंख्यावाढीसाठी लक्ष घातले.बहुजनांची मुले शिकली पाहिजेत या भावनेने पायाला भिंगरी बांधली. शाळेच्या उभारणीत, प्रगतीत मोलाची भूमिका बजावली.विद्यार्थ्यांना मायेची उब अन आधाराचं वात्सल्य दिलं. शाळेत असताना कधी त्या मुलांसोबत आई व्हावं लागायचं कधी बाप,कधी भाऊ,बहीण कधी मित्र.शाळेत नवीन आलेल्या मुलाचा हंबरडा ऐकला तर सारा परिसर गरजायचा अशा परिस्थितीत सुद्धा कित्येकांना मायेची,आधाराची उब देत शिक्षणाची गोडी लावली.असे कित्येक विद्यार्थी आज उच्चपदस्थ पदावर जाऊन आपल्या कुटुंबाचा-समाजाचा उद्धार करत आहे.

कामात कधी कसूर नाही.कामावर निष्ठा,सचोटी,कार्यकुशलता,प्रामाणिकपणा, ज्या त्या दिवसाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण असा व्रतस्थपणा अंगी रुजवला.सेवेत असताना कोणती तक्रार नाही,डाग नाही,कोणता ठपका नाही. सचोटीने सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत.

नम्रपणाने समाजात, गावात कित्येकांना मार्गदर्शन करत त्यांनाही जीवनाची दिशा दाखवली.जिथं कधी वादाचा प्रसंग तिथं फाळके सरांचा ती परिस्थिती हाताळण्याची, शांत करण्याची हातोटी निराळीच.!कष्टातून उभं राहत त्यांनी सुद्धा आपलं कुटुंब उभा केलं.वडील काही वर्षांपूर्वी गेले.आई,एक भाऊ,दोन बहिणी,त्याचा संसार यांची जाणिवेने सेवा करत आहेत.त्यांची दोन्ही मुले उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहे आणि या कामात त्यांची पत्नी पद्मा फाळके काकी या ही खंबीरपणे पाठीशी उभ्या आहेत.कधी कुठली तक्रार नाही की कोणती कुरबुर.साऱ्या घराचं नंदनवन झालं आहे. गोकुळासारखं घर भरलं आहे.

पण आज हा सोहळा पाहण्यासाठी
राजाराम फाळके सरांना उभं करणारे आनंदराव पाटील तात्या आणि दगडाला टक्कर देणारा ‘बाप’गणपती फाळके आज या व्यासपीठावर असायला हवे होते,पण आज तरी शरीररूपाने ते इथे नसले तरी दोघांचाही आशीर्वाद या वातावरणात भरभरून आशीर्वाद देतो आहे,याचा क्षणोक्षणी भास होतो.
आचार विचारांचं अद्वैत फार कमी माणसांना जमतं आणि ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीचं भान असणं आवश्यक असतं.आणि मग जीवन त्यांना कळले हो|
मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो|
या कवी बा.भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती अशा व्यक्तिमत्त्वासाठी सार्थ ठरतात ते फाळके सर.
स्वीकारलेला पेशा त्या कर्तव्याशी बांधिलकी, सचोटी,समर्पण भावना यामुळे राजाराम फाळके सरांची सेवा निश्चित उल्लेखनीय आहे. माणसाच्या जीवनात संघर्ष जितका मोठा असतो तितकी त्या प्रवासाची फळे मधुर असतात.

फाळके सरासारख्या कित्येकांच्या आयुष्याचं सोनं झालं, पण राहून राहून जाणीव -संवेदना होतेय; या आनंद आश्रमशाळेचे संस्थापक आनंदराव तात्या.तात्या तुम्ही उभा केलेल्या अशा कित्येकांच्या सेवापुर्ती समारंभाला आपण आपल्या ‘लोकसेवेचे विद्यापीठ’ घेऊन आशीर्वाद द्यायला, पाठीवर थाप टाकायला आणि लढ म्हणून सांगण्याची प्रेरणा द्यायला हवं होता.

शेवटी फाळके सराबद्दल इतकंच म्हणावसं वाटतं

“आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे
जाता जाता पायामध्ये बळ तेवढे वाढवीत जावे पायामधल्या वाटा सुद्धा हळूहळू बदलत जातात
पाठीमागे मात्र ठसे उमटवून जातात
पाठीमागे मात्र ठसे उमटवून जातात.
या संस्थेचा जेव्हा जेव्हा इतिहास निघेल तेव्हा फाळके सर आपण केलेले कार्य विलक्षण-अजोड असेल.

सेवापुर्तीच्या या क्षणाला फाळके सर आपणास निरोगी आरोग्य, यश-कीर्ती, समाधान, चैतन्य, उदंड आनंद-जिव्हाळा, कौटुंबिक आणि शारीरिक सौख्य लाभो, अशी ग्रामदैवत नीलकंठेश्वर चरणी प्रार्थना करतो, आपणास सेवापुर्तीनिमित्त आभाळभर शुभेच्छा.!

—शब्दांकन-मारुती फाळके भेडसगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!