March 26, 2026

‘ऐसी जगह बैठ,कोई न कहे उठ’,नवसमाजनिर्मितीसाठी एकत्र यावे-सुनीलकुमार लवटे

0
IMG-20221011-WA0001

ऐसी जगह बैठ, कोई न कहे उठ !’ पुरोगामी-प्रतिगाम्यानी नवसमाज घडवण्यासाठी हातात हात घालावा –

ज्येष्ठ साहित्यिक,विचारवंत सुनीलकुमार लवटे 

अमृतमहोत्सवी वाढदिवस 

कोल्हापूर टाइम्स 24 प्रतिनिधी

कोल्हापूर/मारुती फाळके

        ‘कुछ सब्र किजीए…कुछ बर्दाश्त !

         और बहुत कुछ नजरअंदाज!!

        आयुष्यात ज्या ज्या लोकांनी मला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी समुद्र शोधत गेलो. स्वत:ला विसर्जित करुन दुसऱ्यांना मोठं करत राहिलो. भौतिक सुविधांची रेलचेल, सहापदरी रस्ता म्हणजे समाज विकासाचा महामार्ग नव्हे. उपेक्षित, वंचित घटक हा समाजाच्या मुख्य प्रवाहित सामील झाला तरच तो उन्नतीचा मार्ग ठरेल. यासाठी जातीधर्माच्या पलीकडे जाउन माणूस जोडला पाहिजे. आता पुरोगामी आणि प्रतिगामी अशी लढाई बस्स. दोघे मिळून नवे काही तरी घडवू या, नवमानवतावाद निर्माण करु या,आपली जागा अशी तयार करा की कुणालाही आपणाला त्या जागेवरून हलविण्याचे धाडस करता कामा नये.”

      संघर्षांनी भरलेला, नवनिर्मितीची आस लागलेला असा अस्सल जीवनानुभव प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या शब्दाशब्दांतून प्रकट होत होता आणि समाजातील वेगवेगळया क्षेत्रातील मंडळी हा सारा अनोखा जीवन प्रवास अनुभवत होते. शैक्षणिक, सामाजिक, संशोधन, साहित्य लेखन, अनुवाद प्रांत अशा विविध पातळयावर प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी आजवर केलेल्या कार्याचा गौरव म्हणून कोल्हापुरात नागरी सत्कार करण्यात आला. 

नागरी सत्कार सोहळा समितीच्यावतीने रविवारच्या सायंकाळी येथील संगीतसूर्य केशवराव भोसले येथे प्राचार्य लवटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पंतप्रधानांचे भाषा सल्लागार दामोदर खडसे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. वसुधा पवार यांच्या हस्ते रेखा लवटे यांचा सत्कार झाला.

याप्रसंगी लवटे यांच्या जीवनकार्य व साहित्यावर आधारित आठ ग्रंथांचे प्रकाशन झाले. प्राचार्य लवटे यांच्या सत्कार समारंभासाठी करवीरकरांनी नाट्यगृहात तुडूंब गर्दी केली होती. याप्रसंगी लवटे यांनी केलेले भाषण म्हणजे मुक्त चिंतन होते. त्यांनी सामाजिक व राजकीय स्थितीवर परखड भाष्य केले. राजकीय फायद्यासाठी समाजात, जातीधर्मात फूट पाडणाऱ्या राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर कडक शब्दांत प्रहार केला. ‘जातीधर्माच्या पलीकडचा विचार करुन सगळे लोक माणूस म्हणून एकत्र आले तर राजकारण्यांची राजकीय दुकानदारी कायमची बंद होईल’अशा शब्दांत समाज जोडोचे आवाहन केले.

जवळपास पाउणतासाच्या भाषणात लवटे यांनी व्यक्तिगत जीवनासह सामाजिक पातळीवर केलेल्या कार्याचा उहापोह केला. पंढरपूर येथील अनाथाश्रम, कोल्हापुरातील नोकरी व सामाजिक कार्याची सुरुवात, बालकल्याण संकुल, करवीरनगर वाचन मंदिर, शाहू स्मारक भवन, महावीर कॉलेज अशा वेगवेगळया संस्थेतील विविध टप्प्यावरील कामांची वस्तुनिष्ठ मांडणी केली.

…………..

खाली जमीन…वर आकाश हे आत्मचरित्र नव्हे समाजचित्रण

कोणताही आडपडदा न ठेवता, सहज सोप्या भाषेत त्यांनी उपस्थितांशी जणू हितगुज केले. लवटे म्हणाले, ‘‘खाली जमीन…वर आकाश’हे माझे व्यक्तिगत आत्मचरित्र नाही तर ते समाजचित्रण आहे. यातील व्यक्ती ही समाज प्रतिनिधी, वेदना ही प्रातिनिधीक आहे. यामुळे ती केवळ माझी कथा ठरत नाही.’असे स्पष्ट केले.

………..

‘ऐसी जगह बैठ, कोई न कहे उठ !’

सामाजिक पातळीवर काम करत असताना काही वेळेला कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागल्याचे खुलेपणाने सांगितले.“मात्र मी कोणावरही कधी राग धरला नाही, द्वेष केला नाही. इतरांनी मारलेल्या रेषेपेक्षा मी सतत लांब रेषा मारली, म्हणून आम्ही लांबपर्यंत आलो. सगळया गोष्टीवर काळ हा उत्तर असतो. माणसाकडे सभ्यता, संयम पाहिजे. हिंदी भाषेने मला जागतिक ओळख करुन दिली. आतापर्यंतचच्या वाटचालीत ज्या ज्या ठिकाणी, जे जे काम केलं ते प्रामाणिकपणानं. शेवटचा नटबोल्ट समजून कार्य पार पाडलं आणि जिथं पटत नाही तिथं पटकन सोडून बाजूलाही झालो. हे सूत्र मी आयुष्यभर जपलं. साऱ्यांनीच जीवनात एक सूत्र पक्क लक्षात ठेवावं, ते म्हणजे, ‘ऐसी जगह बैठ, कोई न कहे उठ !’ जग खूप मोठं आहे. स्वत: शून्य होउन सगळयांना सोबत घेउन काम करणं, समाज सुंदर बनविणं हे माझं स्वप्नं आहे.”

भारतीय स्वातंत्र्यलढा, महात्मा गांधी, महाराज सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची महती सांगत लवटे म्हणाले, ‘आपणाला विज्ञाननिष्ठ आणि अंधश्रद्धामुक्त समाज घडवायचं आहे. याकामी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य खूप मोठं आहे. खरं तर, समाज परिवर्तनाच्या इतिहासात महर्षीं शिंदे हे महात्मा फुले यांच्या विचारकार्याचे वंशज. मात्र शिंदे यांना न्याय मिळाला नाही. त्यांचे जीवनचरित्र, साहित्य हिंदीमध्ये प्रकाशित करत आहोत.”

………….

पत्नी साधी,त्यागी वृत्तीची म्हणून मी साधा

प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांचे संपूर्ण जीवन म्हणजे संघर्षशील. वेगवेगळया टप्प्यावर वेगवेगळया लढाया. भाषणात लवटे यांनी आयुष्याचा हा पट उलगडला. आतापर्यंतच्या वाटचालीत पत्नी रेखा यांच्या लाभलेल्या साथीचा आवर्जून उल्लेख केला. लवटे म्हणाले, ‘मी जो काही साधा आहे, साधेपणाने जीवन जगतो त्याचे कारण माझी पत्नी. विवाहावेळी पत्नी रेखाला एक तोळयाचे सोन्याचे गंठण केले. तिने कधीही कोणता हट्ट धरला नाही. नोकरी, सामाजिक संस्थेच्या कार्यात मी व्यस्त. लग्नानंतर कधी सिनेमाला गेलो नाही. कसले हौस केले नाही. कामातून उसंत नसायची. मात्र पत्नींने कधी तक्रार केली नाही. माझी पत्नी साधी, सरळ, त्यागी वृत्तीची. म्हणून मी ही साधा.” कौटुंबीक नातेसंबंधांचा पट उलगडताना लवटे यांचा कंठ दाठून आला. डोळयांच्या कडा ओलावल्या. याप्रसंगी सारे सभागृहही हेलावले.

……..

अजातशत्रू व्यक्तिमत्व, सामाजिक पातळीवर रचनात्मक काम

“प्राचार्य सुनीलकुमार लवटे म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व होय. साहित्य, लेखन, संशोधन क्षेत्रातील कामगिरी प्रेरणादायी आहे. जगण्याला उंचीवर नेणारे हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सामाजिक पातळीवर रचनात्मक काम केले. हा माणूस आताच्या पिढीसाठी अभिमानास्पद आहे.”असे गौरवोद्गार दामोदर खडसे व डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!