शाळा शाळामधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा जागर व्हावा -भारती कोळी
शाळा शाळामधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा जागर व्हावा – शिक्षण विस्तारअधिकारी भारती कोळी.
हातकणंगले येथे जि.प.महिला शिक्षिकांचा मेळावा उत्साहात संपन्न.
कोल्हापूर/मारुती फाळके
ज्या व्यवस्थेत स्त्रियांचा सन्मान होतो तिथे सामाजिक अभिसरण,सामाजिक संवाद आणि समता ही मूल्ये रुजलेली असतात असे म्हणतात,”नारी तू नारायणी,.स्त्री ही अबला नसून आज सबला झाली आहे, बंधिनी ही स्त्री ही बंधिणी,जन्मोजन्मीची कहाणी या गर्तेतून स्त्री ही कधीच बाहेर पडली असून तिने सर्व क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. नवरात्रोत्सव हा स्त्रियांच्या सन्मानाचा,आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण.शेतात राबणाऱ्या , काबाडकष्ट करणाऱ्या,गृहिणी पासून ते उद्योग – व्यवसायात राबणाऱ्या,नोकरी करणाऱ्या प्रत्येकीचाच हा उत्सव म्हणजे आनंदाला भरते.हाच उत्साह,उत्सव आणि या उत्सवाची नीतिमूल्ये ध्यानात घेऊन हातकणंगले पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाकडे कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षिकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी,समाज निर्मितीमध्ये आपली भूमिका, नवनिर्मितीची आस लागावी.,वैचारिक मंथन आणि आधुनिक विचारांचा जागर व्हावा या हेतूने नुकताच रामराव इंगवले हायस्कूल येथे महिला मेळावा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला,निमित्त होते नवरात्रोत्सवाचे..!
यावेळी उपस्थित महिला शिक्षिकांना मार्गदर्शन करताना भारती कोळी मॅडम म्हणाल्या, आदिअनादी काळापासून चालत आलेली सर्व बंधने महिलांनी झुगारली असून स्त्रिया ह्या परिवर्तनवादी विचारांचा अंगीकार करू लागल्या आहेत. या महिला मेळाव्यात शिक्षिकांच्या आनंदाला भरते आले असून रोजच्या व्यापातून आम्हालाही थोडी उसंत मिळावी,व्यक्त होण्याचे, आत्माविष्काराचे व्यासपीठ मिळावे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. तालुक्याच्या विविध केंद्रातून महिला शिक्षकांनी उपस्थिती लावत सक्रिय सहभाग नोदवल्याबद्दल त्यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.
त्या म्हणाल्या, शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करणे महत्त्वाचे आहे .कारण समाजात शिक्षकाला खूप उच्च दर्जाचे स्थान आहे. मुलांच्या हृदयामध्ये आपले स्थान असते. शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे दैनंदिन अध्यापनात विविध उपक्रमांचा, ई लर्निंग व शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपले अध्यापन प्रभावी करण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. शाळा भेटीमध्ये आलेल्या चांगल्याअनुभवांचा आणि कृतिशील शिक्षकांचे देखील त्यांनी कौतुक केले. शिक्षिकानी कुटुंब आणि नोकरी ही कसरत सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ; कारण “नारी ही नारायणी आहे”असेही त्या म्हणाल्या.
हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी जे. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “नवरात्र उत्सवानिमित्त हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद महिला शिक्षिकांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी अँड. दिलशाद मुजावर उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अँड. दिलशाद मुजावर म्हणाल्या, महिलांनी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वास्थ्य पूर्ण जीवन जगावे.नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळून नोकरी बजावावी.
कोरोना पेंडेमिक नंतर स्त्रियांची, मुलांची बदललेली मानसिकता, स्त्रियांचे आणि मुलांचे लैंगिक शोषण, पोक्सो कायदा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक दुर्घटना याविषयी अनेक घडलेल्या घटना व प्रसंग सांगून एक स्त्री आणि एक शिक्षिका म्हणून जागरूकपणे कसे वागले पाहिजे याचे खूप छान मार्गदर्शन केले. स्त्री ही घराचा, संपूर्ण कुटुंबाचा कणा असते त्यामुळे ती स्वतः निरोगी व सक्षम असायला हवी त्यामुळे तिने स्वतःच्या आहाराकडे, व्यायामाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे असेही त्या म्हणाल्या. येणाऱ्या भावी काळातील आव्हानांना एक स्त्री म्हणून सजगपणे सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अपडेट राहणे काळाची गरज आहे महिला सक्षमीकरण व सबलीकरण बाबत त्यांनी अनेक मुद्द्यांचा उहापोह केला. यावेळी चर्चासत्राचे आयोजनही केले होते. महिला शिक्षिकांच्या अनेक शंकांचे निरसन ॲड. मुजावर यांनी केले.
सदर महिला मेळाव्यासाठी संपूर्ण हातकणंगले तालुक्यातून महिला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अतिशय खेळीमेळीत व आनंदाच्या वातावरणात हा महिला मेळावा संपन्न झाला. सर्व महिला शिक्षिकांनी यानंतर गरबा व दांडिया खेळाचा आनंद देखील घेतला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अविस्मरणीय मेळाव्याचा आनंद सर्व महिला शिक्षिकांनी घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी, सूत्रसंचालन सुरेखा कुंभार व किल्लेदार मॅडम व आभार मनिषा कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामराव इंगवले हायस्कूल च्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.










