March 18, 2026

हातकणंगलेत सरशी कुणाची?सावध हालचाली पण वातावरण मतोउत्सवाचे!

0
IMG-20240325-WA0088(1)

हातकणंगलेत वातावरण तापले,धैर्यशील माने यांचा पत्ता कट होण्याचे संकेत,महायुतीतुन शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा,राजू शेट्टीना महाविकास आघाडीचे पाठबळ! अपक्ष उमेदवार लक्ष्मण तांदळे यांची जनसंपर्कात आघाडी

कोल्हापूर/मारुती फाळके

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाली असून,निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरीही अद्याप हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत,या उलट महाविकास आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे,धैर्यशील माने यांनीही आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर कामाचे घाईगडबडीत का होईना उदघाटने पार पाडली. हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चाना उधाण आले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दररोज नवीन नावे चर्चेत येत असल्याने हातकणंगले मतदारसंघातील वातावरण तापू लागले आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता या मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.अजूनही वंचित ने या मतदारसंघात आपली भूमिका जाहीर केली नाही,तर अपक्ष म्हणून अनेक नावे पुढे येत आहेत,यामध्ये युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक लक्ष्मण तांदळे निवडेकर यांनीही गावोगावी संपर्क यात्रा गतिमान केली आहे.

२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी दिल्लीतील शेतकऱ्याच्या आंदोलनात थेट नरेंद्र मोदी यांना आवाहन देत दंड थोपटल्याने मोदी लाटेत राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला होता.
याच मोदी लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी आपल्या वक्तृत्वाने मतदारांबर भुरळ पाडत थेट दिल्लीत धडक मारली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून शिवसेनेची तसेच राष्ट्रवादीचीही ही दोन शकले झाली,त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. मागील निवडणुकीत कोल्हापुरातील दोन्हीही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी गतसाली बंड केल्यानंतर कोल्हापुरातील संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोन्हीही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचरोबर राहणे पसंत केले त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून सध्या तरी या दोन्ही जागावर दावा सांगितला जात असला तरी महायुतीच्या एक्झिट पोल सर्व्हेत या दोन्ही जागा धोक्यात असल्याचे संकेत आहेत

केंद्रातील भाजप सरकारच्या रणनीतीनुसार अबकी बार ४०० पार ही घोषणा प्रत्यक्षात उतरण्यासाठी कोल्हापुरातील दोन पैकी एक मतदारसंघावर भाजपने आपला दाव सांगितला आहे, त्यापैकी हातकणंगले मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल आहे त्यामुळे भाजपने गेली तीन वर्षे या मतदारसंघात मजबूत संघटनात्मक पक्ष बांधणी सुरू ठेवली आहे. त्यासाठी गेली तीन वर्ष अनेक दिग्गजांना या मतदारसंघात विविध कार्यक्रमासाठी निमंत्रित केले जात आहे. केंद्रीय उड्डाण वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना या मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या निमित्त निमित्ताने आमंत्रित केले जात आहे. भाजपाने केलेल्या सर्वेमध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर बद्दल असलेली नाराजी पाहता हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास पर्यायी नावांचा विचार भाजपकडून केला जात आहे. मतदारसंघात महायुतीचे तीन आमदार असल्याने भाजपने आपले सहयोगी पक्ष जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. कोरे यांनी पत्रकार परिषद घेत आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले असल्यामुळे सध्या गोकुळच्या संचालिका, भाजप च्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शौमिका यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याचे दाट संकेत आहेत. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघात चार हजार दोनशे कोटी रुपयांची
कामे केली असल्याचा दावा करून वातावरण निर्मिती केली खरी पण उमेदवारी मिळण्यासाठी आता पुन्हा त्यांना नमो नमो करावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे गटातर्फे या मतदारसंघातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर तसेच शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांना मुंबईतून चर्चेसाठी बोलावले गेले होते त्यामुळे ऐनवेळी या तिघांपैकी. एकाची उमेदवारी शिवसेना उद्धब ठाकरे गटाकडून होऊ शकते अशी शक्यता होती,पण बंद दाराआड राजू शेट्टी यांना पाठबळ देण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे. एकंदर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट झाल्यास ते कोणती भूमिका घेतील यावरही लढतीचे चिन्ह अवलंबून असणार आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी वगळता सर्वपक्षीय पातळीवर शांतता दिसत असली तरीही दररोज चर्चेत येणाऱ्या इच्छुक नावामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वातावरण मात्र भलतेच तापू लागले आहे हे नक्की.

कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी पंधरा दिवसापूर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेऊन चालू असलेल्या घडामोडी बद्दल माहिती घेत दोन्हीही मतदारसंघ आपल्याकडेच ठेवून आम्ही
दोघेही लढत देण्यास असल्याचे सांगितले होते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मानणारे तीन आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मानणारा वर्ग ही मोठा आहे. मध्यंतरी त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील लोकसभेला उतरतील अशी चर्चा होत्या परंतु सध्या तरी महाविकास आघाडी तर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याच नावाची चर्चा आहे. राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा देत आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरूच ठेवली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विकासकामाचे नवे पर्व सुरू ठेवण्यासाठी एक नवा चेहरा उदयास येत आहे. युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, युवा नेते लक्ष्मण तांदळे मतदारसंघात निवडणुकीसाठी सज्ज आहेत. त्यामुळे आणखीन एक वंचित समाजातील कार्यकर्ता सहभागी झाल्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार असणार आहे. तांदळे यांनी या मतदार संघात लढणार असल्याचे जाहीर करत जनसंपर्क वाढवला आहे. राजकीय लोक,ग्रामीण भागातील लोकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ राखीव असल्या कारणाने लोकसभेला चांगले मतदान तांदळे यांना मिळू शकते असाही सूर जाणकाराकडून व्यक्त केला जात आहे.प्रस्थापितांच्या विरोधात लढत देण्यासाठी, बहुजनांना संधी मिळण्यासाठी मागासवर्गीय समाज आणि जोडलेल्या सामान्य माणसांच्या पाठबळावर त्यांनी मतदारसंघात राबता ठेवला आहे.
एकूणच हातकणंगले चा लोकसभा निवडणुकीचा पेपर कोणालाही सोपा नाही हे मात्र निश्चित!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!