‘संविधानाचा न्याय’……!अश्विनी बिरांजे च्या गळ्यात पडणार सभापतीपदाची ‘माळ’.हातकणंगले पं.स.सभापतीपदी अश्विनी बिरांजे ‘निश्चित’!
‘संविधानाचा न्याय’…….
अश्विनी बिरांजे च्या गळ्यात पडणार सभापतीपदाची ‘माळ’
हातकणंगले ‘सभापतीपदी’ अश्विनी बिरांजे निश्चित!
पट्टणकोडोली/प्रतिनिधी
अत्यंत चुरशीने झालेल्या हातकणंगले जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीत भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून ‘भाजपा’ कडे असलेल्या ‘बहुमत’ सदस्य संख्येमुळे ‘सभापती’ पदासाठी पट्टणकोडोली पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या अश्विनी अनिल बिरांजे यांची ‘सभापती’ पदी निवड होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पंचायत समितीचे सभापती पद ‘अनुसूचित जाती महिलां’साठी आरक्षित होते.
भाजपच्या पट्टणकोडोली गणातील उमेदवार अश्विनी बिरांजे पंचायत समितीवर बहुमताने निवडून आल्या असून त्याच सभापती होणार हे जवळपास निश्चित आहे.सर्वाधिक संख्याबळ असलेल्या त्या ‘भाजप’च्या अनुसूचित जाती प्रवर्गातील एकमेव दावेदार आहेत. शिंदे सेना ‘रुकडी’ गणातून निवडून आलेल्या माया लोखंडे याही अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. परंतु सर्वाधिक संख्याबळ असल्यामुळे पहिल्याप्रथम भाजपच्या अश्विनी बिरांजे यांच्या सभापती पदावर शिक्कामोर्तब झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
२ महिला दावेदार!
तालुक्याचे सभापतीपद अनुसूचित जाती महिला साठी आरक्षित आहे. पट्टणकोडोली मतदारसंघातील भाजपच्या अश्विनी बिरांजे आणि रुकडी मतदारसंघातील शिंदेसेनेच्या माया लोखंडे या दोन महिला सभापतीपदाच्या दावेदार असून भाजपकडे संख्याबळ असल्याने अश्विनी बिरांजे यांची सभापतीपदी वर्णी लागणार, ही केवळ औपचारिकता उरली आहे.
२२ सदस्य असलेल्या हातकणंगले पंचायत समितीवर गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने दोन-तीन घटक पक्ष एकत्र येऊन सभापती-उपसभापती निवडले जात होते. गत सभागृहात जनसुराज्य ६, भाजप ५, ताराराणी
आघाडी (आवाडे गट) ५, स्वाभिमानी ३, उद्धवसेना २ आणि काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल होते.कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती निवडीदरम्यान घोडेबाजार होत असल्याने अनेक वेळा सभापती निवड ही सोडत पध्दतीने झाली आहे.
तालुक्याच्या पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजप ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ‘महायुती’तील पक्षीय बलाबल भाजपचे ११, शिंदेसेना ५ आणि जनसुराज्य ३ सदस्य आहेत,महायुती तील घटक पक्ष भाजपला पाठिंबा देणार हे नियोजित आहे. महायुतीचे संख्याबळ १९ असून भाजपचा सभापती व उपसभापतिपद महायुतीतील शिंदेसेना किंवा जनसुराज्यला मिळण्याची शक्यता आहे.
——————————————————–
चौकट-१
संविधानाचा न्याय आणि सभापती पदाची माळ!
जगातील सर्वात मोठा लोकशाही ग्रंथ,आपल्या भारताच्या संविधानामुळे मातंग समाजातील या महिलेचा सभापती म्हणून सन्मान होणार आहे.,या संदेशाने पट्टणकोडोली पंचक्रोशीत आनंदाला उधाण आले आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून संविधानाचा मूलाधार न्याय,स्वातंत्र्य, समता आणि संधी यामुळेच हे शक्य झाल्याचे गौरवोऊद्गार तालुक्यातून तसेच पट्टणकोडोली पंचक्रोशीत बोलले जात आहे.अश्विनी बिरांजे यांना सभापती पदाची संधी मिळणार असल्यामुळे पट्टणकोडोली पंचक्रोशीत जनतेतून आनंदाला उधाण आले आहे.
—————————————————
चौकट-२
सामान्य घरातील महिलेला संधी!
पट्टणकोडोली पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सौ.अश्विनी बिरांजे या सामान्य कुटुंबातील असून त्यांचे पती अनिल बिरांजे हे पत्रकार व एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत.पट्टणकोडोली या जास्त मतदारसंख्या असलेल्या स्वतःच्या गावात अनिल बिरांजे यांचा गावातील प्रत्येक कुटुंबाशी स्नेह आहे. या पंचायत समिती गणांमध्ये प्रत्येक गावात माणसांशी जोडलेला ऋणानुबंध आहे.संवाद साधण्याची प्रभावी शैली, नम्रता, विनम्र स्वभावामुळे जोडलेली माणसे, माणूसपण जपणारे व्यक्तिमत्व, सुखदुःखाला धावून जाण्याची शैली,अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आणि मोक्याच्या क्षणी घेतलेला राजकीय निर्णय हे त्यांच्या पथ्यावर पडले.पट्टणकोडोली पंचायत समिती गणाला,आणि पट्टणकोडोली गावाला सभापती पदाच्या रूपाने हा पहिल्यांदाच हा बहुमान मिळणार आहे.










