सरूड जि प मतदारसंघात निकालाआधीच झळकले अमरसिंह पाटील-भेडसगावकर यांच्या अभिनंदनाचे फलक!
निकालाआधीच झळकले अमरसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचे फलक!
सरूड जि. प. मतदार संघात अमरसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचे बॅनर
भेडसगाव/ मारुती फाळके
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या सरूड जिल्हा परिषद मतदार संघातील ‘उबाठा’ गटाचे उमेदवार अमरसिंह पाटील -भेडसगावकर यांचे निकलापूर्वीच अभिनंदन फलक झळकले आहेत. हारुगडेवाडी येथील गटाच्या कार्यकर्त्यांनी झळकवलेल्या या फलकाने येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.माजी आमदार सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हा परिषद मतदार संघात उमेदवार अमरसिंह पाटील यांचे अभिनंदन फलक निकालापूर्वीच झळकले असून मतदारसंघात उत्साहाला उधाण आले आहे.
अत्यंत प्रतिष्ठेची लढत होत असलेल्या सरूड जिल्हा परिषद मतदार संघात १९७० सालापासून माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या गटाचा बालेकिल्ला आहे.या जि प मतदार संघातुन अमरसिंह पाटील यांनी झंझावाती प्रचार यंत्रणा राबवली.निवडणूक जाहीर झाल्यापासूनच घरभेटी, थेट संवाद, संपर्क दौरे,वैयक्तिक गाठी भेटी, मतदारसंघातील घर टू घर पिंजून काढले. यापूर्वी त्यांचे वडील हंबीरराव पाटील यांनी गेली वीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मतदार संघातील प्रत्येक गावागावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव विकास कामे केली आहेत. दांडगा लोकसंपर्क, अनुभव आणि कर्तुत्वाच्या पुंजीवर अमरसिंह पाटील यांनी गावनिहाय आपला संपर्क गतिमान करून मतदार मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण केले.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांनी या मतदार संघाचे २० वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघांमध्ये सातत्याने राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत गट तट न पाहता गावोगावी विकास कामे केली. पायाभूत सुविधा निर्माण केल्या.कृतिशील विचार आणि सकारात्मक दृष्टी असंणारे हंबीरराव पाटील यांचे सरूड जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गावात ऋणानुबंध व राजकारणाच्या पलीकडे जाऊन जोडलेली माणसे आहेत.याचा फायदा अमरसिंह पाटील यांना होणार हे वास्तव सत्य आहे.प्रभावी संपर्काच्या जोरावर अमरसिंह पाटील यांनी गेल्या ६ महिन्यापासून गावगावात राबता ठेवला होता. विशेष करून प्रचंड लोकसंपर्क आणि युवा वर्गात असलेली त्यांची क्रेझ ही त्यांची विजयाप्रत जाण्याच्या जमेच्या बाजू आहेत.सरूड मतदारसंघाच्या विकासाचे नेमके व्हिजन घेऊन ते लोकांसमोर गेले होते.
गेली ५ वर्षे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने कोणत्याही स्वरूपाचा विकासनिधी नसल्यामुळे गावागावातील विकास खुंटला होता.अमरसिंह पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचीच हा ध्यास घेतला होता,आणि अथक परिश्रमाने त्यांनी निश्चय पूर्ण केला.त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रारूप आराखडा तयार केला आहे.रस्ते, आरोग्य, पाणी या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणातुन गावागावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, पटसंख्या वाढ,भौतिक सुविधा, वैयक्तिक आरोग्याच्या सुविधा, गावगावात वॉटर एटीएम,नोकर भरतीचा अभ्यास करणाऱ्या युवावर्गाला अभ्यासिका, खेळाचे मैदान,व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,दलित वस्ती सुधारणा, महिला सबलीकरण व उद्योग व्यवसाय निर्मितीच्या अभिनव योजना,ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तालमीची डागडुजी अशा अनेक ग्रामीण विकासाच्या योजना राबवण्याचा संकल्प उच्चशिक्षित असणारे, अमरसिंह पाटील यांनी आपल्या आराखड्यातून ठरवल्याचे सांगितले.
———————————————————–
माझा विजय निश्चित-अमरसिंह पाटील
सरूड जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासासाठी माझा धोरणात्मक आणि रचनात्मक आराखडा तयार आहे. मतदारसंघातील जनतेने माझ्यासारख्या हायटेक विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाला मतदानातून भरभरून आशीर्वाद दिले आहेत असा मनोमन विश्वास वाटतो. या संधीचे निश्चितपणाने सोने करेन.
निवडणुका जाहीर झाल्यात म्हणूनच मी व माझे कुटुंब लोकांच्या संपर्कात नाही तर सातत्याने माझे संपूर्ण कुटुंब लोकांच्या संपर्कात असते. राजकारणापेक्षा समाजकारण हा माझ्या घराण्याचा पिंड आहे. सरूड जिल्हा परिषद मतदार संघातील घराघरात माझा संपर्क आहे.ज्येष्ठ, युवावर्ग,महिला भगिनी आणि सुजाण मतदार निश्चितपणाने माझा विकासात्मक दूरदृष्टीला आणि योजनांना पाठबळ देतील,आशीर्वाद देतील आणि मी निश्चितपणे ५ हजार च्या वर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार; असा ठाम विश्वास वाटतो.
— अमरसिंह पाटील-भेडसगावकर
सरूड जिल्हा परिषद ‘उबाठा’ गट उमेदवार










