जनतेने दिलेल्या भरभरून आशीर्वादाने माझा विजय निश्चित- अमरसिंह पाटील भेडसगावकर
जनतेने दिलेल्या भरभरून आशीर्वादाने माझा विजय निश्चित- अमरसिंह पाटील भेडसगावकर
(सरूड जिल्हा परिषद गण उमेदवार)
सतत माणसांच्या गराड्यात राहून,जनसामान्याच्या अंतर्मनाशी एकरूप होत,जनसेवेच्या व्रताशी तत्वनिष्ठ असणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले. मतदारसंघांमध्ये सातत्याने राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत गट तट न पाहता गावोगावी विकास कामे केली. कृतिशील विचार आणि सकारात्मक दृष्टी असंणारे हंबीरराव पाटील यांचे सुपुत्र सरूड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या ”विकासाचे नेमके व्हिजन” घेऊन लोकांसमोर जात आहेत.
जिल्हा परिषद -पंचायत समितीच्या निवडणुकाना विलंब झाल्यामुळे मतदार संघातील विकास कामांना खीळ बसली आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सरूड जिल्हा परिषद गणातून अमरसिंह हंबीरराव पाटील निवडणुकीस सामोरे जात आहेत. या मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व केलेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात सरूड जि. प. मतदार संघातील प्रत्येक गावागावात विकासकामे केली होती. या काळात अनेक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या.गेल्या ५ वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचा कोणत्याही स्वरूपाचा विकासनिधी नसल्यामुळे गावागावातील प्रलंबित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रारूप आराखडा तयार केला आहे.रस्ते, आरोग्य, पाणी या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणातुन गावागावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, पटसंख्या वाढ,भौतिक सुविधा, वैयक्तिक आरोग्याच्या सुविधा, गावगावात वॉटर एटीएम,नोकर भरतीचा अभ्यास करणाऱ्या युवावर्गाला अभ्यासिका, खेळाचे मैदान,व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,दलित वस्ती सुधारणा, महिला सबलीकरण व उद्योग व्यवसाय निर्मितीच्या अभिनव योजना,ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, तालमींची डागडुजी अशा अनेक ग्रामीण विकासाच्या योजना राबवण्याचा अजेंडा उच्चशिक्षित,विकासात्मक दूरदृष्टी असणारे सरूड जिल्हा परिषद उबाठा गटाचे उमेदवार अमरसिंह पाटील- भेडसगावकर यांनी व्यक्त केला.
भेडसगाव/एम डी फाळके
प्रश्न-१.विकासाचा नेमका कोणता अजेंडा घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात?
— शासन दरबारी निवडणुकांना विलंब झाल्यामुळे गेल्या काही वर्षात गावागावातील विकास ठप्प आहे, गावागावातील पायाभूत सुविधांच्या सक्षमतेबरोबरच विकासकामातुन चेहरामोहरा बदलण्यासाठी मी विकासाचे नेमके व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ‘प्रारूप आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद व अन्य विकास निधीतून माझ्या मतदारसंघातील सर्व गावांना ‘विकासाचे सुंदर देखणे रूप साकारण्यासाठी माझे व्हिजन निश्चित केले आहे.
२.ग्रामीण भागामध्ये अजूनही आरोग्याच्या समस्या जाणवतात याकडे आपण कसे पाहता?
–आरोग्य ही अत्यावश्यक सेवा आहे. गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि शासनाच्या निधीतून वेळेवर औषध पुरवठा, पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध असणे, कर्मचारी पूर्ण क्षमतेने असणे यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.मतदारसंघातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत प्रभावी आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे, यासाठी माझा कटाक्ष असेल.
३.जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बाबत आपली अभिनव योजना काय आहे?
–जिल्हा परिषदेच्या शाळेतच गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण मिळते. आजवरचे सर्वच उच्च पदस्थ अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून घडले आहेत., म्हणून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी जि. प.च्या शाळा ग्लोबल करण्यासाठी माझा अजेंडा आहे.या शाळेतील शिक्षक हे स्पर्धा परीक्षेतून निवडले जातात. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना होण्यासाठी समाज, शाळा यांच्या प्रबोधनाकडे लक्ष देणार आहे. जिल्हा परिषद शाळातील पटसंख्या वाढण्यासाठी धोरणात्मक नियोजन तयार केले आहे.या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी नवीन आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार या शाळात वैश्विक दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे.अभिनव कल्पना,प्रभावी संवाद आणि तितकेच प्रभावी कोल्याब्रेशन घडवून आणणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उपक्रम या शाळेत घडतील. स्मार्ट इंग्रजी उपक्रम, स्पर्धा परीक्षा, खाजगी शाळाप्रमाणेच अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण,क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, वैज्ञानिक उपक्रम, विज्ञान प्रदर्शन यासारखे उपक्रम अवलंबण्यासाठी निश्चित धोरण तयार केले आहे.
४.युवा वर्गासाठी आपले व्हिजन काय आहे?
— प्रत्येक गावामध्ये युवावर्ग बहुसंख्येने आहे. प्रत्येक गावातील युवा वर्ग हा स्पर्धा परीक्षा, सैन्य भरती, पोलीस भरती तसेच अन्य शासनाच्या नोकर भरतीचा अभ्यास करत असतो. या युवकांना चांगल्या दर्जाचे ग्रंथालय, सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या मुलांना सर्व सुविधांनी युक्त क्रीडांगण, अभ्यासिकेची सोय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
५.शेती आणि शेतकरी वर्गासाठी आपल्या योजना काय?
— सर्व शेतकरी वर्ग हा खरीप-रब्बी प्रकारची पिके घेऊन कष्टाने शेती फुलवत आह. या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन सेंद्रिय खते, सेंद्रिय बियाणे तसेच शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत ज्या ज्या काही शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना आहेत, त्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवण्याचा माझा मानस आहे. शेती पूरक चे इतर अन्य व्यवसाय आहेत त्यांना सुद्धा सक्षम आणि अनुदान उपलब्ध होण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.म्हैसगोठा,कुकुटपालन, शेळीपालन अशा व्यवसायासाही अनेक प्रोत्साहनपर कर्जयोजना महामंडळाच्या माध्यमातून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.
६.गावा गावात गावतळी आहेत त्या तळ्यांचे संवर्धन करण्यासाठी आपले नेमके व्हिजन काय?
— प्रत्येक गावात पूर्वी पाणीसाठा करण्यासाठी गावाच्या मध्यभागी, गावाच्या बाहेर मोठे- मोठे तलाव आहेत. या तलावातील गाळ काढून त्या तलावाची प्रदूषणमुक्ती करण्यासाठी प्रयत्न राहतील. शासनाच्या वेगवेगळ्या निधीतून तलावांचे सुशोभीकरण, तलावाच्या सभोवती वृक्षारोपण, सौंदर्य स्थळ निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.
७.दलित वस्ती उत्थानाच्या बाबतीतल्या आपल्या योजना नेमक्या काय?
— शासनाच्या विविध जनकल्याणाच्या योजनेमधून मागासवर्ग घटकांना घरकुल योजना, समाजकल्याण, कृषी,पशुवैद्यकीय, सांस्कृतिक विभाग या मार्फत अनेक जनकल्याणाच्या योजना आहेत. या योजना मागास प्रवर्गाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा अजेंडा तयार आहे. घरकुल योजना, पशुवैद्यकीय विभागाच्या योजना, कुक्कुटपालन,सांस्कृतिक कार्य विभागाकडून वृद्ध कलाकारांना पेन्शन तसेच साहित्य- संस्कृतीचे उपक्रम गावागावात योजण्यासाठी माझे धोरण आहे.
८.महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या उपाययोजना आहेत?
— गावागावांमध्ये बचत गटांची निर्मिती, बचत गटांना कर्ज योजना, त्यांना छोटे-मोठे उद्योग करण्यासाठी अर्थसहाय्य, व्यवसाय-उद्योग करण्यासाठी त्या व्यवसायाचे मार्गदर्शन, व्यवसाय कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यासाठी माझा मानस आहे. गावागावातील महिला-भगिनी- युवती यामधून समृद्ध-स्वयंपूर्ण होतील असा मला विश्वास वाटतो.
९.मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या प्रकारे योगदान द्याल?
–ग्रामीण भागातल्या मुली अत्यंत हुशार आणि चुणूकदार असतात. परिस्थिती अभावी त्यांना पाठबळ मिळत नाही. अशा मुलींना दत्तक घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना तसेच व्यवसाय -कौशल्याच्या कार्यशाळा, सैन्य भरती, नोकर भरतीसाठी तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन.
१०.’विकासाचे रोल मॉडेल’ जिल्हा परिषद मतदार संघ बनवण्यासाठी शासन निधी व्यतिरिक्त कोणते पर्याय आहेत का?
–मतदारसंघातील प्रत्येक गोष्टीसाठी शासनाचा निधी पुरेसा ठरेल याची खात्री नसते. यासाठी काही सामाजिक दायित्व देणाऱ्या संस्था, औद्योगिक प्रकल्प, काही एनजीओ,बँका यांच्यामधून आर्थिक निधी उपलब्ध करून प्रसंगी पदरमोडसुद्धा करून गावागावातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न असतील. जनसेवेच्या कल्याणाच्या सार्वजनिक सेवा केंद्रे, शासनाच्या संस्था सक्षम करण्यासाठी माझा धोरणात्मक आणि रचनात्मक आराखडा तयार आहे. मतदारसंघातील जनतेने माझ्यासारख्या हायटेक विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाला आशीर्वाद द्यावेत.सरूड मतदारसंघातील कष्टकरी- होतकरू जनतेने मला संधी द्यावी या संधीचे निश्चितपणाने सोने करेन.
११.मतदारसंघात आपल्याला मिळणारा प्रतिसाद आणि विजयाची खात्री वाटते का?
–निवडणुका जाहीर झाल्यात म्हणूनच मी व माझे कुटुंब लोकांच्या संपर्कात नाही तर सातत्याने माझे संपूर्ण कुटुंब लोकांच्या संपर्कात असते. राजकारणापेक्षा समाजकारण हा माझ्या घराण्याचा पिंड आहे. सरूड जिल्हा परिषद मतदार संघातील घराघरात माझा संपर्क आहे.ज्येष्ठ, युवावर्ग,महिला भगिनी आणि सुजाण मतदार निश्चितपणाने माझा विकासात्मक दूरदृष्टीला आणि योजनांना पाठबळ देतील,आशीर्वाद देतील आणि मी निश्चितपणे मताधिक्याने निवडून येणार; असा ठाम विश्वास वाटतो.










