सरूड जि प गटातून अमरसिंह पाटील- भेडसगावकर ६१८३ मताधिक्याने विजयी. पं.स.चे माधुरी पाटील,डॉ.धनश्री पाटील यांचेही विजय सरूडकर गटाचा बालेकिल्ला ‘अभेद्य’
सरूड जि प गटातून अमरसिंह पाटील- भेडसगावकर ६१८३ मताधिक्याने विजयी.
पं.स.चे माधुरी पाटील,डॉ.धनश्री पाटील यांचेही विजय
सरूडकर गटाचा बालेकिल्ला ‘अभेद्य’
भेडसगाव/मारुती फाळके
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या या गणात परंपरेप्रमाणे मतदारांनी सरूडकर गटाच्या ताब्यात हा बालेकिल्ला ‘अभेद्य’ ठेवत शिवसेना (उबाठा) -मित्रपक्षाचे उमेदवार अमरसिंह हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांनी ६१८३ इतक्या प्रचंड मतांधिक्यानी विजयी घौडदौड कायम ठेवण्यात यशस्वी झाले.तर पंचायत समितीचे दोन्ही भेडसगाव गणातून माधुरी दिलीप पाटील ४६२ तर सरूड गणातून डॉ.धनश्री जयवंत पाटील या २८३३ इतक्या मताधिक्यानी विजयी झाल्या.
१९७२ सालापासून सरूड जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही मतदार संघ माजी आमदार बाबासाहेब पाटील- सरूडकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात.या जि.प. मतदारसंघातून आजवर मंगलताई पाटील,माजी आमदार बाबासाहेब पाटील, जि प चे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती गणपतराव थोरात,माजी आमदार सत्यजित पाटील,माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील-भेडसगावकर,एन डी पाटील सावेकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
भेडसगावला जिल्हा परिषद सदस्य पदाने अमरसिंह यांच्या रूपाने सलग चौथ्यांदा संधी मिळाली आहे.यापूर्वी त्यांचे वडील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी दोन वेळा तर त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी एक वेळेस या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे.त्यांच्या घरातच हा विजयी गुलाल सलग चौथ्यांदा जनतेने दिला.
प्रचाराच्या सुरुवातीच्या यंत्रणेपासून माजी आमदार सत्यजित पाटील,हंबीरराव पाटील यांनी आखलेली सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा, घर-टू-घर संपर्क, संपर्क दौरे,पदयात्रा, सभा आणि आपली कार्यकर्ते एकनिष्ठ ठेवण्याच्या आखलेल्या रणनीती हे डावपेच यशस्वी ठरले.मतदारसंघात विरोधी गटाकडून काही प्रमुख नेतेमंडळी फोडण्याचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्यामुळे समर्थकांनी गुलाल उधळून विजयी जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये तरुणवर्ग आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्हा परिषदेचे उमेदवार अमरसिंह पाटील यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी अक्षरशः तोबा गर्दी केली होती. यावेळी त्यांचे संपूर्ण घर-कार्यालय गुलालात न्हाऊन गेले होते.
या मतदारसंघातील भेडसगाव पंचायत समिती गणातून माजी सभापती दिलीप पाटील यांच्या पत्नी माधुरी पाटील या ४६२ इतक्या मताधिक्याने विजयी झाल्या. या पंचायत समिती गणात काटे -की- लढत झाली.त्यांच्या विरोधी उमेदवार सुभद्रा अरुण पाटील यांनी निकराची झुंज दिली. परंतु या मतदारसंघातील मोठ्या गावांच्या मताधिक्यामुळे माधुरी पाटील यांचा विजय सुकर झाला. त्यांचे पती दिलीप पाटील आणि कार्यकर्त्यांनी राबवलेली यंत्रणा या विजयामध्ये कामी आली.विरोधी जनसुराज्य गटाकडून ही जागा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले परंतु सरूडकर गटाचे प्रमुख नेतेमंडळी एकनिष्ठ राहिल्यामुळे विरोधकांना यश मिळाले नाही.
सरूड पंचायत समिती गणामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या घराण्यातील डॉ. धनश्री जयवंत पाटील २८३३ इतक्या मताधिक्यानी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात सरूडकर घराण्यातीलच राजकुंवर पाटील या जनसुराज्यच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यांनी सुद्धा या मतदारसंघांमध्ये निकराची झुंज दिली, सरूड गणातील काही गावांचा जनाधार त्यांना मिळाला,परंतु विजयाप्रत जाता आले नाही. विरोधी जनसुराज्य पक्षाने यावेळी माजी आमदार पाटील यांच्या घरातीलच हा उमेदवार दिल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सत्यजित पाटील यांनी सरूड जिल्हा परिषद आणि हे भेडसगाव,सरूड हे दोन्ही पंचायत समितीचे गण आपल्या ताब्यात ठेवत हा सरूडकर गटाचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे विरोधकांना दाखवून दिले.
चौकट-१
सत्यजित,हंबीरराव पाटील किंगमेकर
माजी आमदार सत्यजित पाटील ,हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांचे मायक्रो प्लॅनिंग पुत्र अमरसिंह पाटील यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले. दोन्ही नेत्यांनी गेल्या सहा महिन्यापासून या विजयासाठी कंबर कसली होती. सत्यजित पाटील यांनी सत्ता नसतानाही या मतदारसंघात आपला जनाधार टिकवून ठेवला आहे. एकट्या सरूड गावात २९०० च्या वर मताधिक्य देत त्यांनी या मतदारसंघात आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
हंबीरराव पाटील हे २००२ साली पंचायत समिती उपसभापती आणि त्यानंतर सलग तीन वेळेस जि प सदस्य पदावर आहेत. सक्रिय राजकारण करत असल्यापासून राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावागावात जोडलेली माणसे, केलेली विकास कामे आणि राजकारण विरहित केलेले समाजकारण या गोष्टी त्यांच्या सुपुत्राच्या विजयाच्या पथ्यावर पडल्या. गावागावात त्यांना मानणारा वर्ग, तालुक्यात आणि जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात असलेले जिव्हाळ्याचे संबंध, सुखदुःखाला धावून जाण्याची शैली, या गुणांमुळे तसेच लोकांच्यात असलेल्या त्यांच्या ‘इमेज बॉंडिंग’ ही सारी कौशल्ये मताधिक्य वाढवण्यासाठी कारणीभूत ठरल्या.
त्यामुळे या विजयामध्ये माझ्या आमदार सत्यजित पाटील व हंबीरराव पाटील हेच विजयाचे ‘किंगमेकर’ असल्याचे सिद्ध झाले.
चौकट-
अमरसिंह पाटील यांची ‘युथ क्रेझ’
जिल्हा परिषदेचे उमेदवार अमरसिंह पाटील यांना गावागावात मानणारा तरुण वर्ग, तरुण वर्गात असलेला त्यांचा प्रभावी संवाद, क्रीडा- कौशल्याच्या उपक्रमातील सहभाग आणि तरुणांईमध्ये असणारी उठबस या बाबी त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी कारणीभूत ठरल्या.
माधुरी पाटील यांची ‘विनम्रता’
भेडसगाव पंचायत समितीचे उमेदवार माधुरी दिलीप पाटील यांची मतदारसंघात असलेली प्रतिमा,आदरातिथ्य,विनम्रपणा आणि लोकांच्या मध्ये सहज मिसळून जाण्याची शैली या गोष्टी त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्या.
डॉ.धनश्री पाटील यांची शांत,संयमी प्रतिमा
सरूड पंचायत समिती गणातील उमेदवार डॉ. धनश्री पाटील या पेशाने डॉक्टर.जनसामान्यांशी बांधीलकी असलेला पेशा,लोकांमधील दररोज चा संवाद आणि स्वतः सत्यजित पाटील यांच्या घरातील असल्यामुळे त्यांना सुद्धा अपेक्षित प्रमाणात जनाधार मिळाला.
एकूणच अमरसिंह यांची तरुणाईतील ‘क्रेझ’, माधुरी पाटील यांचा अंतस्थ स्वभाव गुण आणि डॉ. धनश्री पाटील यांची प्रतिमा यामुळे लोकांनी त्यांना उचलून धरले. जनमाणसावर उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावी संवाद-स्वभावगुणांचा प्रभाव पडला.
——————————————————-
लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.-अमरसिंह पाटील नूतन जि प सदस्य
गेली वीस दिवस अहोरात्र कष्ट करून राबणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचे विशेष करून ज्येष्ठ नेतेमंडळी, युवा पिढीचे आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व अबाल वृद्ध यांचे मी आभार मानतो. हा विजय केवळ माझा नसून सरूड जि. प. मतदार संघातील आमच्या गटाच्या सर्व नेतेमंडळीवर प्रेम करणाऱ्या मतदारसंघातील जनतेचा आहे. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे या विश्वासाला मी कदापिही तडा जाऊ देणार नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहात मी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडणार,आणि त्याच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणार.
–– अमरसिंह पाटील भेडसगावकर नूतन जिल्हा परिषद सदस्य
सरूड जि प गण
(फोटो ओळी-मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेत असताना गावोगावच्या कार्यकर्त्यांनी हंबीरराव पाटील व जि.प. चे विजयी उमेदवार अमरसिंह पाटील- भेडसगावकर यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला.
विजयी खूण दाखवताना हंबीरराव पाटील व नूतन जि प सदस्य अमरसिंह पाटील.)










