March 14, 2026

सरूड गटात सत्यजित-हंबीरराव पाटीलच ‘किंगमेकर’!सरूडकर गटाचा बालेकिल्ला ‘अजिंक्य’

0
IMG-20260211-WA0039
सरूड गटात सत्यजित-हंबीरराव पाटीलच ‘किंगमेकर’
   सरूडकर गटाचा बालेकिल्ला ‘अजिंक्य’
भेडसगाव/मारुती फाळके
      संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या या गटात परंपरेप्रमाणे मतदारांनी सरूडकर गटाच्या ताब्यात हा बालेकिल्ला ‘अभेद्य’ ठेवत शिवसेना (उबाठा) -मित्रपक्षाचे जिल्ह्यातील एकमेव उमेदवार अमरसिंह हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांनी ६१८३ इतक्या प्रचंड मतांधिक्यानी विजयी घौडदौड कायम ठेवण्यात यशस्वी झाले.तर पंचायत समितीचे दोन्ही भेडसगाव गणातून माधुरी दिलीप पाटील ४६२ तर सरूड गणातून डॉ.धनश्री जयवंत पाटील या २८३३ इतक्या मताधिक्यानी विजयी झाल्या.या निकालावरून सरूड गटात माजी आमदार सत्यजित पाटील व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटीलच हेच ‘किंगमेकर’ असल्याचे सिद्ध झाले.सरूड जिल्हा परिषद गट हा सरूडकर गटाचा बालेकिल्ला ‘अजिंक्य’ असल्याचे पुन्हा एकदा प्रत्ययास आले.
      १९७२ सालापासून सरूड जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे दोन्ही   गण माजी आमदार  बाबासाहेब पाटील- सरूडकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला  जातो.या जि.प. मतदारसंघातून आजवर  मंगलताई पाटील,माजी आमदार बाबासाहेब पाटील, जि प चे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती गणपतराव थोरात,माजी आमदार सत्यजित पाटील,माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील-भेडसगावकर,एन डी पाटील सावेकर यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
   प्रचाराच्या सुरुवातीच्या यंत्रणेपासून माजी आमदार सत्यजित पाटील,हंबीरराव पाटील,सर्व उमेदवार, कार्यकर्ते यांनी आखलेली सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा, घर-टू-घर संपर्क, संपर्क दौरे,पदयात्रा, सभा आणि आपली कार्यकर्ते एकनिष्ठ ठेवण्याच्या आखलेल्या रणनीती हे डावपेच यशस्वी ठरले.मतदारसंघात विरोधी गटाकडून काही प्रमुख नेतेमंडळी फोडण्याचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत.
     या मतदारसंघातील भेडसगाव पंचायत समिती गणातून माजी सभापती दिलीप पाटील यांच्या पत्नी माधुरी  पाटील या ४६२  इतक्या मताधिक्याने विजयी झाल्या. या पंचायत समिती गणात  काटे -की- लढत झाली.त्यांच्या विरोधी उमेदवार सुभद्रा अरुण पाटील यांनी निकराची झुंज दिली. परंतु या मतदारसंघातील मोठ्या गावांच्या मताधिक्यामुळे माधुरी पाटील यांचा विजय सुकर झाला. त्यांचे पती दिलीप पाटील आणि कार्यकर्त्यांनी राबवलेली यंत्रणा या विजयामध्ये कामी आली.विरोधी जनसुराज्य गटाकडून ही जागा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले परंतु सरूडकर गटाचे प्रमुख नेतेमंडळी एकनिष्ठ राहिल्यामुळे विरोधकांना यश मिळाले नाही.
     सरूड पंचायत समिती गणामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या घराण्यातील डॉ. धनश्री जयवंत पाटील २८३३ इतक्या मताधिक्यानी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात सरूडकर घराण्यातीलच राजकुंवर पाटील या जनसुराज्यच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यांनी सुद्धा या मतदारसंघांमध्ये निकराची झुंज दिली,  सरूड गणातील काही गावांचा  जनाधार त्यांना मिळाला,परंतु विजयाप्रत जाता आले नाही. विरोधी जनसुराज्य पक्षाने यावेळी माजी आमदार पाटील यांच्या घरातीलच हा उमेदवार दिल्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सत्यजित पाटील यांनी सरूड जिल्हा परिषद आणि हे भेडसगाव,सरूड हे दोन्ही पंचायत समितीचे गण आपल्या ताब्यात ठेवत हा सरूडकर गटाचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे विरोधकांना दाखवून दिले.
   चौकट १.
सत्यजित,हंबीरराव पाटील किंगमेकर 
  माजी आमदार सत्यजित पाटील ,हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांचे
 मायक्रो प्लॅनिंग पुत्र अमरसिंह पाटील यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले. दोन्ही नेत्यांनी गेल्या सहा महिन्यापासून या विजयासाठी कंबर कसली होती. सत्यजित पाटील यांनी सत्ता नसतानाही या मतदारसंघात आपला जनाधार टिकवून ठेवला आहे. एकट्या सरूड  गावात २९०० च्या वर मताधिक्य देत त्यांनी या मतदारसंघात आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
     चौकट २.
 हंबीरराव पाटील यांचा मतदारसंघात ‘राबता’
   हंबीरराव पाटील हे २००२ साली पंचायत समितीला निवडून गेले.यावेळी पंचायत समिती उपसभापती आणि त्यानंतर सलग तीन वेळेस जि प  सदस्य पदावर आहेत. सक्रिय राजकारण करत असल्यापासून राजकारणाच्या पलीकडे जाऊन  गावागावात जोडलेली माणसे, केलेली विकास कामे आणि राजकारण विरहित केलेले समाजकारण यासाठी ते मतदारसंघात सर्वांना ज्ञात आहेत.सार्वजनिक जीवनात सर्वांशी अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे विरोधकांशी सुद्धा स्नेहपूर्ण संबंध आहेत.या गोष्टी त्यांच्या सुपुत्राच्या विजयाच्या पथ्यावर पडल्या.,गावागावात त्यांना मानणारा वर्ग, तालुक्यात आणि  जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात  असलेले जिव्हाळ्याचे संबंध, सुखदुःखाला धावून जाण्याची शैली, या गुणांमुळे तसेच लोकांच्यात असलेल्या त्यांची ‘इमेज बॉंडिंग’ ही सारी कौशल्ये मताधिक्य वाढवण्यासाठी कारणीभूत ठरल्या.
     या चाणक्य नितीमुळे अमरसिंह यांच्या  विजयामध्ये माजी आमदार सत्यजित पाटील व हंबीरराव  पाटील हेच विजयाचे ‘किंगमेकर’ असल्याचे सिद्ध झाले.
चौकट ३.
भेडसगाव च्या पाटील कुटुंबाला चौथ्यांदा ‘संधी’ 
   जिल्हा परिषद सदस्य म्हणून  अमरसिंह यांच्या रूपाने भेड सगावच्या पाटील कुटुंबाला सलग चौथ्यांदा संधी मिळाली आहे.यापूर्वी त्यांचे वडील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी दोन वेळा, तर त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी एक वेळेस या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे.त्यांच्या घरातच हा विजयी गुलाल जनतेने सलग चौथ्यांदा दिला.
चौकट ४
अमरसिंह पाटील यांची ‘युथ क्रेझ’
   जिल्हा परिषदेचे उमेदवार अमरसिंह पाटील यांना गावागावात मानणारा तरुण वर्ग, तरुण वर्गात असलेला त्यांचा प्रभावी संवाद, क्रीडा- कौशल्याच्या उपक्रमातील सहभाग आणि तरुणांईमध्ये असणारी उठ-बस या बाबी त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी कारणीभूत ठरल्या.
   (फोटो-माजी आमदार सत्यजित पाटील,माजी सभापती हंबीरराव पाटील व जि.प. चे विजयी उमेदवार अमरसिंह पाटील- भेडसगावकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!