माणुसकीचा जिवंत झरा ह.भ.प. केशव हारुगडे(बाबा)
माणुसकीचा जिवंत झरा ह.भ.प. केशव हारुगडे(बाबा)
८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भेडसगाव/मारुती फाळके
जीवन जगत असताना शेवटच्या श्वासापर्यंत नीतीमूल्यांची जोपासना करत जीवन व्यतीत केलेले,निष्काम कर्मयोगी,माणुसकीचा जिवंत झरा म्हणजे ह.भ. प.केशव हारुगडे(बाबा).
उभी हयात कोणत्याही स्वार्थ- हव्यासाची अपेक्षा न ठेवता आजन्म त्यांनी व्रतस्थपणे आयुष्याची सुखदुःखे झेलत कुटुंबाबरोबर समाजाला ही चांगल्या आचार विचारांची दिशा दिली.प्रत्येकाला माणुसकीचा ओलावा दिला. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून यशस्वी सेवा बजावली.नियतीच्या फेऱ्यात वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आचार- विचारांचं अद्वैत फार कमी माणसांना जमतं. ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीच भान असणं आवश्यक असतं, आणि या बांधिलकीतूनच समाजामध्ये जाणीवा निर्माण होतात असतात.कुटुंब-समाजाच्या जाणिवा-संवेदना जपणारे सर्वांचे बाबा म्हणजे केशव हारुगडे.
घरची बेताची परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत एसटी खात्यामध्ये वाहक म्हणून भरती झाले.नोकरीच्या काळात इमान इतबारे सेवा बजावली.कामात कधी कुचराई नाही.अगदी शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व. चुकीच्या गोष्टीना कधीच थारा दिला नाही.,त्यामुळे सहवासात येणारा प्रत्येक जण बाबांची वागणूक पाहून विचार करूनच बोलणार.,असा मित्रपरिवारात सुद्धा आदरयुक्त धाक होता. केशव हारुगडे यांचे जीवन म्हणजे एक व्रतस्थ कर्मयोग्याचे जीवन म्हणावे लागेल. उभी हयात त्यांनी आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकालाच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा,आदर, आधार आणि आपल्या माणुसकीच्या अंतस्थ ओलाव्याने सुगंधित केले.
जीवनाच्या एका टप्प्यावर संसार फुलत असताना, मुलं लहान असताना त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संसार फुलण्याच्या या वळणावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु या परिस्थितीतही ते न डगमगता उभे राहिले. कठीण काळात अगदी स्वतः जेवण करून त्यांनी मुलांचे पालनपोषण केले.पण त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही.
नोकरी,मुलांचे योग्य संगोपन करत त्यांना वाढवले.३ मुलींची चांगल्या घरी लग्न लावून दिली. आणि एका मुलाला पोलीस खात्यात अधिकारी घडवले. अखेरच्या श्वासापर्यंत आपली तत्त्वे,जीवन मूल्ये या तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.सार्वजनिक जीवनातही ते अढळ राहिले.,सामान्य पगाराची नोकरी असतानाही कुटुंब उभे केले. त्यांचे वडाच्या वृक्षाप्रमाणे अनिश्चल कर्तुत्व नेहमीच लोकांच्या स्मरणात राहिले.
सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विचार- आचारांना वाहून घेतले. कीर्तने पारायणे यामध्ये ते तल्लीन होऊन जात. संत वचने, संतांची विचारधारा, संतपरंपरेचे आघात ज्ञान त्यांच्याकडे होते. भागवत संप्रदायाची कित्येक ग्रंथ आणि त्या ग्रंथातील वचने तोंडपाठ. दिवसाची सुरुवात हरीपाठापासून ते संध्याकाळच्या पारायणापर्यंत त्यांच्या जीवनाचे मंथन चालू असायचे. असे व्रतस्थ कर्मयोगी ह. भ. प.केशव हारूगडे (बाबा) संवेदनशील मनाचे,निरामयी जीवन जगणारे कर्मयोगी होते असेच म्हणावे लागेल.
जीवनाच्या दोलायमान प्रसंगात सामान्य पगाराची नोकरी असतानाही मुलाच्या शिक्षणासाठी,मुलींच्या संसारासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या. त्यांच्या सुखासाठी नेहमीच लढत राहिले.,वेळप्रसंगी आपल्या डोळ्यातील आसवं डोळ्यातच गिळली.,मुलांना कधीच काही कमी पडू दिले नाही. याबरोबर समाजाला व आपल्या कुटुंबालाही विचारांची पुंजी देत गेले.स्वतःला होणाऱ्या वेदना,हळवेपण त्यांनी कधीच समूहाला- कुटुंबाला जाणवू दिले नाही. मुलांच्या-कुटुंबाच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानण्याची विलक्षण दृष्टी यातच ते स्वतःला धन्य मानत गेले.
आयुष्याच्या लढाईत त्यांना प्रचंड खस्ता खाव्या लागल्या.पण ते कधीच ध्येयापासून विचलित झाले नाहीत.एकुलता एक मुलगा डीवायएसपी सुनील हारुगडे याना उभे करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मुलाच्या शिक्षणावेळी त्यांची अनेक वेळा कसरत झाली परंतु कधीही त्यांनी मुलांना काही कमी पडू दिले नाही. बाबांच्या याच कष्टाची जाणीव व आईचा आशीर्वाद घेऊन सुनील हारुगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापासून ते आज पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत गरुडझेप घेतली आहे.बाबांच्या याच सचोटीच्या संस्काराच्या शिदोरीवर आज संपूर्ण कुटुंबाची वाटचाल सुरू आहे. हारुगडे कुटुंबात आज सर्वकाही आहे,पण बाबा नाहीत.,बाबांच्या जाण्याने सारे कुटुंब सैरभैर आहे.बाबा सगळ्याचा आधारवड होते,मार्गदर्शक होते,बुजुर्ग पाठीराखे होते.त्यांची उणीव सर्वांनाच जाणवतेय. जीवनाची वाटचाल संघर्षपूर्ण असणारे बाबा सर्वांना घडवणारे संस्कारकेंद्र होते.उभी हयातभर त्याग, समर्पण, निरामय आणि शिस्तबद्ध जीवन जगणारे बाबा हे एक कणखर लढवय्या,व्रतस्थ कर्मयोगी होते.त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.!










