March 14, 2026

अण्णाभाऊंच्या स्वप्नातला समतावादी समाज घडवूया-सावित्रीमाई साठे कोल्हापुरात ८ वे मुक्ता साळवे साहित्य -संस्कृती संमेलन अमाप उत्साहात संपन्न

0
IMG-20260304-WA0005

अण्णाभाऊंच्या स्वप्नातला समतावादी समाज घडवूया — सावित्रीमाई साठे

कोल्हापुरात ८ वे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन भारावलेल्या वातावरणात संपन्न
—————————————
कोल्हापूर/मारुती फाळके

जातीभेद वाढवण्यापेक्षा माणुसकी वाढवूया. मानवता हाच आपला खरा धर्म आहे. ज्याने आपल्याला जन्म दिला त्या निर्मात्याने माणसांत भेद केलेला नाही, मग भारतात जातीभेद का?आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग लालच आहे; मग काही मूठभर लोक स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ का लेखतात, हा मला पडलेला प्रश्न आहे, असे परखड विचार अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे यांनी व्यक्त केले.
त्या ८व्या मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.विद्रोही साहित्यिका संमेलनाध्यक्ष कॉम्रेड नीलिमा जाधव- बंडेलू होत्या.

१५० वर्षांपूर्वी प्रश्न विचारणाऱ्या मुक्ता साळवे यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे,असे त्यां म्हणाल्या भारतीय समाजातील विषमतावादी उतरंड प्रतीकात्मक गाडगे-मडक्यांच्या उतरंड सावित्रीबाईंच्या हस्ते फोडून संमेलनाचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले.यावेळी क्रांतीयोद्धा फकीरा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष डॉ.अर्चना जगतकर, संमेलनाध्यक्ष डॉ. नीलिमा जाधव- बंडेलू, डॉ.शरद गायकवाड, सचिन बगाडे, सोपान खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नीलिमा जाधव -बंडेलु यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार केला.’विजा घेऊन येणारी तरुण पिढीच इतिहास बदलते आणि घडवते असा इशारा त्यांनी इथल्या व्यवस्थेला दिला.’ लोकसाहित्य- लोककला आणि परिवर्तनाची लढाई यांचा जैव संबंध असल्याचे त्या म्हणाल्या. मुक्ता साळवे यांनी सुधारणेच्या प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या समाजाच्या दुःखाविषयी लिहिलेला निबंध हा इथल्या जातीयवादी व्यवस्थेला  विचारलेला रोखठोक प्रश्न होता.या निबंधातून व्यक्त केलेल्या विषयाशी सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्यासाठी  विचारांचा जागर या संमेलनातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मुक्ताचा मुक्तीचा विचार हा इथल्या जातीव्यवस्थेवर, वर्ग व्यवस्थेवर विषमतेवर घणघात करणारा आहे.,यासाठी येणाऱ्या काळात आधुनिकतेची कास धरून समाजाने विवेकी विचार व आचरण करण्याचे आवाहन केले.

दरम्यान सकाळी राजारामपुरी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा, बिंदू चौकातील महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छ. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मुक्ता साळवे आठवे साहित्य संमेलन पदयात्रेला सुरुवात झाली.पालखीत भारताचे संविधान, फकीरा, मुक्ता साळवे यांचा निबंध तसेच फुले-शाहू-आंबेडकरांचे वाडमय ठेवून रॅली काढण्यात आली. अमोल बुचडे,शामराव शेंडगे आदी कलाकारांनी हलगी-घुमके, लेझीम, लाठी-काठी व दांडपट्टा यांचे केले.पदयात्रेमध्ये राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले राजर्षी शाहू महाराज, मुक्ता साळवे देशाचे रक्षण करते सैनिक माजी सैनिक वेशात व महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी व महिला युवा ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.

संमेलनात महावीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनुश्री पुरेकर हिने “मी मुक्ता साळवे बोलते” हा एकपात्री प्रयोग सादर केला, तर सानिया मुलाणी हिने “मी सावित्रीबाई फुले बोलते” हा प्रभावी प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

दुपारच्या सत्रात सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य-संस्कृती पुरस्काराने साहित्यिक व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. मंचर येथील ज्येष्ठ लेखक बाळासाहेब भडकवाड यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार रूपाली चव्हाण पत्रकार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

समारोपाच्या सत्रात प्रा.प्रकाश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही व समतावादी कवितांचे कवी संमेलन उत्साहात पार पडले.

संमेलनाच्या उत्तरार्धात प्रा.शरद गायकवाड यांनी विविध ठराव मांडले.यामध्ये साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, मुक्ता साळवे यांचे साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, जातनिहाय जनगणना करावी आदी ठरावाना सभागृहाने उदंड प्रतिसादात मंजुरी दिली.

संमेलन संयोजक समिती अध्यक्ष कोल्हापूर गोपाळ साठे, मुख्याध्यापक राजेंद्र मोहिते, समाजभूषण पुरस्कार्ते, शामराव शेंडगे गुंड हलगी कलाकार, राजू घाटगे समाजभूषण पुरस्कर्ते, राजू दाभाडे, शिवाजीराव चव्हाण माजी सैनिक, डॉ.माधुरी चौगुले,दावीद भोरे सामाजिक कार्यकर्ते,शशिकांत घाटगे सामाजिक कार्यकर्ते, डॉ. अमोल महापुरे प्रा.अशोकराव पाटोळे,विनोद धनवडे सामाजिक कार्यकर्ते, मधु धनवडे, प्रतिभा हेगडे,सावता हेगडे,अशोकराव आळतेकर,अरुण निंबाळकर, अक्षय साळवे के टी मंगल यांचे योगदान लाभले. अवनी संस्थेचे सहकार्य,अब्राहम आवळे, क्रांती आवळे नगरसेविका, सुकुमार कांबळे अध्यक्ष डीपीआय, नगरसेवक रोहित कवाळे, लालासो नाईक,यासंह पुणे, मुंबई, सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आदी ठिकाणांहून शेकडो परिवर्तनवादी कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व अभ्यासक उपस्थित होते. संमेलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले.

साहित्य संमेलनाचे निवेदन सचिन पाटोळे, डॉ.अमोल महापुरे व अनिल चांदणे यांनी केले.

चौकट- १
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या-

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून शोषित, वंचित असणाऱ्या समाजाच्या एकूण जीवनाचे साहित्य प्रतिबिंबित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्य सृष्टी तसेच सुधारणेच्या चळवळीत प्रचंड मोठे योगदान आहे.भारत सरकारने या कार्याचा विचार लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा. ही प्रमुख मागणी ८ व्या मुक्ता साळवे साहित्य संमेलनात अजेंड्यावर होती.

चौकट-२
लवकरच आंबेडकरवादी मातंग परिषद-प्रा. शरद गायकवाड

कोल्हापुरातील आठवे मुक्ता साळवे साहित्य-संस्कृती संमेलन उदंड प्रतिसादाच्या वातावरणात संपन्न झाले आहे.संयोजन कमिटीच्या वतीने गेली महिनाभर राबण्याचे हे फलित आहे. या संमेलनाच्या अभूतपूर्व यशस्वीतेमुळे समाजाचा विवेकी कृती आणि उपक्रम राबवण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न राहील.समाजाला आधुनिक विचारांच्या वाटेवर नेण्याचा हा सुधारणावादी प्रयत्न आहे.खरा इतिहास समजून घेण्यासाठी असे उपक्रम होणे आजच्या काळाची गरज आहे. यानंतर लवकरच कोल्हापूरमध्ये भव्य स्वरूपात आंबेडकरवादी मातंग परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.ही परिषद सुद्धा यशस्वी करण्यासाठी या साहित्य संमेलनाप्रमाणेच समाजाने सक्रिय योगदान द्यावे. –प्रा. शरद गायकवाड

(फोटो ओळी-
जातीभेद-विषमतावादी समाजव्यवस्थेची प्रतीकात्मक गाडगे-मडक्यांची उतरंड फोडून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे, सोबत संमेलनाध्यक्ष नीलिमा जाधव- बंडेलू,सचिन बगाडे, प्रा.शरद गायकवाड,शरदकुमार साने,डॉ.अर्चना जगतकर,सोपान खुडे व इतर मान्यवर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!