शासकीय शिष्यवृत्ती जिल्हा निहाय्य गुणवत्ताधारक विचार्थी संच ( कोटा ) संख्या वाढवा : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे शिक्षण आयुक्तांकडे मागणी
शासकीय शिष्यवृत्ती जिल्हा निहाय्य गुणवत्ताधारक विचार्थी संच ( कोटा ) संख्या वाढवा : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे शिक्षण आयुक्तांकडे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या मधील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शासनामार्फत सध्या इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गांसाठी परिक्षा घेतल्या जातात.या पूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजित केले जात होते. या परीक्षांचा जिल्हा निहाय गुणवत्ताधारक विद्यार्थी संच ( कोटा ) वाढवावा अशी मागणी राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली.मागणीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी स्विकारले.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्या व राज्य यादीमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५,००० व ७,५०० इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी जिल्हा निहाय संच ( विद्यार्थ्यांची संख्या कोटा ) निश्चित करत असताना ही संख्या त्या त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येवर आधारीत संच ( कोटा ) निश्चित केली जाते. उपलब्ध माहितीनुसार १९५६ सालच्या तत्कालीन लोकसंख्येवर सध्याचा संच निश्चित केला आहे.
सध्या कोल्हापूर जिल्हयातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संच संख्या ५९१ तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या ४७५ इतकी आहे. या संख्येमध्ये गेले अनेक वर्षे बदल झालेला नाही. परिणामी अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहावे लागत आहे.
तरी राज्यातील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संच ( कोटा ) हा किमान २०११ ची जनगणना ( लोकसंख्या ) लक्षात घेऊन, नव्याने जिल्हा निहाय विद्यार्थी संच ( कोटा ) निश्चित करण्यात यावा.यामुळे याचा फायदा आपल्या जिल्हया बरोबर राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना होईल. तसेच जे विद्यार्थ्यी राज्य गुणवत्ता यादीत येतात त्या वियार्थ्याची संख्या केवळ १०० इतकी आहे. लोकसंख्या वाढीच्या निकषाप्रमाणे ती ही संख्या वाढवून किमान ५०० करावी.
जे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत येतात त्या बरोबर अनुक्रमे जे दहा विद्यार्थी देश पातळी वरील गुणवता यादीत येतात अशा विदयार्थ्यांना किमान १०,००० रुपये इतका विशेष आर्थिक लाभ द्यावा. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.
शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी आर पाटील, सचिव नितीन पानारी, जिल्हा महिला अध्यक्षा गिरीजा जोशी, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, खजाणिस गौतम कांबळे, शहराध्यक्ष संतोष पाटील, शहर सहसचिव धनंजय शिंदे, शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण, कार्याध्यक्ष अभिजीत साळोखे,करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, पांडुरंग जाधव, सरदार पाटील, पूनम पाटील, उत्तम पोवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………………………………
” शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संच संख्या म्हणजे कोटा वाढवल्यास शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहता त्याचा सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्याला होईल. त्याचबरोबर तो राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा होईल. मागणी मान्य झाल्यास राज्य गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक लाभ मिळेल. “
टी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष
खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
फोटो ओळी : निवेदन स्वीकारताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव…. महिला जिल्हाध्यक्ष गिरीजा जोशी, पूनम पाटील, टी.आर.पाटील राजेंद्र कोरे इत्यादी










