बँकेचा नफा,लाभांश,नोकरभरती व अवाजवी खर्च यावरून शिक्षक बँकेची सभा गाजली
बँकेचा नफा, लाभांश,नोकरभरती यावरून शिक्षक बँकेची सभा गाजली.
घोषणाबाजी आणि तणावाचे प्रसंग!!
कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्क्यांनी कपात तर कार लोन साडेनउ टक्के दराने
कोल्हापूर टाइम्स24 प्रतिनिधी
कोल्हापूर :बँकेचा नफा, लाभांश,नोकरभरती यावरून शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. शिक्षक बँकेची सभा आणि गोंधळाचे वातावरण हे समीकरण यंदाही कायम राहिले. बँकेचा नफा आणि लाभांश वाटप या दोन विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत एकमेकांची उणीदुणी आणि दोषारोप ठेवण्यात चढाओढ लागल्याचे चित्र सभेत पाहावयास मिळाले. मोठया आवाजात बोलणे, माईक घेण्यासाठी चढाओढ, शक्तिप्रदर्शन असे चित्र पहावयास मिळाले.सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेते मंडळी व माजी संचालक यांच्यात खडाजंगी आणि घोषणाबाजी ने वातावरण चांगलेच तापले. काही वेळ सभास्थळी तणावाचे प्रसंगही निर्माण झाले. बँकेतील सत्तापरिवर्तनानंतर झालेल्या पहिल्या सभेत सत्तारुढ आघाडीने माजी संचालकांच्या कालावधीतील कारभार चव्हाटयावर आणण्यात ताकत खर्ची घातली.तर विरोधी तथा माजी संचालकांना सत्ताधारी आघाडीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना चौकशीचे खुले आव्हानही दिले.पाच तासाहूनअधिक काळ सभा होउनही बँकेसंबंधी धोरणात्मक बाबीवर चर्चा कमी आणि गत कारभारावरून गदारोळ झाला.
बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत बँकेतील मागील तेरा वर्षाच्या कारभाराची चौकशी करुन त्यामध्ये कोणीही दोषी असू देत त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठरण्याचा ठराव करण्यात आला. तसेच माजी संचालकांच्या ज्या निर्णयाने बँकेचे नुकसान झाले, त्यासंबंधीची नुकसान भरपाई मागील संचालकांकडून वसूल करावी असाही ठराव केला. विरोधी संचालकांनीही सत्ताधाऱ्यांना उद्देशून, बँकेच्या कामकाजाची खरोखर चौकशी करावी असे खुले आव्हानच दिले. सभेत काही प्रश्नावरुन सत्ताधारी आक्रमक तर विरोधी आघाडी बचावात्मक असे चित्र होते.
दरम्यान दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली. बँकेच्या व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे यांनी सभासदांचे स्वागत केले. चेअरमन अर्जुन पाटील यांनी जवळपास पाउणतास प्रास्ताविक करताना मागील संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे लाभांश देता येत नाही याचे दु:ख वाटत असल्याचे सांगितले. त्यांनी भाषणात मागील संचालकांच्या कामकाजाचा पंचनामा केला. दरम्यान सभासदांना दिवाळी सणाच्या तोंडावर गोड बातमी म्हणून एक एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील ठेवीवरील व्याजदराची रक्कम एक ऑक्टोबर रोजी खात्यावर जमा करण्यात येईल.,असे चेअरमन अर्जुन पाटील यांनी जाहीर केले. शिवाय कर्जावरील व्याजदरात कपात करुन दहा टक्क्यावरुन तो ९.५० केल्याचे सांगितले. शिवाय कार लोन ९.५० दराने देण्याच्या निर्णयाची घोषणा पाटील यांनी केली.
………..
चेअरमन सोडून नेतेच उत्तरे देताहेत! विरोधकांचा सवाल बँकेचा चेअरमन कोण? अर्जुन पाटील म्हणाले चेअरमन लेचापेचा नाही!
चेअरमन पाटील यांचे प्रास्ताविक संपल्यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू होण्याअगोदर सभासदांनी काही प्रश्ने उपस्थित केली. यावेळी सत्तारुढ आघाडीचे नेते ज्योतिराम पाटील हे व्यासपीठासमोर उभे राहून सभासदांच्या प्रश्नांना मोठ्या आवाजात उत्तरे देउ लागले. शिवाय विरोधकांना उद्देशून, ‘तुम्ही खाली बसा, तुमचं राज्य संपलं’अशा शब्दांत डिवचले. त्याला विरोधी आघाडीने जोरदार आक्षेप घेतला. ‘सभेचे अध्यक्ष कोण आहेत ? अध्यक्षांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, सभास्थळी कोणी मोठया आवाजात बोलू नये’असे माजी चेअरमन संभाजी बापट, बाजीराव कांबळे यांनी ठणकावले. यावेळी अर्जुन पाटील यांनी चेअरमन लेचापेचा नाही असं सांगत या प्रकरणी हस्तक्षेप केला. या गोंधळातच २०२१-२२ चा वार्षिक अहवाल ताळेबंद व नफातोटा पत्रक नामंजूर केला. तर दोन्ही आघाडीच्या केंद्रस्थानी असलेल्या २०२१-२२ च्या नफा विभागणीस मंजुर देण्यात आली. सभेत विरोधी आघाडीचे मारुती दिंडे यांनी ज्योतीराम पाटील यांना उद्देशून तुम्ही सभा मॅनेज केला असा आरोप केला. त्याला पाटील यांनी आक्षेप घेत माझ्याविषयी चुकीची वक्तव्य करू नका असे म्हणाले.
…………
सीईओ मगदूम म्हणाले तो नफा खोटाच! सभागृह झाले अवाक!
सभेत चर्चेवेळी मागील संचालकांनी दाखविलेला दोन कोटी ३८ लाख हा नफा खोटा असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी स्पष्ट केले. त्याला माजी संचालिका लक्ष्मी पाटील यांनी जोरदार हरकत घेतली. “कोणाच्या दबावाखाली येउन सभागृहाला चुकीची माहिती सांगू नका. नफा खोटा असेल तर लाभांश देण्यास परवानगी कशी मिळाली ? लेखापरीक्षकांनी नफा मान्य कसा केला ? असा प्रश्नांचा भडीमार माजी संचालक प्रशांत पोतदार,संभाजी बापट, लक्ष्मी पाटील यांनी केला. यावेळी त्यांची चेअरमनांसोबत खडाजंगी झाली. बँकेचा एकूण नफा, लाभांश समीकरण निधीवरुन सत्ताधारी व विरोधक आमनेसामने उभे ठाकले. सत्ताधारी मंडळीकडून जोतिराम पाटील, रवी पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब पवार, संदीप मगदूम, उत्तम फराकटे तर विरोधी आघाडीकडून बापट, कांबळे, प्रशांत पोतदार, साहेब शेख, दिलीप पाटील, अरुण पाटील, प्रसाद पाटील यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला.
……….
खडाजंगी अन् घोषणाबाजीने प्रकाराने तणावाचे वातावरण.
चेअरमन अर्जुन पाटील यांनी मागील संचालक मंडळावर विविध कारणान्वये दोषारोप ठेवले. त्याला माजी संचालक प्रसाद पाटील यांनी विरोध करताना सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पाटील यांना बोलण्यासाठी लवकर माईकही दिला नाही. यामुळे संतापतलेल्या पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून, ‘आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. सभेत चुकीची माहिती दिला तर फौजदारी करू” असा इशारा दिला. यावेळी सत्तारुढ गटाचे काही सभासद त्यांच्या दिशेने पाहून मोठया आवाजात बोलायला लागले. गोंधळ वाढत गेला. पाटील यांच्यासोबत माईक हिसकावून घेण्याचा प्रकार घडला. या गोंधळात एकाने पाण्याची रिकामी बाटली हवेत भिरकावली.
………..
गुरुजींच्या आर्थिक शिखर संस्थेत अहवालात शुद्धलेखनाची चूक,मुखपृष्ठावरच चूक, अध्यक्षांची माफी!
बँकेच्या वार्षिक अहवालाच्या मुखपृष्ठावर राजर्षी हा शब्द राजर्षि असा छापला चुकीचा छापला आहे. शिवाय राजर्षी शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष १९२२-२०२२ असा असताना अहवालात मुखपृष्ठावर स्मृति शताब्दी वर्ष १९०२-२०२२ असा छापला आहे. या दोन्ही चुका विरोधी आघाडीचे संभाजी बापट, बाजीराव कांबळे यांनी निदर्शनास आणल्या. अध्यक्ष पाटील यांनी यासंबंधी चूक झाल्याचे सांगत माफी मागितली. हा खुलासा करताना मात्र वर्गात असल्यासारखे वाटत आहे असे वक्तव्य केले. तेव्हा घडलेल्या चुकाविषयी गांभीर्य आहे की नाही अशा भावना सभासदांनी व्यक्त केल्या. पोलीस बंदोबस्ताविना सभा घेतली असे सातत्याने सत्ताधारी आघाडी कडून सांगितले जात होते मात्र सभा गोंधळातच झाली. आणि या गोंधळात विरोधकासह सत्ताधारी आघाडीचे समर्थकही पुढे होते. अध्यक्षांचा अजेंडा- १.सर्व शाखा स्व.- मालकीच्या इमारतीत २.सभासदांना लाभांश देणार ३.सभासद संख्या वाढविणार ४.कोअर बँक प्रणाली अद्ययावत करणार ५. शिक्षकांचे पगार बँकेत सुरू करण्यासाठी प्रयत्न.
प्रश्नोत्तरे सुरू असताना संदीप मगदूम यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधत दाखविलेला नफा खरा आहे की खोटा हे MD मगदूम यांना विचारले असता तो खोटा आहे असे MD मगदूम यांनी सांगितले.शिक्षक बँकेत केलेली नोकरभरती बेकायदेशीर आहे,यासाठी सहकार आयुक्त, MSDTE यासारख्या कोणत्याही घटनात्मक यंत्रणेची परवानगी घेतली?शासनाच्या परिपत्रकानुसार नोकरभरती कुठेही नाही. नोकरभरती केली त्यावेळचे तत्कालीन चेअरमन साहेब शेख यांनी स्टाफिंग पॅटर्न ला मंजुरी पण नोकरभरती करणार नाही त्याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे,मग नोकरभरती कुणाच्या हितासाठी केली,व्हिडिओ क्लिप व्हायरल करू का?असे जोतिराम पाटील यांनी साहेब शेख यांना सुनावले. तेव्हा साहेब शेख यांनी या प्रश्नाला उत्तर दिले नाही.
एका सभासदाने ही नोकरभरती करण्यासाठी कोणती परीक्षा, मुलाखत घेतली?शिक्षकांची बँक असताना किती सभासदांची मुले पात्र असताना केवळ आर्थिक हितासाठी त्यांना डावलले,त्याची लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना घाईगडबडीने उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यामागचा अर्थ काय? असा आरोप सुनील पाटील यांनी केला ते म्हणाले निवड केलेल्यात एक कर्मचारी असा आहे त्याने दुसऱ्या वित्तीय संस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे,असा कर्मचारी शिक्षक बँकेत आहे हे दुर्दैव आहे. यावर माजी चेअरमन संभाजी बापट यांनी नोकरभरती बाबत जी कारवाई करायची ती करावी असे सांगितले.
सहकार नियमानुसार तज्ञ संचालकांना अनुमोदन देण्याचा नियम नाही,हा नियम धाब्यावर बसवला असल्याचे निदर्शनास आणून दिले., जुनी पेंशन संघटनेचे मंगेश धनवडे यांनी dcps मयत सभासद कल्याण निधीसाठी समिती गठीत केली आहे याबद्दल नूतन संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, याबरोबरच सर्वच सभासदांसाठी शाश्वत अशी योजना सुरू करावी ती दीर्घकाळ चालावी अशी मागणी केली. दिलीप वाळवेकर यांनी कालबाह्य झालेले सॉफ्टवेअर त्वरित बदला अशी मागणी केली.,कालबाह्य झालेल्या सॉफ्टवेअर साठी वारेमाप खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित केला.
कोल्हापूर ते राधानगरी तिजोरी वाहतूक २३०००/- व मलकापूर शाखा लॉकर दुरुस्ती ३००००/- यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले.,यानंतर सभासदांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय आर्थिक मदतीचा विषय निघाला यावर MD मगदूम यांनी माजी संचालकांनी केलेला खर्च सांगितला यात प्रसाद पाटील यांच्या नावाचा उल्लेख होताच त्यांनी हा निधी सभासदांच्या खात्यात जमा होतो हा संचालकांनी घरी नेला नाही,असे वारंवार स्पष्टीकरण देऊनही सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मोठ्याने आवाज करण्यास सुरुवात केली,यावर माजी संचालकांनी सभा सोडून जाणे पसंद केले.यानंतर सत्ताधारी गटाचे जोतिराम पाटील यांनी या माजी संचालकांना सभा सोडून जाऊ नका अशी वारंवार विनंती केली पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही.यानंतर सत्ताधारी गटाने सभा पुढे सुरू ठेवली.
मयत सभासद कल्याण निधी कै. रामचंद्र कांबळे,शिवाजी घोडके,नाना कांबळे यांच्या निधीची चौकशी ची मागणी संजय कुर्डुकर यांनी केली. आभार संचालक बाळासाहेब निंबाळकर,सूत्रसंचालन काष्ट्राइब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संजय कुर्डुकर यांनी केले. यानंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.










