क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूरचे कार्य प्रेरणादायी- गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर
क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर चे कार्य प्रेरणादायी – शिवाजी मानकर.
कोल्हापूर/ मारुती फाळके
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शांळाना प्रज्ञाशोध परीक्षा पुस्तके मोफत वितरण करणे हे कार्य खूप मोठे आहे. इतरांना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि प्राथमिक शाळांचा गुणवत्ता विकास हा ध्यास घेऊन हे ध्येयवेडे शिक्षक काम करत आहेत याचा गटशिक्षणाधिकारी म्हणून मला अभिमान वाटतो. असे प्रतिपादन पन्हाळ्याचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांनी केले. इतरांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करायला हवे. ते क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी साठी प्रज्ञाशोध परीक्षा तयारी साठी तयार केलेल्या पुस्तकांच्या मोफत वितरण प्रसंगी ते बोलत होते.
पोर्ले तर्फ ठाणे ता पन्हाळा येथे हा पुस्तक वितरण समारंभ संपन्न झाला. क्रिएटिव्ह टीचर्स फोरम ने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळांसाठी ही पुस्तके तयार केली असून या सर्व शाळांना ती मोफत उपलब्ध करून दिली आहेत. पन्हाळा तालुक्यातील सर्व एकूण १९५ शाळांना ही पुस्तके आज वितरीत केली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.शिवाजी मानकर, केंद्रप्रमुख श्री. बरगे, क्रिएटिव्ह टीचर्स फोरम चे भिवाजी काटकर, प्रकाश ठाणेकर, दीपक जगदाळे, तुषार चोपडे, बसंदास नोळे, महादेव गुरव, कुबेर चौगले, शरद कांबळे यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक बॅंकेचे संचालक रामदास झेंडे, पतसंस्थांचे पदाधिकारी आणि तालुक्यातील सुमारे दोनशे शिक्षक उपस्थित होते.
पंचायत समिती पन्हाळा ने उपस्थित शिक्षकांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत क्रिएटिव्ह टीचर्स फोरम च्या विजय एकशिंगे, तुषार चोपडे, संजय गावडे, असीफ पठाण, भाग्यश्री क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
भिवाजी काटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रकाश ठाणेकर यांनी सूत्रसंचालन केले तर विजय एकशिंगे यांनी आभार मानले.
यावेळी इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी १९८ गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविलेल्या वि. मं. आकुर्डे ता. पन्हाळा या शाळेतील कु. विभावरी प्रदीप पाटील हिचा फेटा बांधून व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
क्रिएटिव्ह टीचर्स फोरम ने आजअखेर केलेल्या शेक्षणिक आणि सामाजिक कार्यांचे कौतुक उपस्थितांकडून होत होते. गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मोफत दिलेले ३४ मोबाईल , ६५ विद्यार्थ्यांना मोफत पुरवलेल्या सायकल यांसह विविध कार्यशाळा, शाळांना पुरवलेली पुस्तके, शैक्षणिक साहित्य, पूरग्रस्तांना केलेली मदत या बाबींनी इतरांना प्रभावित केले. सुनीलकुमार लवटेसरांच्या मार्गदर्शनाखाली हा समूह कार्य करत आहे.
—————-
स्पर्धा परीक्षांत पन्हाळा तालुका आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्नशील.—पन्हाळा तालुक्यास प्रज्ञाशोध परीक्षा,शिष्यवृत्ती यांसारख्या स्पर्धा परीक्षेत आघाडीवर आणण्यासाठी क्रिएटिव्ह टीचर्स फोरम सर्वांना सोबत घेऊन कार्य करेल.- प्रकाश ठाणेकर, सदस्य, क्रिएटिव्ह टीचर्स फोरम कोल्हापूर










