March 26, 2026

४० लाख कर्जमर्यादा,२२% लाभांश व संचालकसंख्या २५- कोजिमाशि ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

0
IMG-20220926-WA0014

कोजिमाशि ची ४० लाख कर्जमार्यादा, २२ टक्के लाभांश, संचालक संख्या २१ वरून २५ वर!

 

कोल्हापूर/ मारुती फाळके :

कर्ज मर्यादा ४० लाख, २२% लाभांश व संचालक संख्या २१ वरून २५ करण्याचा महत्वपूर्ण ठराव ‘कोजिमाशि’ च्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.विरोधकांनी सभेकडे पाठ फिरवली.शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सभा संपन्न झाली,अध्यक्षस्थानी सभापती डॉ. डी एस घुगरे होते.सभासदांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता पाच लाखांचे कर्ज, सभासद व पाल्यांसाठी लॅपटॉप व टॅबसाठी बिनव्याजी कर्ज योजना”अशा महत्वपूर्ण घोषणा कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभेत करण्यात आल्या. 

 

प्रारंभी तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक नेते लाड भाषणात म्हणाले ‘निवडणूक झाली आणि विरोध संपला, आता आपण सगळे पतसंस्थेचे सभासद आहोत. कारभार करताना सत्ताधारी आणि विरोधक असा दुजाभाव करणार नाही’अशी ग्वाही दिली. २००५ ते आजअखेर मयत सभासद कर्जमाफी योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांचे कर्जमाफी दिली. आता या कर्जमाफीच्या पोटनियमात दुरुस्तीची गरज आहे. या योजनेतंर्गत कर्ज घेतल्यानंतर सभासद तीन महिन्यानंतर मयत झाला तरच संपूर्ण कर्जमाफी मिळेल. अपघाती निधन झाल्यास मात्र तीन महिन्याची अट नाही असे लाड यांनी स्पष्ट केले. हा ठराव सभेने मंजूर केला. निवडणुकीत सभासदांना दिलेला वचननामा येत्या पाच वर्षात पूर्ण करू असेही लाड यांनी सांगितले. सभासदांच्या मागणीनुसार कॅशलेस मेडिक्लेम योजना, सभासदांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पाच लाख कर्ज आणि प्रचलित व्याजदरापेक्षा अर्धा टक्के कमी व्याजदर दिला जाईल असे ते म्हणाले.

 

सभापती डॉ.डी एस घुगरे म्हणाले; संस्थेस ४ कोटी ५५ लाख नफा झाला असून सभासदांना 22 टक्के लाभांश दिला जाईल, 600 कोटी ठेवीचा टप्पा संस्था पार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेचे एटीएम व मोबाईल ॲप सुरू करण्याचा मानस आहे. यावेळी सभासदांनी त्यांना ” ओके ओके” म्हणून प्रतिसाद दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले. सर्व ठराव एक मताने मंजूर झाले.

 

सभेत अशोक मानकर, डी आर पवार, सागर पाटील, वंदना कांबळे,विजय कांबळे, आनंद कांबळे,महालिंग मिठारी, मधुकर पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. दरम्यान सभेपूर्वी संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुशिलादेवी कुलकर्णी व शिक्षण तज्ञ डी.बी पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. काही ठराविक लोकांच्या चौकटीतून शिक्षक आमदारांनी बाहेर पडावे, सभासदांचा कौल लक्षात घेऊन विधायक काम करणाऱ्याकडे यावे असे मत संजय परीट यांनी मांडले. ज्यांना उमेदवारी दिली नाही असे माजी सभापती हलगी वाजवून नाचले. पण त्याचा निवडणुकीत उपयोग झाला नाही परीट यांच्या या वक्तव्यास श्रीधर गोंधळी यांनी विरोध केला संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे राजेंद्र पाटील- भडगावकर,अनिल चव्हाण, दीपक पाटील,मनोहर पाटील, प्रकाश कोकाटे,ऋतुजा पाटील शितल हिरेमठ,मदन निकम, आदी उपस्थित होते.——————

महत्त्वाचे निर्णय— 

 संस्थेची कर्ज मर्यादा ३५ लाखावरून ४० लाख रुपये, ३० वरून ४० कोटी रुपये संस्थेचे अधिकृत भाग भांडवल करणे, ३५ वरून ४० हजार रुपये सभासद शेअर्स मर्यादा वाटणे सभासदांना २२ टक्के लाभांश, दिवाळीला दहा लिटर ख्याद्यतेल व एक किलो बासमती तांदूळ देण्यात येणार.
तीन तास सभा चालली. विरोधकांविना झालेल्या सभेत सत्ताधारी समर्थकांकडूनच काही प्रश्नावरून काहीसा गोंधळाचा प्रकार घडला.

जुलै २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कोजिमाशिची ही पहिलीच सभा. मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे सभा झाली. सभेत निवडणुकीचे पडसादही उमटले. माजी संचालकांनी एकत्र येते सत्तारुढ आघाडीचे नेते लाड यांचा सभेच्या प्रारंभीच सत्कार केला.  दरम्यान सभेला सुरुवात होताच विरोधी आघाडीचे बाबा पाटील, सुरेश संकपाळ, उदय पाटील, समीर घोरपडे, संजय डी. पाटील कुडित्रे, अजित रणिदवे, शिवाजी कोरवी सभास्थळातून बाहेर पडले.

 

…………………….. सत्तारूढच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या विधानाने सभेत गोंधळ, विरोधकांचा आक्षेप

—————————————-माजी उपसभापती संजय परीट यांनी प्रश्न विचारण्याऐवजी भाषण केले. त्यावरुन विरोधी सभासदांनी, परीट यांनी वार्षिक सभेला राजकीय व्यासपीठ बनविले व सत्तारुढच्या मेळाव्याचे स्वरुप दिले अशी टीका केली. मात्र परीट यांनी  वार्षिक सर्वसाधारण सभेचे भान न ठेवता  निवडणुकीचा संदर्भ घेत  म्हणाले, ‘सभेत विरोधक नाहीत, त्यांचे नेते नाहीत. निवडणुकीतील एकतर्फी विजयामुळे सभेत आपण २१ विरुद्ध शून्य अशा घोषणा देउ. ’असे म्हणत घोषणा द्यायला सुरुवात केली. इतरांनी त्यांना साथ दिली. परीट यांनी “आमदार जयंत आसगावकर यांना उद्देशून निवडणुकीत वाहने तुमची, पण मतदार आमचे होते. आमदारांनी सभासदांचा कौल मान्य करावा. आणि चांडाळ चौकडींना दूर ठेवावे.’ अशा शब्दांत वार्षिक सभेच्या व्यासपीठावरुन विरोधकांना डिवचले. विरोधी आघाडीत सामील झालेल्या एका माजी पदाधिकाऱ्याला उद्देशून, ‘हलगी वाजवत नाच्या नाचला’अशी टीका केली. परीट यांच्या टीकेला विरोधी आघाडीचे श्रीधर गोंधळी यांनी आक्षेप घेतला.‘हे राजकीय व्यासपीठ नाही. संस्थेची वार्षिक सभा आहे. पतसंस्थेविषयी बोला’असा पलटवार केला. यावेळी सत्तारुढ आघाडीचे माजी पदाधिकारी कैलास सुतार, विलास डवर त्यांच्या दिशेने धावले. गोंधळी यांना बोलू दिले नाही. सत्तारूढच्या अन्य समर्थकांनी गर्दी केल्याने गोंधळात आणखी भर पडली.

…………………

“सत्तारुढ आघाडीच्या काही मंडळींनी वार्षिक सभेला राजकीय स्वरुप दिले. अंगावर धावून जाणे, बोलू न देणे हे प्रकार अशोभनीय आहेत. लाभांश वाटपातही यंदा कपात केली. एक अंकी व्याजदराचा शब्द पाळला नही.  सभासदांचा हिरेमोड केला. ”

-श्रीधर गोंधळी, सभासद कोजिमाशि (विरोधी आघाडीचे उमेदवार २०२२)

…………

“संस्थेने सभासद हिताच्या विविध योजना आखल्या आहेत. मोबाइल अप, एटीएम सुविधा, कोअर बँकिग सुविधा प्रस्तावित आहे. स्वच्छ-सुंदर शाळा पुरस्कार, शिक्षक –कर्मचारी पुरस्कार लवकरच घेउ. महिला सखी मंच स्थापन करू.”

-प्राचार्य दत्तात्रय घुगरे, चेअरमन कोजिमाशि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!