छत्रपती शाहू महाराजांचे कृतिशील पाईक बना-संदीप मगदूम
छत्रपती शाहू महाराजांचे कृतिशील पाईक बना संदीप मगदूम
कोल्हापूर/ मारुती फाळके
छत्रपती शाहू महाराजांचे कार्य डोळसपणे समजावून घेऊन त्यांचे कृतिशील पाईक बना असे मत शाहू अभ्यासक, लोकराजा छत्रपती शाहू महाराज या पुस्तकाचे लेखक संदीप मगदूम यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीच्या वतीने 26 जून पासून प्रत्येक महिन्याच्या 26 तारखेला शाहू विचारांचा जागर करण्यासाठी एका प्रशालेत व्याख्यानाचे आयोजन केले जाते. या सलग व्याख्यानमालेतील व्याख्यानपुष् गुरुकुल आदर्श विद्यानिकेतन मिणचे पेठ वडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते .
संदीप मगदूम पुढे म्हणाले ,छत्रपती शाहू महाराज हे लोकत्तर राजे होते. त्यांनी भविष्याचा वेध घेऊन आपल्या संस्थानात केलेले कार्य हे केवळ आत्ताच्या पिढीला नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा मार्गदर्शन करणारे आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या भूमीत शिक्षणाची बीजे रोवली त्याची फळ म्हणून आज कोल्हापूर जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. शाहू महाराज हे विज्ञानवादी, विवेकवादी, समतावादी आणि मानवतावादी होते. नव्या पिढीने महाराजांचा वैज्ञानिक दृष्टी समजून घेऊन त्याचा अंगीकार करायला हवा. बालपणात महाराजांनी जोपासलेली ज्ञानसाधना ,श्रमप्रतिष्ठा ,अभ्यासू व्यसंगी वृत्ती ही त्यांच्या भविष्यकाळातील राज्यकारभारासाठी उपयुक्त ठरली. त्यांनी नाविन्याची, सृजनशीलतेची कास धरली होती. शेतीत नवनवे प्रयोग केले, उद्योग व्यवसायांना चालना दिली ,सहकारी संस्था स्थापन केल्या यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळाली.भविष्याचा वेध घेऊन त्यांनी काळानुरूप निर्णय घेतले. हे निर्णय घेत असताना प्रतिगामी रूढी परंपरा नाकारल्या. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याचे आयुष्यमान उंचावण्यासाठी त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला आणि समाजातील उपेक्षित वंचितांना विकासाच्या परिघात आणले. विद्यार्थ्यांनी आपण घेत असलेले शिक्षण हे तसेच प्रामाणिकपणे घ्यावं आपल्या अंतःकरणातला विवेक सदैव जागा ठेवावा .शाहू महाराजांनी मानवतेच्या भूमिकेतून सर्वांगीण कार्य केलं ते जाणून घेऊन त्याचा अंगीकार करावा. आपल्या जगण्यासाठी त्यांचे चरित्र दीपस्तंभ आहे. शाहू महाराजांच्या चरित्र अभ्यासातूनच सशक्त आणि समृद्ध पिढी घडेल .जी बलशाली भारताचे आधारस्तंभ बनेल.
शाहू विचारांचा जागर करण्यासाठी लोकोत्सव समिती करत असलेले कार्य शाहू महारांजांच्या पुरोगामी विकासात्मक विचारांना कार्यांजली आहे.
या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र मुंबई कोल्हापूर विभागाचे संचालक रमेश मोरे ,शिक्षण विस्तार अधिकारी एस के यादव गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी एस घुगरे ,कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशन संचालक भाऊ घोडके सर, मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे ,गुरुकुल निवासी विभाग पर्यवेक्षक एस जी जाधव ,अनिवासी विभाग प्रमुख एस ए पाटील, मुख्याध्यापक श्री शिवई सर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक एस जी जाधव सर यांनी केले .आभार एस ए पाटील सर यांनी मानले.










