March 26, 2026

तेरा टक्के लाभांश,लॅपटॉप साठी बिनव्याजी ५०००० कर्ज-एस व्ही पाटील

0
IMG-20220929-WA0003

     छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेने अल्पावधीत ठेवी व कर्जाचा रेषो राखत केलेली प्रगती कौतुकास्पद- शिक्षक नेते संभाजीराव थोरात 

कोल्हापूर/ मारुती फाळके

        छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेने अल्पावधीत ठेवी व कर्जाचा रेषो राखत केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.’असे गौरवोद्गार  शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी काढले. पतसंस्थेचे संस्थापक एस. व्ही. पाटील यांनी, ‘सभासदांना तेरा टक्के लाभांश व लॅपटॉपसाठी बिनव्याजी पन्नास हजार रुपये देणार’ अशी घोषणा केली.

छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षक बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल एस. व्ही. पाटील यांचा सपत्निक सत्कार थोरात यांच्या हस्ते झाला. तसेच संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचाही सत्कार करण्यात आला. शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी म्हणाले, ‘पतसंस्थेचे संस्थापक एस.व्ही. पाटील यांनी राज्याचे संपर्कप्रमुख म्हणून संघटनेत केलेले काम उल्लेखनीय आहे. पतसंस्थाही सभासदाभिमुख चालवली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.”

जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील म्हणाले, ‘एस. व्ही. पाटील यांचे संघटनात्मक काम उत्तम आहे. शिवाय त्यांनी पतसंस्था अल्पावधीत उत्तम रीतीने चालवल्यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीत राज्य पातळीवरील दोन नेत्यांना पराभूत करून करवीरमध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.’

संस्थापक चेअरमन एस. व्ही. पाटील म्हणाले, ‘सभासदांनी व्यक्त केलेला विश्वास व संचालकांचे भरीव पाठबळ यामुळे संस्था यावर्षी १८ कोटीची उलाढाल करू शकली. त्यामुळेच यावर्षी तेरा टक्के लाभांश देता आल्याचा मनस्वी आनंद होत आहे. यापुढे संस्थेला स्व:मालकीची इमारत व सभासदांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यास कटिबद्ध राहू.’ यावेळी संचालक बजरंग कुलगुडे यांचा गायनाचा कार्यक्रम झाला.

 

सचिव मनोज माळवदकर यांनी स्वागत केले. यावेळी महानंदा पाटील, विद्यादेवी कवळेकर, बाळासाहेब माने, राजाराम घुंगुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुराव खोत यांनी आभार मानले. प्राथमिक शिक्षक बँकेचे सीईओ संजय मगदूम, तज्ज्ञ संचालक सुरेश सोनगेकर, करवीरचे शाखाधिकारी बाळासाहेब पाटील वडणगेकर, जिल्हा परिषद सोसायटीचे संचालक श्रीकांत वरुटे, माजी तालुका अध्यक्ष बाजीराव जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!