बहुजनांची लेकरं घडवणारा समाजशिक्षक- भरत कुंभार सर
बहुजनांची लेकरं घडवणारा समाजशिक्षक- भरत कुंभार सर.
कोल्हापूर/ मारुती फाळके
आचार विचारांच अद्वैत फार कमी माणसांना जमतं, ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीच भान असणं आवश्यक असतं,आणि बांधिलकी सामाजिक अभिसरणातून अंगी बानवली जाते, आणि यातूनच समाजनिर्मितीची,संस्काराची प्रक्रिया सुरू होते, हे संस्कारमूल्य रुजवण्यामध्ये आई वडिलांच्या नंतर नैतिक जबाबदारी स्वीकारणारा घटक येतो तो म्हणजे शिक्षक. जीवनाला सार्थकता प्राप्त होते ती शिक्षकांच्यामुळे!
मग कवी बा.भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती या ठिकाणी सार्थ ठरतात
“जीवन त्यांना कळले हो!
मी पुन्हा ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो!
जीवन त्यांना कळले हो!
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चरा चरांचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो!
जीवन त्यांना कळले हो!!
मग अशा व्यक्ती समाजापुढे आदर्श ठरतात आणि या आदर्शांच्या विचारांच्या पाऊलवाटेवर समाज आपला मार्गक्रमण करत असतो. समाजाच्या दिशां समृद्ध होण्यात हेच विचार कामी येतात. म्हणूनच समाजाची एकूणच जडणघडण होण्यामध्ये ‘शिक्षक’ हा अत्यंत मूलभूत घटक मानला जातो. शिक्षकी पैशाचा हा संस्कार आणि संस्कृती चा वसा आणि वारसा ज्यांनी सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत इमानेइतबारे सांभाळला असे व्रतस्थ,बहुजनांची लेकरं घडवणारे समाजशिक्षक म्हणजे विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी ता.करवीर शाळेचे पदवीधर अध्यापक मा.भरत कुंभार सर नियत वयोमानानुसार दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.आज त्यांचा जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल येथे सेवानिवृती सदिच्छा समारंभ होत आहे,त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
संवेदनशील मन,सतत विद्यार्थी शाळा,समाज यांच्याबद्दल चिंतनशील असणारे कुंभार सर. घरची परिस्थिती बेताचीच. कष्ट,प्रामाणिकपणा,सचोटी आणि निष्ठा या आई वडिलांच्या संस्काराच्या मुशीत ते घडले. त्यांच्यावर विद्यार्थी दशेतच शिक्षक होण्याचे संस्कार बिंबले आणि हे व्रत त्यांनी निष्ठेने पूर्ण केले.शिक्षण विभागात त्यांची एकूण ३९ वर्ष यशस्वी व आनंददायी सेवा झाली.त्यांच्या नोकरीची सुरुवात १९८४ साली राजे शहाजी हायस्कूल खोची येथे झाली. तेथे २ वर्ष उत्कृष्ट पणे सेवा करून शिरोली हायस्कूल शिरोली पुलाची ता हातकणंगले येथे रुजू झाले; याठिकाणी कार्यरत असताना जिल्हा विज्ञान प्रदर्शना मध्ये तुषार सिंचन पद्धतीने शेतीस पाणी पुरवठा या उपकरणास जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला. १० वी च्या विध्यार्थ्यांची सायकलद्वारे परिसर भेट घडवून आणली.
दरम्यान कोकण निवड मंडळामार्फत तिडे नं १ ता.मंडणगड जि. रत्नागिरी या ठिकाणी नेमणूक झाली. अशा दुर्गम ठिकाणी कुस्ती सारख्या राष्ट्रीय खेळाचे त्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण दिले. त्यानंतर बदलीने ते विद्या मंदिर मरळी, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे रुजू झाले, त्या ठिकाणी अध्यापनाबरोबरच इतर सह शालेय उपक्रमाचे शिक्षण दिले. त्याचवेळी मा. जिल्हाधिकारी सो कोल्हापूर यांच्या आदेशाने “साक्षरता अभियान” या विभागाकडे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून नेमणून झाली.त्याठिकाणी यशस्वी पणे रात्रशाळेतील साक्षरता अभियान उपक्रम राबवून कळे विभागातील १० महसुल गावे १००% साक्षर केली या उपक्रमाची विशेष नोंद घेऊन मा. जिल्हाधिकारी सो यांनी अधिक 30 पगारी रजा मंजूर केल्या.
यानंतर प्रशासकीय बदली ने कन्या विद्या मंदिर कळे येथे १ वर्ष सेवा करून तालुका बदलीने शिरगाव ता.शाहूवाडी या ठिकाणी रुजू झाले, या शाळेत शाहूवाडी तालुक्यातील पहिले शालेय मुलामुलींचे झाजपथक तयार केले. त्याकाळी तालुक्यात या झान्झपथकाचे विशेष कौतुक झाले. शाळेच्या आर्थिक मदतीकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून १९९९ साली १० हजार रुपये इतकी रक्कम जमा केली. यामध्ये स्वतः हिरीरीने सहभाग घेऊन डफ हातात घेऊन पोवाडा गायन केले. त्या कालावधीत शासनाने त्यांच्या या कामाची विशेष नोंद घेऊन उत्कृष्ट कार्याबद्दल अधिक २ वेतनवाढी सन्मानाने प्रदान केल्या.
प्रशासकीय बदलीने हारुगडेवाडी येथे बदली झाल्यानंतर, तिथेसुद्धा शालेय अभ्यासक्रमा बरोबरच सहशालेय उपक्रमामध्ये “मैत्र चारा” हा सामाजिक उपक्रम राबविला. स्पर्धा परीक्षेत सुद्धा विद्यार्थ्यांना उज्वल यश मिळवून देत गोसावी समाजाच्या एका विद्यार्थ्यास जवाहर नवोदय विद्यालय कागल येथे प्रवेश मिळवण्यात मोलाचे सहकार्य केले. तसेच जिल्हा व तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना हिरीरीने भाग घेण्यास प्रोत्साहित करून प्रत्येक विभागात प्रथम द्वितीय असे अनेक सन्मान विद्यार्थ्यांना मिळविण्यासाठी यशस्वी मार्गदर्शन केले. राजश्री शाहू शिक्षण अभियानांतर्गत हारुगडेवाडी ता.शाहूवाडी शाळेस २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.ते सातत्यपूर्ण कामामुळेच. या यशाबरोबरच विद्यामंदिर हारुगडेवाडी शाळा जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून गौरवीली गेली. त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जि प कोल्हापूर येथे पार पडला. याच शाळेत काम करत असताना यशस्वीपणे अध्यापन करून शुभम कुंभार हा विध्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य स्तरावर ५ व्या क्रमाने उत्तीर्ण होऊन शासकीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला.
त्यानंतर ते तालुका बदलीने वडकशिवाले ता. करवीर येथे रुजू झाले. व ४ महिने यशस्वी सेवा करून पदोन्नती ने पदवीधर अध्यापक म्हणून २००८ साली विद्या मंदिर गिरगाव या ठिकाणी नेमणूक मिळाली. त्याठिकाणी सुद्धा अध्यापनाबरोबर इतर सहशालेय उपक्रम यशस्वी पणे राबविले., व त्याच ठिकाणी शाळेच्या जागेवर ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमन जिल्हा भूमापन अधिकारी यांच्याकडे यशस्वीपणे पाठपुरावा करून शाळेची अतिक्रमणा मध्ये गेलेली जमिन सर्व शिक्षकांच्या आर्थिक मदतीने शाळेस मोजणी करून परत मिळवुन घेतली. व त्या ठिकाणी शासनाकडून आर्थिक इमारत निधी मंजूर करून घेऊन ८ खोल्यांचे आर सी सी पद्धतीचे प्रशस्त वर्ग तयार केले गेले. त्
प्रशासकीय बदलीने १जून २०१६ रोजी विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी या ठिकाणी हजर होऊन त्याच उत्साहाने शालेय कामकाजाला सुरुवात केली.इयत्ता ७ वी च्या वर्गासाठी प्रज्ञाशोध परीक्षेत चांगले यश मिळवले. या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीचे झान्झपथक बसविले. तसेच वार्षिक स्नेहसंमेलन,वृक्षारोपण यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबवून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने शाळेस जिल्ह्यात नाव लौकिक मिळाला. अशी सचोटीने,कार्यतत्परतेने एकूण ३९ वर्ष शिक्षण विभागात यशस्वी पणे शैक्षणिक कार्य करून समाधानाने व आनंदाने मी सेवानिवृत्त होत आहे,असे त्यांनी कोल्हापूर टाइम्स २४ शी बोलताना सांगितले.
कुंभार सर म्हणजे चैतन्य,ऊर्जा,नम्रता,माणूसपण,जिव्हाळा आणि विद्यार्थी,शाळा,शिक्षक,समाज,पालक यांच्याप्रती माणूसपणाच्या ओलाव्याचं नातं निर्माण करणारा समाजशिक्षक च म्हणावा लागेल.,सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य त्यांना आरोग्यपूर्ण,सुख,समाधान,निरामय शांततेचे जावो याच या समारंभाच्या निमित्ताने अथांगभर शुभेच्छा!!!










