शिक्षक समितीच्या विभागीय अध्यक्षपदी अर्जुन पाटील
शिक्षक समितीच्या विभागीय अध्यक्षपदी अर्जुन पाटील
कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विभागीय अध्यक्षपदी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन अर्जुन दिनकर पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. मौजे तासगाव ता. हातकणंगले येथील अर्जुन पाटील हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत गेले २९ वर्ष कार्यरत असून संघटनेच्या कामाशी विचाराशी एकनिष्ठ राहिले आहेत.,
संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक आंदोलने यशस्वी करून शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला आहे. संघटनात्मक कामात असलेला त्यांचा हातखंडा, माणसं जोडण्याचा स्वभाव, अजातशत्रू,संघटन कौशल्य, समन्वय,कर्तृत्व आणि सक्षम नेतृत्व या गुणामुळे ते नेहमीच प्राथमिक शिक्षकांच्या चर्चेत राहिले आहेत. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्षपद सांभाळताना त्यांनी अनेक शिक्षक मित्र संघटना सोबत घेऊन यावर्षी झालेल्या बँकेच्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल तेरा वर्षानंतर सत्तांतर घडवून आणले आणि या यशाचे श्रेय म्हणून त्यांना सर्वप्रथम चेअरमन पदाचा सन्मान दिला गेला.त्यांनी शिक्षक बँकेच्या चेअरमनपदाच्या पहिल्याच काळात अनेक महत्वकांक्षी निर्णय घेऊन बँकेला नवी दिशा दिली आहे. यापूर्वी त्यांनी शिक्षक समितीतील आणि शिक्षक पतसंस्था मधील अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे.
संघटना पातळीवर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असताना २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक बांधवांसाठी जुनी पेन्शन मिळावी, २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद होउ नयेत, शिक्षकांचे पगार एक तारखेलाच व्हावेत यासाठी शिक्षक समितीच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशासन स्तरावर आंदोलने,मोर्चे यातून आवाज उठवला आहे. शिक्षक बांधवांचे पगार फरक, वेतन,समानीकरन, प्रॉव्हिडंट फंड पावत्या,मेडिकल बिले, शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षांच्या तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय सराव परीक्षांचे आयोजन यासाठी वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन संघटनात्मक सर्वच पातळीवर प्रभावी काम केले आहे.
माणसं जोडण्याच्या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना मानणारा शिक्षक समुदाय प्रचंड आहे.कोल्हापूर जिल्ह्याला अर्जुन पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्रात बलाढ्य संघटन असणाऱ्या शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्षपद मिळाल्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










