आशिष पाटील यांचे UPSC त सलग दुसऱ्यांदा यश
आशिष पाटील यांचे UPSC त दुसऱ्यांदा यश
४६३ रँक मुळे आयपीएस होण्याची खात्री
सातत्यपूर्ण अभ्यासाला स्मार्ट वर्क ची जोड दिलीत तर यश निश्चित – आशिष पाटील
भेडसगाव/ मारुती फाळके
“जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले!तेव्हा या विठ्ठले कृपा केली !!” समाजासाठी सचोटी,प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती विधाता कोणत्या रूपाने देईल याचा नेम नाही., बहुजन समाजातील लेकरांच्या शिक्षणासाठी नेहमीच कळवळा, तळमळ, त्याग आणि समर्पण भावनेने काम केलेले समाजशिक्षक अशोक बाळू पाटील यांचे चिरंजीव आशिष अशोक पाटील साळशी ता.शाहूवाडी यांनी नुकतीच संघ (केंद्रीय) लोकसेवा आयोगाच्या(upsc २०२२)नागरी सेवा परीक्षेतून सलग दुसऱ्यांदा ४६३ रँक संपादन करत लख्ख यश मिळवले. या यशामुळे डोंगरी असणाऱ्या शाहूवाडी तालुक्याने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेवरील हुकूमत सिद्ध केली आहे.,गतवर्षी झालेल्या मे २०२२ मध्ये ५६३ ही रँक मिळवत उपजिल्हाधिकारी म्हणून सध्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण करत असताना सलग दुसऱ्यांदा हे यश मिळवले आहे.सर्वसामान्य,ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम, जिद्द,अविरत चिकाटी,आई- वडिलांचे प्रोत्साहन, अभ्यासू मित्रपरिवार या पाठबळावर हे यश मिळवले आहे. गतवर्षीच्या गुणवत्ता रँक पेक्षा १०० रँक पुढे जात आय पी एस होण्याच्या ठोस आशा अधोरेखित झाल्या आहेत.
आशिष अशोक पाटील हे शाहूवाडीच्या मातीतील असा हिरा आहे की, त्यांचे प्राथमिक शिक्षण कडवे केंद्रातील वीरवाडी ता शाहूवाडी येथे झाले.चौथीला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीमध्ये राज्य गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक,त्यानंतर पाचवी ते सातवीचे शिक्षण सुपात्रे हायस्कूल सुपात्रे घेऊन माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक झाले होते. तदनंतर आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे पूर्ण करून १० वी ला ९७ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आले होते. याचवेळी एनसीईआरटी च्या परीक्षेतून एनटीएस परीक्षेसाठी पात्र होऊन या परीक्षेत देशभरातून निवडल्या गेलेल्या १००० विद्यार्थ्यांत समावेश होता. त्यानंतरचे पुढचे अकरावी,बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. बारावीला PCM हा ग्रुप ठेवून ८७% गुण मिळवुन शासकीय कोट्यातून कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून अभियांत्रिकी चे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण केले.चांगल्या पगाराची नोकरी मिळत असतानाही अभियांत्रिकी च्या तिसऱ्या वर्षाला असताना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात करून प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय निश्चित केले होते.जाज्वल्य इतिहास असणाऱ्या शाहूवाडीच्या मातीचा संस्कार त्यांना गप्प बसून देत नव्हता. याच काळात पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विश्वाची त्याची जवळीक झाली, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.,
दरम्यान जगभर कोरोनाचा हाहाकार माजला असताना कोरोनाचा काळ ही संधी समजून घरीच स्वयं अध्ययनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्वतयारी पूर्ण केली. कोव्हिडं च्या काळात यूपीएससी च्या अभ्यासाचा पाया रचला. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी केवळ साडेतीन महिन्याचे कोचिंग दिल्ली येथे घेतले. ज्ञानप्रबोधिनी पुणे येथे पूर्ण वेळ अभ्यास केला.येथे विवेक कुलकर्णी तर मुलाखतीची तयारी IPS महेश भागवत यांच्याकडे पूर्ण केली.माध्यमिक शाळेत असताना व स्पर्धा परीक्षेतील अभ्यासासाठी महात्मा गांधी विद्यालय बांबवडेचे सेवानिवृत्त शिक्षक एन ए पाटील सर,जाधव मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.सातत्यपूर्ण अभ्यास चालू असताना २०२१-२२च्या पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षेत यशाने हुलकावणी दिल्यानंतर सन २०२२,२०२३ या दोन्ही वर्षातील सलग परीक्षेत यश खेचून आणले. जिद्दीने अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात ५६३ रँक संपादन करून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली,परंतु मनात IAS किंवा IPS होण्याचे स्वप्न स्वस्थ बसून देत नव्हते,पुन्हा जोमाने २०२३ च्या परीक्षेमधून नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये ४६३ रँक ने उत्तीर्ण होऊन त्याने आत्मविश्वासपूर्वक आयपीएस पदाला गवसणी घालण्याची पोस्ट निकाल लागेपर्यंत औपचारिकता बाकी ठेवली आहे. आशिष यांनी आपल्या नावाच्या अर्थाप्रमाने स्वतःला सिद्ध केलेआहे. या यशामध्ये ज्या एका संचिताच,पाठबळ देणाऱ्या वडाच्या झाडासारखं त्याच्या पाठीशी ठामपणे “तू लढ” म्हणण्यासाठी उभे आहेत ते म्हणजे आशिष चे आई वडील.
खरेतर हे यश संपादन करत असताना आशिष पाटील यांच्यातील अनेक गुणांचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे अंगी असलेली प्रचंड चिकाटी आणि एखाद्या अज्ञात गोष्टीच्या माहितीसाठी त्याच्या खोलीपर्यंत जाण्याची सजगता व जिज्ञासू वृत्ती हे यशाचे गमक म्हणावे लागेल.शाहूवाडी तालुक्यासारख्या दुर्गम डोंगराळ भागात स्पर्धा परीक्षेची दैदीप्यमान परंपरा आशिष पाटील यांच्या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.यापूर्वी सुद्धा तालुक्यातील अनेकांनी UPSC च्या पदावर आपले नाव कोरले आहे. त्याग,समर्पण,कठोर परिश्रम आणि सातत्य हेच हे या यशाचे रहस्य म्हणावे लागेल. आशिष पाटील यांचे यश म्हणजे समाजासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या बापाचा कष्टाचा व या कुटुंबाला समर्थपणे सांभाळणाऱ्या आईच्या समर्पणाचा हा विजय आहे. कारण वडील अशोक बाळू पाटील हे पदवीधर शिक्षक म्हणून सध्या विद्यामंदिर सावे या शाळेत कार्यरत असून अशोक पाटील यांचे यांचे आजवर शेकडोच्या वरती विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र, नवोदय विद्यालयपात्र, एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक झाले आहेत, समाजासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या संस्काराचा विचार घेऊन,बहुजनांची लेकरं घडवणाऱ्या पाटील सरांनी आजवर अनेक मोडकळीस झालेल्या शाळा उभ्या करून लौकीकप्राप्त केल्या आहेत. आयुष्यभर प्रामाणिकपणे राबलेल्या एका समाजशिक्षकाच्या कष्टाचा हा गौरव आहे. कारण अशोक पाटील सरांनी सर्वप्रथम समाजाची लेकरं घडवलीत.या यशामध्ये ते फक्त समुपदेशक नसून एका “आदर्श बापाची” भूमिका बजावलेली आहे.
————————————————————-
आशिषने मिळवलेले यश हे त्याच्या अंगभूत गुणांचे,संस्काराचे फलित आहे.,ग्रामीण भागातील मुलाकडे खूप टॅलेंट असते,परंतु त्यांना दिशा मिळत नाही,काही गोष्टीचा त्याग केल्यानंतर जीवनात आपण खुप मोठे होऊ शकतो, त्यासाठी व्यासंगाची गरज आहे.,आई वडिलांचे पाठबळ,जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भेटणारे गुरू मौलिक असतात हेच आशिष च्या यशाचे गमक आहे. न्यूनगंड असणाऱ्या तमाम ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे यश आहे.
–अशोक बाळू पाटील,(शिष्यवृत्ती मार्गदर्शक)
पदवीधर अध्यापक विद्या मंदिर सावे ता.शाहूवाडी(आशिष पाटील यांचे वडील)
——————————————————– स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडा,स्पर्धा परीक्षेत चिकाटी,कठोर परिश्रमाला स्मार्ट वर्क ची जोड दिली तर स्पर्धा परीक्षेचा प्रवास निश्चित यशदायी आहे.समाधान हे क्षणिक गोष्टीत मानू नका,त्यासाठी उच्च ध्येय ठेवा.हे जेव्हा मनावर बिंबले तेव्हाच ध्येय निश्चित केले होते.नागरी सेवा परीक्षेचे उपलब्ध साहित्य यांचा अभ्यास करून इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून पूर्व परीक्षा दिली,सातत्यपूर्ण स्वयंअध्ययनाने यश मिळाले., याबरोबर स्केच रेखाटने,साहित्य वाचन या अवांतर छंदामुळे नेहमी आनंदी राहिलो. या यशाचे श्रेय आई वडील,सर्व मार्गदर्शक, माझ्या मातीतले संस्कार,वडिलांचा विचार,आईच्या डोळ्यातील मला ऊर्जा देणारे भाव याना समर्पित करतो.
-आशिष अशोक पाटील उपजिल्हाधिकारी
केंद्रीय लोकसेवा आयोग २०२३ ( रँक ४६३)
——————————————————————
ज्यांची शिक्षकी पेशाची आजवरची सेवा बहुजनांच्या लेकरांना घडवण्यात गेली., प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अनेक गोरगरीब, निराधार, बहुजन समाजाची मुले घडवली असे समाजशिक्षक अशोक पाटील यांचे सुपुत्र आशिष पाटील यांचे यश याचा तमाम शाहूवाडीकरांना अभिमान आहे.आशिष चे यश हे त्याच्या अपार कष्टाचे फलित आहे.
——विक्रम पाटील सर.
(शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक)साळशी.










