March 26, 2026

सच्चा समाजशिक्षक ते लोकसेवक-मा.दत्ता घाटगे सर

0
IMG-20230517-WA0003

सच्चा समाजशिक्षक ते लोकसेवक..

माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता घाटगे यांचा जीवनप्रवास.,अचानक घेतली एक्झिट..

कोल्हापूर/ मारुती फाळके

मिणचे ता. हातकणंगले येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय विष्णू घाटगे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी झालेल्या अकाली निधनाने हातकणंगले तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत घाटगे सरांनी स्वतःला घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘सनदी’ म्हणून काम करणारे सामाजिक पिंड असणारे वडील दलितमित्र पुरस्कार प्राप्त विष्णू घाटगे यांच्या संस्काराच्या मुशीत ते घडले.,”पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा” असं माझ्या लेकानं घडावं,लाल दिव्याच्या गाडीतून माझ्या सरांन यावं हे आईच स्वप्न अधुरच राहिलं.,त्यांच्या पश्चात वडील,पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मंदा घाटगे,पुत्र मिणचे चे माजी उपसरपंच राज घाटगे,मुलगी,भाऊ,३ बहिणी असा मोठा परिवार आहे.

 

अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत त्यांनी इंग्रजी विषयातून MABED पदवी घेत घुणकी येथील शिवाजी हायस्कूल येथे शिक्षक झाले.,नोकरीच्या काळात शाळेची प्रगती व असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला,शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असायचे.,विषयावरची पकड, प्रभावी अध्यापन कौशल्य यामुळे आजही ते असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात घर करून आहेत.,खरंतर शिक्षक म्हटलं की चाकोरीबद्ध जीवन,विद्यार्थी घडविणे आणि स्वतःच कुटुंब एवढीच बांधलकी असते पण आपल्यातील नेतृत्व गुण गप्प न बसून देता “माझा जन्म हा बहुजन समाजाच्या कामी यायला पाहिजे” या हेतूने सुरवातीला माजी मंत्री,काँगेसचे ज्येष्ठ नेते जयवंतराव आवळे यांच्या तालमीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. घाटगे सरांना कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नव्हती,परंतु माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांना समर्थपणे साथ दिलेले माजी आमदार के.एन. घाटगे यांच्या विचार व संस्कारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.२७ वर्ष त्यांनी आवळे साहेबांचे प्रमाणिकपणे काम केले,त्या काळात आवळे साहेबांच्या नंतर दत्ता घाटगे असे नाव तालुक्यात परिचित होऊ लागले. या संधीचा फायदा उठवत ते १९९२ व १९९७ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत होते.१९८० पासून जयवंतराव आवळेंचे ते प्रमुख कार्यकर्ते होते.घाटगे च्या राजकीय प्रवासामधील जयवंतराव आवळे राजकीय गुरू होते. घाटगे सर शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्यातील नेतृत्व गुण,सतत समाजाचा विचार,सामाजिक बांधिलकी हे अंतस्थ गुण त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते.

 

२००२ ते २००७ या काळात पहिल्याच प्रयत्नात माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा परिषद सदस्य झाले. विजयश्री खेचून आणली आणि येथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची यशस्वी समीकरणे सुरू झाली. खरंतर कोणीही सर्वस्व घेऊन जन्माला येत नसतो, कर्तृत्वातून स्वतःची ओळख निर्माण करावी लागते,ती ओळख घाटगे सरांनी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर निर्माण केली. क्वचितच कार्यकर्ते स्वतःचा कोणताही वारसा नसताना आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून स्वतःची राजकीय सामाजिक ओळख निर्माण करून समाजाच्या कामी येत असतात यापैकी घाटगे सर होते.म्हणूनच घाटगे सर 20 वर्ष पदावर होते.,

 

जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला.राजकीय महत्वकांक्षा असणाऱ्या घाटगे सरांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली परंतु वेळोवेळी झालेल्या राजकीय समीकरणामुळे त्यांना यश आले नाही, पण त्यांना मिळालेला जनाधार हा तालुक्यातील मातब्बरांना घाम फोडणारा होता.,खरेतर घाटगे सर २००९ लाच आमदार झाले असते शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला असताना सुद्धा ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विनंतीनुसार त्यांनी “रिडालोस”मधून निवडणूक लढवली,या निवडणुकीत तीस हजारच्या वर मते मिळाली, आणि याच निवडणुकीत शिवसेनेतुन सुजित मिणचेकर आमदार झाले. शिवसेनेचा AB फॉर्म रद्द करणे,हीच राजकीय चूक त्यांच्या महागात पडली नाहीतर घाटगे सर 2009 ला आमदार झाले असते. राजकिय प्रवासात विरोधकांनी त्यांना वेळोवेळी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला,परंतु प्रत्येक निवडणूकित ते प्रस्थापिता विरोधात लढले.

 

2014 साली समाजकारण व राजकारणासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.व ते पूर्ण वेळ समाजकारण व राजकारणात सक्रिय झाले,२०१४ ला पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभा लढवली या वेळी सुध्दा त्यांना अपयश आले. त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार प्रकाश आबिटकर,माजी आमदार सत्यजित पाटील,कै. अशोकराव माने, जनसुराज्य चे प्रवक्ते विजयसिंह जाधव, सर्जेराव पाटील पेरीडकर हे त्यांचे काही जिवलग मित्र मित्र होते.

 

नम्र,धाडसी स्वभाव,जिद्द ,चिकाटी,अभ्यासू वृत्ती, कार्यकर्त्यांला जीव लावण्याचा अंतस्थ गुण, माणुसकीच्या अगणित गुणांनी भारलेले घाडगे सर व त्यांचे कुटुंब हे तालुक्यातील अनेकांना आधार होते. मतदारसंघात मूलभूत सुविधाचें जाळे निर्माण करण्यात त्यांनी घेतलेली आघाडी,सुस्वभावी घाडगे सर आजही कार्यकर्त्यांच्या काळजात आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना,रस्ते,गटर्स, शेती, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधा तालुक्यातील अनेक गावांत पूर्णत्वास आणण्यास नेहमीच ते पुढे होते.पायाभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या मागास समाजाच्या उन्नतीच्या योजना घरोघरी पोहोचवल्या, त्यांच्या काळात उल्लेखनीय झालेले काम म्हणजे टोप,तासगाव आणि अंबप या गावातील पाण्याचा बिकट पाणी प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून गावांमध्ये पाणी आणले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना घरकुल दिली.मतदारसंघातील वंचित, शोषित,पीडित लोकांच्या न्याय हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिले. समाजामध्ये औद्योगिक क्रांती व्हावी,बेरोजगार युवकाना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी त् अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लक्ष्मी औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली.

 

घाटगे सर हे 2 वेळेस पंचायत समिती सदस्य,2 वेळा जिल्हा परिषद सदस्य, वारणा कारखान्याचे माजी संचालक, लक्ष्मी औद्योगिक सहकारी संस्थेचे ते संस्थापक होते. घाटगे सर म्हणजे माणुसकीचा जिवंत झरा.सर जाण्याची लवकर घाई केलीत,सर अजून आपण 20 वर्ष तरी पाहिजे होता,सर आम्हाला वाऱ्यावर सोडून का गेलात असा आक्रोश करून आज असंख्य कार्यकर्ते,निकटवर्तीय गहिवरत आहेत.,सर आपण घेतलेली अचानक एक्झिट अजूनही मनाला पटत नाही,आपण इथेच कुठेतरी असल्याचा भास होतो आहे,सर आपण परतून याल का?आमचं गाऱ्हाणं ऐकून घेणारे आमचे सर आम्हाला पुन्हा भेटणार नाही या अतीव दुःखाने कार्यकर्ते कोलमडून गेले आहेत.,घाडगे सरांचा वारसा आणि अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाची पूर्तता आणि जबाबदारी त्यांचे चिरंजीव मिणचे चे माजी उपसरपंच राज घाटगे व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मंदा घाटगे यांच्या खांद्यावर आहे.,

 

खरंच सर आपण घाईच केलीत. राजकारणाची पातळी खालवलेल्या आजच्या वातावरणात घाडगे सरांसारखी काही माणसं पुन्हा जन्म घेतील का? हे वास्तव आहे. अजातशत्रू, प्रेमळ स्वभाव,निखळ हास्य,सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं करणाऱ्या स्वभावामुळे घाटगे सर हे निरंतर, चिरंतन अगणितांच्या काळजात अढळ राहतील यात तिळमात्र शंका नाही..!! घाटगे सर विनम्र आदरांजली!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!