March 26, 2026

बहुजनांची लेकरं घडवणारा समाजशिक्षक- सिद्राम भानसे सर

0
IMG-20230624-WA0003

बहुजनांची लेकरं घडवणारा समाजशिक्षक- सिद्राम भानसे सर.

सेवानिवृत्तीनिमित्त उद्या विठ्ठल बिरदेव मंदिर सभागृह पट्टनकोडोली येथे सदिच्छा समारंभ.

कोल्हापूर/ मारुती फाळके

         आचार विचारांच अद्वैत फार कमी माणसांना जमतं, ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीच भान असणं आवश्यक असतं,आणि बांधिलकी सामाजिक अभिसरणातून अंगी बानवली जाते, आणि यातूनच समाजनिर्मितीची,संस्काराची प्रक्रिया सुरू होते, हे संस्कारमूल्य रुजवण्यामध्ये आई वडिलांच्या नंतर नैतिक जबाबदारी स्वीकारणारा घटक येतो तो म्हणजे शिक्षक. जीवनाला सार्थकता प्राप्त होते ती शिक्षकांच्यामुळे!
मग कवी बा.भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती या ठिकाणी सार्थ ठरतात
“जीवन त्यांना कळले हो!
मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो!
जीवन त्यांना कळले हो!
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चरा चरांचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो!
जीवन त्यांना कळले हो!!
मग अशा व्यक्ती समाजापुढे आदर्श ठरतात आणि या आदर्शांच्या विचारांच्या पाऊलवाटेवर समाज आपला मार्गक्रमण करत असतो. समाजाच्या दिशां समृद्ध होण्यात हेच विचार कामी येतात. म्हणूनच समाजाची एकूणच जडणघडण होण्यामध्ये ‘शिक्षक’ हा अत्यंत मूलभूत घटक मानला जातो. शिक्षकी पैशाचा हा संस्कार आणि संस्कृती चा वसा आणि वारसा ज्यांनी सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत इमानेइतबारे सांभाळला असे व्रतस्थ,बहुजनांची लेकरं घडवणारे पट्टनकोडोली गावचे सुपुत्र,प्रसिध्द विठ्ठल बिरदेव देवस्थानचे प्रमुख मानकरी ,समाजशिक्षक म्हणजे कुमार विद्या मंदिर इंगळी ता.हातकणंगले शाळेचे मुख्याध्यापक मा.सिद्राम खानु भानसे सर नियत वयोमानानुसार दि.३० जून २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.आज त्यांचा विठ्ठल बिरदेव सभागृह पट्टनकोडोली येथे सेवानिवृती सदिच्छा समारंभ होत आहे,त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…

 

संवेदनशील मन,सतत विद्यार्थी शाळा,समाज यांच्याबद्दल चिंतनशील असणारे सिद्राम भानसे सर. घरची परिस्थिती बेताचीच. कष्ट,प्रामाणिकपणा,सचोटी आणि निष्ठा या आई वडिलांच्या संस्काराच्या मुशीत ते घडले. त्यांच्यावर विद्यार्थी दशेतच शिक्षक होण्याचे संस्कार बिंबले आणि हे व्रत त्यांनी निष्ठेने पूर्ण केले.शिक्षण विभागात त्यांची एकूण ३७ वर्ष यशस्वी व आनंददायी सेवा झाली.त्यांच्या नोकरीची सुरुवात १९८६ साली दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल पट्टनकोडोली येथे झाली. तेथे २ वर्ष उत्कृष्टपणे सेवा बजावत असताना निवड मंडळामार्फत अध्यापक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूरकडे निवड झाली. अभ्यास आणि गुणवत्ता पारखून त्यांना हातकणगले तालुक्यात कुमार इंगळी या शाळेत पहिली नेमणूक मिळाली.नोकरीच्या सुरवातीच्या काळात नव्या उर्जेसह कुमार इंगळी येथे २२ वर्ष कार्यरत असताना शिष्यवृत्ती,नवोदय स्पर्धा परीक्षा,क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा सर्वच विभागात उठावदार काम केले. या शाळेतील त्यांचा मनोजकुमार ऐतवडे हा विद्यार्थी तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर विद्या मंदिर न्यू राजापूर या ठिकाणी बदली झाली. पुनर्वसन होऊन आलेल्या या गावात देखील त्यांनी ३ वर्ष ज्ञानदानाचे यशस्वीपणे कार्य पार पाडले. त्यानंतर बदलीने ते विद्या मंदिर यादववाडी ता.करवीर येथे १.५ वर्ष सेवा बजावली, तदनंतर कन्या विद्या मंदिर कबनुर ४.५ वर्ष,त्या ठिकाणी अध्यापनाबरोबरच शाळेची प्रगती करण्यात योगदान दिले. कबनूर येथील ४.५ वर्षाच्या सेवेनंतर कन्या विद्यामंदिर पट्टणकोडोली येथे त्यांच्या मूळ गावी बदली झाली.२०१८ ते २०२३ या कन्या पटटणकोडोली शाळेतील सेवेत त्यांनी विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सहशालेय उपक्रम, बौद्धिक स्पर्धा, शिष्यवृत्ती -नवोदय या शैक्षणिक उपक्रमात उल्लेखनीय काम केले.,सेवेत असताना अनेक विद्यार्थी घडवले,शाळा उभ्या केल्या,गोरगरीब,असंख्य वंचित,निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले,,याच विधायक कामाचे संचित म्हणून सेवेच्या उत्तरार्धात कार्यरत असताना विठ्ठल बिरदेवाच्या आशीर्वादाने ज्या ठिकाणी नोकरीची सुरुवात केली त्याच कुमार इंगळी शाळेत पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी प्रमोशन झाले . आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचे फळ म्हणून विठ्ठल बिरदेवाच्या कृपाशीर्वादाने ज्या ठिकाणी सेवेची सुरुवात केली त्याच ठिकाणी,त्याच शाळेत त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली,.त्यांच्या सेवेचे,सामाजिक बांधिलकीचे वर्तुळ पूर्ण झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

 

आजवर केलेल्या शैक्षणिक,सामाजिक, संघटनात्मक,विधायक कामाच्या संचीताने भानसे सरांचे थोरले चिरंजीव विवेक आज डॉक्टर झाले आहेत, त्यांची एक कन्या बटकडली हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून तर दुसरी मुलगी कॉम्प्युटर इंजिनीयर म्हणून कार्यरत आहे. ३७ वर्षाच्या प्रामाणिक सेवेमध्ये ज्या समाजातून आपण आलोत त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून त्यांनी बहुजनांची लेकर घडवण्याचं निष्ठेने, प्रामाणिकपणे काम केले., आपण मोठे होत असताना, प्रगतीच्या पाऊल वाटेवर चालत असताना आपल्याबरोबर आपल्या समाजालाही,आपल्या सहवासातल्या प्रत्येकाला बोट धरून पुढं आणावं, चांगलं सांगावं, बहुजन समाजाला आपल्या ज्ञानाचा सुगंध द्यावा, त्यांना मार्गदर्शन करावे या आई वडिलांच्या संस्कारातून भानसे सरांनी केलेले कार्य हे समाजाने दखल घ्यावे असे नक्की आहे.

 

भानसे सरांच्या जीवनातील आवर्जून लिहावे असे महतकार्य म्हणजे भानसे सरांच्या सानिध्यात आलेल्या भूपाल पुजारी या विद्यार्थ्याने दुसरी ला असताना तिसरीच्या इतिहास विषयातील अनुक्रमणिकेतील “थोरांची ओळख” या पाठ्यपुस्तकातील २२ धडे असणारी अनुक्रमणिका अवघ्या नऊ मिनिटात पाठांतर केली,त्याच्यातील बुद्धिमत्तेचे कसब पाहून त्यांनी त्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी जीवाचे रान केले. त्याच्या घरचे दारिद्र्य, अज्ञान आणि कोणतेही पाठबळ नसताना त्या विद्यार्थ्याला मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्याचे यशस्वीपणे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. या MBBS च्या प्रवेशादिवशी स्वतःच्या एकुलत्या एका मुलाच्या बारश्याच्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते.,किती ही समाजातील लेकरासाठी असणारी तळमळ! ज्या ज्या वेळी त्याला आर्थिक गरज लागेल तेव्हा तेव्हा शिक्षक बँकेचे कर्ज काढून त्यांनी त्याला शिक्षणासाठी पैसा पुरवला,पाठबळ दिले आज तो मुलगा कोल्हापुर येथील राजारामपुरी येथील श्री पुजारी हॉस्पिटल हे स्वतःचे नामांकित हॉस्पिटल चालवत असून कोल्हापुरातील नामांकित हृदयरोग तज्ञ म्हणून नावारूपास आला आहे. त्याचे सर्वस्वी श्रेय भानसे सराना जाते.

 

भानसे सरांनी आजवर केलेले कार्य हे दारिद्र्याने,परिस्थितीने पिचलेल्या मुलांसाठी केलेले आदर्शवत कार्य आहे. भानसे सरांसारखी माणसं आज निर्माण होणं ही आज समाजाची गरज आहे., कारण या आधुनिकतेच्या जमान्यांमध्ये प्रेम, माया, ममता- जिव्हाळा,आधार या गोष्टी कुठेतरी लुप्त होत चाललेल्या या व्यवहारी जगाच्या वातावरणात भानसे सरांसारखी माणसं ही समाजाला खरीखुरी दिशादर्शक ,मार्गदर्शक आणि समाजाला परिवर्तनाच्या वाटेवरती नेऊन ठेवणारे ज्ञानरूपी दीपस्तंभ आहेत.आजवर ज्या ज्या शाळेत सेवा बजावली तिथं तिथं सहकाऱ्यांच्या मदतीने त्या त्या शाळेस जिल्ह्यात नावलौकिक मिळवला.,

 

नोकरीच्या सुरुवातीपासूनच शिक्षक समिती या महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटनेबरोबर एकनिष्ठ राहून शिक्षक समितीच्या प्रत्येक आंदोलन,मोर्चे,मागण्या, वेळोवेळी होणारे शासन दरबारीचे उठाव यामध्ये अग्रभागी राहून संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला.,संघटन कौशल्याच्या जोरावर माणसं जोडली,त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग घेत असताना जिल्हाभर असंख्य कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले,.याच कामाची पोच पावती म्हणून सध्या शिक्षक बँकेत समिती-संघ व अन्य संघटनाची युती होऊन बँकेतील सत्ता मिळण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान ते बोलून दाखवतात.भानसे सरांना मानणारा जिल्ह्यात मोठा शिक्षक समितीचा वर्ग आहे. सुरुवातीच्या नोकरीच्या काळात इंगळी येथील बाळू पाटील या शिक्षक मित्राच्या मार्गदर्शनाने ते शिक्षक समितीशी जोडले गेले ते आजवर एकनिष्ठ राहिले.संघटनेतील कामाच्या बळावर सलग २५ वर्ष राजगोपालाचारी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक, दोन वेळा चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अस्मिता असणाऱ्या हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला ऊर्जितावस्था देण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून ते संचालक म्हणून कार्यरत आहेत.या पतसंस्थेला ऊर्जितावस्था देण्यासाठी तालुक्यातील बुजुर्ग नेतेमंडळींनी चेअरमनपद घ्या, असा आग्रह करत असताना या सन्मानाच्या पदाला विनम्रपणे नकार देत त्यांनी वरिष्ठांना संधी देऊन स्वतःतील विनम्रपणाचे दर्शन घडवले. आयुष्यभर “न्यायाची चाड, अन्यायाची चीड”! या तत्त्वाला अनुसरून शिक्षक समितीच्या प्रत्येक कार्यात ते अग्रभागी राहिले.
शिक्षकसमिती या संघटनेच्या झेंड्याखाली त्यांनी कोणत्याही पदाची लालसा न बाळगता संघटनेच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून असंख्य शिक्षकांची सेवा केली.

 

सचोटीने,कार्यतत्परतेने एकूण ३७ वर्ष शिक्षण विभागात यशस्वीपणे शैक्षणिक कार्य करून समाधानाने व आनंदाने मी सेवानिवृत्त होत आहे,असे त्यांनी कोल्हापूर टाइम्स २४ शी बोलताना सांगितले.भानसे सर म्हणजे चैतन्य,ऊर्जा,नम्रता,माणूसपण,जिव्हाळा आणि विद्यार्थी,शाळा,शिक्षक,समाज,पालक यांच्याप्रती माणूसपणाच्या ओलाव्याचं नातं निर्माण करणारा समाजशिक्षक म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिध्द असणाऱ्या विठ्ठल बिरदेव देवस्थानचे प्रमुख मानकरी,गावातील न्याय निवाडा करणारे प्रमुख,गावातील सहकार,शिक्षण,संस्था यांच्यातील प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका समर्थपणे बजावत आहेत. सरांनी सहवासात आलेल्या प्रत्येकाला आपल्या स्मित हास्याने व तोंड भरून बोलण्याने कधी आपलेसे करावे हा त्यांचा स्थायीभावच. सुंदर हस्ताक्षर,मार्मिक शब्दांची नेमकी मांडणी,हसमुख स्वभाव,नम्रता, नेतृत्वगुण,उत्तम संघटन वृत्ती,मदतीला धावून जाण्याचा अंगभूत संस्कार हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू.

 

सेवानिवृत्त होताना तीच ऊर्जा,उमेद आणि माणूसपणाचा जिव्हाळा वृध्दींगत करणारा त्यांच्या मनाचा अंतर्भाव कायम टिकून आहे., भानसे सर म्हणजे मानाचे पुजारी आणि समाजमान्यता लाभलेले मानाचे समाजशिक्षकच म्हणावे असे त्यांनी आजवरचे वैयक्तिक,सामाजिक, पेशातले व संघटना पातळीवरचे जीवन व्यतीत केले आहे. सर म्हणजे खरेखुरे माणुसकीचा जिवंत झरा.त्यांच्या या जीवन प्रवासात त्यांची पत्नी संगीता,मुलगी दिपाली,आश्लेषा, मुलगा डॉ.विवेक भानसे व कुटुंबीय यांची अनमोल साथ आहे.,याशिवाय हा प्रवास पूर्ण होत नाही.

 

       भानसे सरांच्या आजवरच्या कार्याकडे बघितले की इतकेच म्हणावेसे वाटते,
“आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे,
जाता जाता पायमधले बळ तेवढे वाढवीत जावे.,
पायामधल्या वाटा सुद्धा हळूहळू बदलत जातात,
जाता जाता आपले ठसे मागे ठेवून जातात.”!!

 

सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य त्यांना आरोग्यपूर्ण,सुख,समाधान,निरामय शांततेचे जावो!! याच या समारंभाच्या निमित्ताने अथांगभर शुभेच्छा!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!