शाहू महाराज पाठीशी!आता कुणाची भीती नाही- मनोज जरांगे-पाटील
शाहू महाराज पाठीशी! मग कुणाची भीती नाही!-मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास
कोल्हापूर/मारुती फाळके
अंतरवाली सराटी (जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. याप्रसंगी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘शाहू महाराज पाठीशी आहेत आता कुणाची भीती नाही’ अशी भावना जरांगे यांनी व्यक्त केली.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मंगळवारी सातवा दिवस असून त्यांची तब्येत खालावलेली आहे. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे भेट देऊन त्यांना पाणी घेण्याची विनंती केली. छत्रपतींच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांनी पाणी प्राशन केले. यावेळी सकल मराठा समाजाचे कोल्हापूर जिल्ह्यातील निमंत्रक वसंतराव मुळीक, व्ही. बी. पाटील, बाबा पार्टे ,बाबा इंदुलकर, दिलीप देसाई , मनोज जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शाहू महाराज आणि जरांगे यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नावर अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली.
आंदोलन स्थळी श्रीमंत शाहू छत्रपती यांचे भाषण झाले. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शांततेत करावे असे आवाहनही त्यांनी केले. मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या पाठीशी राहिली पाहिजे. समाजामध्ये एकता येते तेव्हा ताकद वाढते आणि मराठा आरक्षणाचा उद्देश सफल होऊ शकतो असा विश्वासही शाहू महाराजांनी व्यक्त केला. सध्या आंदोलन तीव्र झाले असून जाळपोळ कोण करत आहे हे आपल्याला माहित नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले पण आरक्षणाचे आंदोलन हे शांततेने झाले पाहिजे. आंदोलनावर हिंसाचाराचा ठपका पडता कामा नये. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील युवक व कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता जिवंत राहून मराठा आरक्षणासाठी जोमाने काम केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. आरक्षण हे मराठा समाजाचे मुख्य लक्ष्य असून ते गाठण्यासाठी शांततेच्या मार्गानेच गेले पाहिजे याचा पुनरुच्चार शाहू महाराजांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळत आहे. आंदोलन करताना त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांनी पाणी घेतले पाहिजे असा आग्रह करत शाहू महाराजांनी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या.
शाहू छत्रपतींनी भेट दिल्याबद्दल जरांगे यांनी आता आपल्याला कुणाची भीती नाही अशा भावना व्यक्त केली .मराठा समाजातील गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार ही व्यक्त केला. सरकारने विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाचा समावेश ओबीसी वर्गात करून मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. राज्य सरकारने दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर पाणी पिण्याचे बंद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.










