शाहूवाडी तालुक्यातील जनआरोग्य योजनेची चौकशी करा -दलित महासंघाची मागणी
शाहूवाडी तालुक्यातील जनआरोग्य योजनेची सखोल चौकशी करा -दलित महासंघाची मागणी
कारवाई न झालेस तीव्र आंदोलन – डॉ.सुधाकर वायदंडे
भेडसगाव/प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील ज्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गैरव्यवहार करून जनआरोग्य योजना राबवल्या जातात त्या संबंधित हास्पिटल व डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने केली आहे.
याबाबतचे निवेदन शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण,गटविकास अधिकारी(वर्ग १) श्रीम.सुश्मिता शिंदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर निरंकारी, मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक(वर्ग १) डॉ.संज्योती जाधव यांना देण्यात आले.
यावेळी सुधाकर वायदंडे म्हणाले,आरोग्य योजनेबाबत विचारले असता आम्हाला हे ऑपरेशन परवडत नाही जी परवडतात अशीच ऑपरेशन आम्ही करतो अशी उद्धट उत्तरे डॉक्टरांकडून देऊन तुम्हांला कुठे तक्रार करायची तेथे करा अशी भाषा वापरली जाते. याबाबतचे सर्व पुरावे वरिष्ठाकडे सादर करणार असल्याचे डॉ.वायदंडे यांनी सांगितले.तसेच याबाबत अनेक रुग्णांच्या तक्रारी दलित महासंघाकडे आलेल्या आहेत.
गोरगरीब जनतेसाठी आरोग्याच्या दृष्टीने मदत व्हावी या उद्देशाने शासनामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे.जनआरोग्य योजनेचे पैसे शासनाकडून मिळत असतानासुद्धा प्रत्येक रुग्णांकडून अधीकचे पैसे का घेतले जातात? ऑपरेशनच्या नावाखाली गोरगरीब जनतेची लूट करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलची चौकशी होणे गरजेचे आहे.
योजना राबवण्यात येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ५% गरीब व गरजू लोकांसाठी मोफत उपचार देण्याचा नियम असताना तो नियम राबवला जातो का?याचीही चौकशी झाली पाहिजे.
ज्या हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजना राबवल्या जातात त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी.
गैरव्यवहार करणाऱ्या हॉस्पिटल व डॉक्टरांचा परवाना तत्काळ रद्द करण्यात यावा.
जनआरोग्य योजनेत बसत असताना ऑपरेशन न करता सामान्य लोकांकडून भीती दाखवून पैसे घेणाऱ्या हॉस्पिटल व डॉक्टरांची आठ दिवसांत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई न झालेस दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
निवेदनावर दलित महासंघाचे पोपटराव लोंढे,सदाभाऊ चांदणे,सागर लोंढे यांच्यासह पदाधीकाऱ्यांच्या सह्या आहेत.
(फोटो ओळी-गटविकास अधिकारी सुश्मिता शिंदे यांना दलित महासंघाच्या वतीने डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले)










