महामंडळाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणार-रणवीर सिंह गायकवाड
महामंडळाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणार-रणवीर सिंह गायकवाड
बांबवडे येथे आदर्श संस्था,आदर्श सचिव व संस्थांना संगणक वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
भेडसगाव/मारुती फाळके
नाबार्डच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे. गटातटाचे राजकारण करण्यापेक्षा मी जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आल्यापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे तसेच सर्व महामंडळाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हेच माझे काम आहे आणि ते मी करत राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड यांनी केले. ते बांबवडे येथे शाहुवाडी तालुक्यातील विकास सेवा संस्थांना संगणक प्रदान व आदर्श विकास संस्था तसेच आदर्श सचिव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बँकेचे विभागीय अधिकारी अशोक सातपुते यांनी केले.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, रणवीर गायकवाड यांचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम असून जिल्हा बँकेच्या सर्व योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात व गोरगरिबासाठी ह्या योजना राबविल्या जातात हे ऐकून रणवीर सरकारांचा मला अभिमान वाटला असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड म्हणाले जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विविध योजनांचा फायदा घ्यावा मग तो शेतकरी जनसुराज्य, काॅंग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्यांची अडवणूक करणार नाही.आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले जिल्हास्तरावर राज्यस्तरावर मी कुठेही असलो तरी माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांना यावेळी आमदार करणारच.
यावेळी तालुक्यातील ११ विकास सेवा संस्थांना व ११ सचिवांना आदर्श सेवा पुरस्कार देण्यात आला. तसेच तालुक्यातील ७० सेवा संस्थांना मान्यवरांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आले.कार्यक्रमासाठी पंडितराव शेळके, माजी सभापती महादेवराव पाटील,बांबवडेचे सरपंच भगतसिंह चौगले, गणि ताम्हनकर, पांडुरंग पाटील, जालिंदर पाटील, सुरेश पारळे, दिलीप पाटील, अक्षय पाटील, समीर पाटील आदी मान्यवरासह विविध गावचे सेवा संस्थांचे सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले.










