१ मार्चपासून सकाळची शाळा सुरू करावी – शिक्षक समितीची मागणी
१ मार्चपासून सकाळची शाळा सुरू करावी – शिक्षक समितीची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
वाढत्या उष्म्याचा त्रास लक्षात घेवून १ मार्चपासून सकाळची शाळा घेण्यात यावी तसेच विषय शिक्षक रिव्हर्शन याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी सादर केले.
शाळेचे कार्यरत दिवस आणि तासिका यांचे सूत्र मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या समोर सादर करून,आरटीई च्या कार्यदिनाच्या व वेळेच्या नियमात शाळेचे वेळापत्रक बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.यासाठी येत्या एक मार्चपासून सकाळची शाळा घेण्यात यावी तसेच ऐच्छिक विषय शिक्षकांचे रिव्हर्शन याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी प्रशासनाशी झालेल्या चर्चेत शाळेचे भरणारे दिवस आणि प्रत्यक्ष तासिका यांचे गणित जुळते, परीक्षेचे १६ दिवस हे प्रत्यक्ष अध्यापन होत नाही असे शिक्षण विभागाचे मत आहे याला समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी विरोध केला,मुल्यमापन हा अध्यापनाचा भाग आहे हे दिवस सुद्धा अध्यापनाचेच आहेत तुम्हाला जर हे मान्य नसेल तर परीक्षा बंद करा असे मत मांडले, शिक्षण विभागाने केलेल्या वेळापत्रकानुसार १०९५ घड्याळी तासिका होतात तसेच शाळा एकूण २३७ दिवस भरली जाते. त्यामुळे आरटीई शिक्षण हक्क कायद्याचा कोणताही भंग होत नाही.तरी एक मार्च पासून सकाळची शाळा सुरू व्हावी.सादर केलेल्या वेळा पत्रका नुसार प्रत्यक्ष अध्यापन तासिका व कार्यदिनाचा मेळ बसतो. असेही तौदकर म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले,नियमानुसार बदल होत असेल तर वेळा पत्रकात बदल करावा अशी सूचना त्यांनी शिक्षणाधिकारी यांना केली.
यावेळी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी पुन्हा एकदा आपण संपूर्ण वेळापत्रक पाहून निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.या चर्चेवेळी शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गणपती मांडवकर,प्रसिद्धीप्रमुख किरण सुतार, बा.ना चव्हाण, दीपक पाटील आदी उपस्थित होते.










