March 24, 2026

आदर्श प्रशासक…कोल्हापूर च्या गुणवत्तेला नवा आयाम देणारा अधिकारी- डॉ.आय सी शेख

0
IMG-20240414-WA0022

आदर्श प्रशासक…कोल्हापूर च्या गुणवत्तेला नवा आयाम देणारा अधिकारी- डॉ. आय सी शेख
३५ वर्षाची संस्मरणीय शैक्षणिक कारकीर्द

सेवानिवृत्तीनिमित्त आज कोल्हापूर येथील गडकरी सभागृहात सदिच्छा समारंभ.

कोल्हापूर/मारुती फाळके:

आचार विचारांच अद्वैत फार कमी माणसांना जमतं, ते जमण्यासाठी विचारांची स्पष्टता आणि बांधिलकीच भान असणं आवश्यक असतं,आणि बांधिलकी सामाजिक अभिसरणातून अंगी बानवली जाते, आणि यातूनच समाजनिर्मितीची,संस्काराची प्रक्रिया सुरू होते, हे संस्कारमूल्य रुजवण्यामध्ये आई वडिलांच्या नंतर नैतिक जबाबदारी स्वीकारणारा घटक येतो तो म्हणजे शिक्षक. जीवनाला सार्थकता प्राप्त होते ती शिक्षकांच्यामुळे! याच शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारी मातृसंस्था म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘डाएट’., या संस्थेचे कोल्हापूर डाएट चे प्राचार्य आय सी शेख उर्फ इकबाल शेख ३१मार्च रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.आजवर शिव -शाहू- फुले- आंबेडकर या आदर्शांच्या विचारांच्या पाऊलवाटेवर मार्गक्रमण करत त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली. समाजाच्या दिशां समृद्ध होण्यात परिवर्तनवादी विचार कामी येतात.हाच धागा पकडून शिक्षण आणि शिक्षक व्यवस्था समृद्ध होण्यासाठी ज्यांनी सेवेच्या शेवटच्या क्षणापर्यंत इमानेइतबारे आपले व्रत निष्ठेने पूर्ण केले, असे व्रतस्थ, समाजवत्सल, बहुजनांची लेकरं घडवण्यासाठी अव्याहतपणे कार्यरत राहिलेले,आयुष्यभर साधेपणा, कर्तव्याप्रति सचोटी,डाएट ही संस्था स्वतःच कुटुंब समजून कार्यमग्न राहिलेले डॉ.आय सी शेख नियत वयोमानानुसार शैक्षणिक प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत,त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा……

 

संवेदनशील मन,सतत विद्यार्थी, शाळा,समाज,संस्था, प्रशासन यांच्याबद्दल चिंतनशील असणारे डाएट कोल्हापूर चे प्राचार्य आय सी शेख.घरची परिस्थिती बेताचीच. कष्ट,प्रामाणिकपणा,सचोटी आणि निष्ठा या आई वडिल आणि गुरुजनांच्या संस्काराच्या मुशीत ते घडले.औंध ता.खटाव. जि. सातारा हे मूळ गाव. घरची परिस्थिती गरीबीची होती. घरात पाच भाऊ. आईवडीलांनी मजुरी करुन सर्वांना उच्चशिक्षीत केलं.कष्ट व प्रामाणिकपणाचे संस्कार दिले. पाचपैकी तीन भाऊ डाॅक्टरेट .
डाॅ. शेख यांनी स्वतः मजुरी करुन शिक्षण घेतलं.प्राथमिक शिक्षण जि प. शाळेतुन व माध्यमिक शिक्षण औंध संस्थानातील श्री.श्री. विद्यालयातुन झाले.शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथुन पदवी, शिवाजी विद्यापीठ येथुन पदव्युत्तर शिक्षण, सातार्‍याच्या आझाद शिक्षणशास्त्र महाविद्यालयातुन बी.एड व एम. एड. व शिक्षणशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ येथुन एम. फिल व पीएच.डी. पदवी प्राप्त केली.,२००३ साली लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या विभागात वरिष्ठ अधिव्याख्याता म्हणून त्यांची निवड झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एम.ए.,एम.एड.,एम.फिल.,पीएच.डी (शिक्षणशास्त्र) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यात विविध जिल्ह्यात त्यांची गौरवपूर्ण सेवा झाली.३५ वर्षाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव,माध्यमिक, उच्च माध्यमिक, डी.एड,बी.एड. व एम.एड या वर्गांना अध्यापन तसेच डाएट च्या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण आणि मूल्यमापन या त्रिसूत्री वर काम करत शाळाशाळांत गुणवत्ता निर्माण केली,समुपदेशन केले प्रसंगी वाटाड्याची भूमिका पार पाडली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २००३ साली वर्ग – १ वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर निवड झाली.२०१३ साली शिक्षण उपसंचालक समकक्ष प्राचार्य या पदावर पदोन्नती झाली.या काळात प्रशासकीय सेवा सचोटीने पूर्ण केली.

आजवर त्यांनी विविध शैक्षणिक लेख,संशोधने
मासिके,जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण व विविध मासिकांमध्ये शैक्षणिक व संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.याबरोबरच डॉ. सीमा येवले संपादित शैक्षणिक तंत्रविज्ञान व माहिती तंत्रज्ञान या पुस्तकांमध्ये सहलेखन ,
शिक्षक होण्यासाठी या पुस्तकाचे सहलेखन ग्रंथलेखन सहभाग घेतला आहे.,

प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामकाज म्हणून
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये एम. एड. व एम.फिल. विद्यार्थ्यांसाठी संशोधक मार्गदर्शक, महाराष्ट्र शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व निपुण भारत अभियान या उपक्रमामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग, शैक्षणिक वर्ष २०१७ व २०१८ मध्ये अनुक्रमे रत्नागिरी व कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित शिक्षणाच्या वारीचे यशस्वी आयोजन. यामध्ये तीस पेक्षा जास्त शिक्षकांनी सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण, अद्ययावत शैक्षणिक संप्रेषण व शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण केली.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय समित्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.

राज्य व जिल्ह्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष योगदानाबद्दल मा. शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या हस्ते १४ जुलै २०२३ रोजी पुणे येथे विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.शैक्षणिक संशोधन, नवोपक्रम व देश तथा राज्य पातळीवरून घेण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणामध्ये जिल्हास्तरावर जबाबदार अधिकारी म्हणून अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.जिल्ह्यातील शैक्षणिक गरजेनुसार शिक्षकांना उपयुक्त अशा १० शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन केले. जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालयांची शैक्षणिक भरभराट व गुणवत्तावृद्धी होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.

 

सर्व शासकीय यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय साधुन जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात नेहमीच पुढाकार घेतला.आजवर वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत शैक्षणिक कामकाजाबाबत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सेवाकाळात नाशिक.जळगाव. रत्नागीरी. सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यात आपल्या गुणवत्तापुर्ण कामकाजाने विशेष ठसा उमटवला. जळगाव येथे असताना मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी एक लाख रु संकलन करुन सामाजिक बांधिलकी जपली. कोरोना काळात जिल्ह्यात ‘शिक्षण आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला.शासनाच्या जिल्हास्तर व राज्यस्तरावरील विविध समित्यांवर प्रभावी काम केले.

डॉ. शेख हे सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेले व्यक्तिमत्व. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काही देणं लागतो, या भावनेतून त्यांनी आजवर कित्येक गरजू, सामान्य विद्यार्थ्यांना मदत केली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत सुरुवातीच्या काळात संघर्ष केला, पण परिस्थिती आणि व्यवस्थेपुढे कधीही हात टेकले नाहीत. सुरवातीचा काही काळ अध्यापन सेवेत नोकरी करत असताना त्याच वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत सन २००३ साली वरिष्ठ अधिव्याख्याता ते डायट प्राचार्य अशी त्यांची संस्मरणीय कारकीर्द ठरली. डीएड प्रवेश प्रक्रिया, अध्यापक विद्यालये यांचे नियमन,शिक्षकांना मार्गदर्शन, शिक्षकांची वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे, उद्बोधने यासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. जिल्ह्यातील शिक्षणाची मातृसंस्था म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ‘डाएट’ मध्ये त्यांनी प्रशिक्षण, मूल्यमापन आणि मार्गदर्शन या त्रीसूत्रीवर आधारित काम करत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना नवी दिशा आणि नवऊर्जा दिली. हाडाचे शिक्षक ते कुशल प्रशासक हा त्यांचा प्रवास अचंबित करणारा असाच आहे.डीएड वर्गात शिकणाऱ्या कित्येक गरजू- गरीब विद्यार्थ्यांना त मदत केली. विविध शाळा संस्थांना भेटीतून चांगल्या गोष्टींच्या कौतुक केले. उणीवावर मार्गदर्शन केले. पण कधी रागावत तर कधी मृदू होत काळाबरोबर बदलण्याचा सल्लाही दिला. पण कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाईसाठी त्यांचे हात कधी सरसावले नाही.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, राज्य संपादणूक सर्वेक्षण, असर मूलभूत क्षमता विकसन कार्यक्रम या सर्व शैक्षणिक उपक्रमात कोल्हापूर जिल्हा गुणवत्तेत अग्रभागी ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती, शिक्षण परिषदा, PGI गुणांकन वाढवणे आणि त्यामध्ये सद्यस्थितीचे विश्लेषण करून उपायोजना करणे,शाळाशाळात मूलभूत अध्ययन क्षमता विकसन हा त्यांच्या कार्यकाळातील अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम प्रसिध्द झाला. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, सर्व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय,तालुकानिहाय गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून घेत असलेल्या गुणवत्तेचा आढावा असे अनेक गुणवत्ताविकासाचे उपक्रम राबवले.
राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्हा दुसरा क्रमांक, राज्य संपादणूक सर्वेक्षण यात सुद्धा कोल्हापूर जिल्हा पहिल्या दोन क्रमांकांमध्ये ठेवण्यात सातत्याने यश कायम ठेवले.

सध्याच्या आधुनिकतेच्या जमान्यांमध्ये मार्गदर्शन आणि दिशा दाखवण्याचा संस्कार कुठेतरी लुप्त होत चाललेल्या या व्यवहारी जगाच्या वातावरणात शेख साहेबासारखी माणसं ही समाजाला खरीखुरी दिशादर्शक ,मार्गदर्शक आणि समाजाला परिवर्तनाच्या वाटेवरती नेऊन ठेवणारे ज्ञानरूपी दीपस्तंभ आहेत.
शेख साहेब म्हणजे चैतन्य,ऊर्जा,नम्रता,माणूसपण,जिव्हाळा आणि विद्यार्थी,शाळा,शिक्षक,समाज,संस्था,प्रशासन यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि बांधिलकी असलेलं व्यक्तिमत्त्व.

सेवानिवृत्त होताना तीच ऊर्जा,उमेद आणि माणूसपणाचा जिव्हाळा वृध्दींगत करणारा त्यांच्या मनाचा अंतर्भाव कायम टिकून आहे. त्यांनी आजवरचे वैयक्तिक,सामाजिक,प्रशासकीय व कौटुंबिक पातळीवरचे जीवन सचोटी आणि प्रामाणिकपणे व्यतीत केले आहे. आजवरच्या त्यांच्या कार्याकडे बघितले की इतकेच म्हणावेसे वाटते,
“आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे,
जाता जाता पायमधले बळ तेवढे वाढवीत जावे.,
पायामधल्या वाटा सुद्धा हळूहळू बदलत जातात,
जाता जाता आपले ठसे मागे ठेवून जातात.”!!

सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य त्यांना आरोग्यपूर्ण,सुख,समाधान,समृध्दी,निरामय शांततेचे जावो!! याच या समारंभाच्या निमित्ताने अथांगभर शुभेच्छा!!!

चौकट-
स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिला तर सकारात्मक बदल कायम घडतो- डॉ.आय. सी. शेख

शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक कामात नियोजनबद्धता, सातत्यपूर्ण संशोधन,चिकित्सा, आणि नाविन्याचा शोध घेतला तर निश्चित सकारात्मक बदल घडतो. स्वतःच्या व्यवसायाशी आणि कर्तव्याशी प्रामाणिक रहा. सकारात्मक बदल करायचा असेल तर स्वत: प्रामाणिक राहून कर्तव्य बजावले की, समाजामध्ये मानसन्मान मिळतो. प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना कुटुंबाला महत्त्व न देता ‘डाएट ‘या संस्थेलाच माझं कुटुंब समजून कार्यरत राहिलो. वेळ ,काळ याच बंधन कधी पाळलं नाही, स्वतःला झोकून देऊन कार्यरत राहिलो. समाधानाने सेवानिवृत्त होऊन कोल्हापूर जिल्हा नेहमीच गुणवत्तेत अग्रेसर ठेवण्यासाठी कार्यरत राहिलो. गुणवत्तेची पातळी कायम ठेवण्यात यशस्वी झालो. याचे मनोमन समाधान आहे.

@लेखन-मारुती फाळके कोल्हापूर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!