March 24, 2026

१६ जून रोजी शिक्षक बँकेची नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन निवड

0
IMG-20240614-WA0179

१६ जून रोजी शिक्षक बँकेची नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन निवड

अध्यक्ष पदासाठी थोरात गटाचे बाळासाहेब निंबाळकर, शिवाजी रोडे पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी समितीचे  रामदास झेंडे यांची नावे चर्चेत

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख आर्थिक शिखर संस्था समजल्या जाणाऱ्या दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी रविवारी १६ जून २०२४ रोजी संचालक मंडळाची बैठक होत आहे. गवत मंडई येथील शिक्षक बँकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमनच्या निवडी होतील.

यावेळी बँकेच्या चेअरमनपदाची शिक्षक संघ थोरात गटाला मिळणार आहे. तर व्हाईस चेअरमनपद, शिक्षक समितीकडे जाणार आहे. जुलै 2022 मध्ये शिक्षक बँकेमध्ये सत्तांतर झाले होते. प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, कास्ट्राईब, मागासवर्गीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आदींनी एकत्र येऊन आदींनी निवडणूक लढवत बँकेत सत्ता परिवर्तन केले होते.
सत्ता बदल झाल्यानंतर पहिल्यांदा शिक्षक समितीला चेअरमनपद मिळाले होते. शिक्षक समितीचे अर्जुन पाटील चेअरमन तर शिक्षक संघाच्या पद्मजा मेढे व्हाईस चेअरमन झाल्या होत्या. त्यानंतर शिक्षक संघाचे सुनील एडके चेअरमन झाले तर समितीचे शिवाजी बोलके व्हाईस चेअरमन झाले. ऑक्टोंबर 2023 मध्ये झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील यांना चेअरमनपदाची तर महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेचे अमर वरुटे यांना व्हाईस चेअरमनपदी संधी मिळाली होती. साधारणपणे आठ ते दहा महिन्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडी करण्यात येत आहेत.

बँकेत नवीन संचालक मंडळ सत्तेवर येऊन येत्या जुलै महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तीन चेअरमन व तीन व्हाईस चेअरमन झाले.
बँकेच्या संचालक मंडळाची नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी रविवारी निवड सभा होत आहे. सहकारी विभागातील अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान चेअरमनपदासाठी शिक्षक संघाकडून संचालक बाळासाहेब निंबाळकर,शाहुवाडी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संचालक शिवाजी रोडे- पाटील तर व्हाईस चेअरमनपदासाठी शिक्षक समितीचे संचालक रामदास झेंडे यांची नावे आघाडीवर असल्याची विश्वासनीय माहिती आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या अनुषंगाने बँकेतील सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळींची शनिवारी बैठक होत आहे. दुसरीकडे चेअरमन पदासाठी शिक्षक संघाकडून निंबाळकर यांच्यासह शिवाजीराव रोडे पाटील यांचेे नावही चर्चेत आहे. चेअरमनपदाच्या निवडीच्या अनुषंगाने शिक्षक संघाचे जिल्ह्यातील नेतेमंडळी शनिवारी शिक्षक संघाचे प्रमुख नेते संभाजीराव थोरात यांची भेट घेणार आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, विलास चौगुले,रघुनाथ खोत आदी मंडळी शनिवारी थोरात यांची भेट घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!