वचन देतो, जुनी पेन्शन जशीच्या तशी देणार- उद्धव ठाकरे
वचन देतो, जुनी पेन्शन जशीच्या तशी देणार- उद्धव ठाकरे
विराट कर्मचाऱ्यांच्या साक्षीने जुनी पेंशन संघटनेचे कोपरगाव येथे महाधिवेशन
कोल्हापूर चे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांचा विशेष गौरव.
कोल्हापूर/मारुती फाळके
लाडक्या बहिणीनो आणि भावानो असा जिव्हाळ्याची हाक देत, आपले आयुष्य सरकारसाठी, जनतेसाठी वेचल्यानंतर
निवृत्ती वेतन मिळणार नसेल तर काय उपयोग. तुम्ही सरकार बदलू शकता, आपलं सरकार आणा, मी वचन देतो, तुमचा न्याय हक्काचा लढा सफल होईल, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सुरू करू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम कर्मचाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवारी कोपरगाव येथे पार पडले, यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार मिलिंद नार्वेकर, ज. मो. अभ्यंकर, आशुतोष काळे, सत्यजीत तांबे, रविकांत तुपकर, किरण सरनाईक, अडवाले, संघटनेचे कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, अहमदनगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा शब्द मी दिला आहे. आता निवडणूका तोंडावर आहेत, एक-दोन दिवसांत सत्ताधारी कॅबिनेट बोलावतील, जुनी पेन्शन योजना लागू केली, म्हणून भूलथापा देतील, त्यातही दगाफटका करतील. तुमची एकजूट फोडण्याचे कामसुद्धा केले जाईल. परंतु, तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा, एकजूट कायम ठेवा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला.
कोपरगाव येथे रविवारी झालेल्या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थितांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री पदावरून नेते काय म्हणाले
…खासदार संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असते तर जुन्या पेन्शनसाठी अधिवेशन घेण्याची वेळच आली नसती. मात्र, आता आपले सरकार आले की पेन्शनचा प्रश्न सोडविला जाईल. भावी मुख्यमंत्री इथे बसले आहेत. तोच धागा पकडून ठाकरे म्हणाले, मी इमाने इतबारे काम करतो. सरकार आले की प्रश्न नक्कीच सोडवला जाईल. बाकी मुख्यमंत्रिपदाची स्वप्न मला पडत नाहीत. अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, आमची लढाई ही मुख्यमंत्रिपदासाठी नाही. ही लढाई नाना पटोलेंसाठी नाही, शरद पवारांसाठी नाही ना उद्धव ठाकरेंसाठी. आमची लढाई ही राज्यातील भ्रष्ट सरकारच्या विरोधात आहे. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेला जात आहे, त्याविरुद्धची ही लढाई आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, तुमच्या मिशनला साथ देण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. आम्हाला आमच्या पेक्षा तुमच्या पेन्शनची काळजी आहे. ‘अच्छे दिन आयेंगे’ असा नारा होता. पण, आम्हाला पुराणे दिन आणि पुराणी पेन्शन पाहिजे,
चौकट १-शिंदे, फडणवीस, पवार यांना पेन्शन लागू होईल…
सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात स्वतः २२ वर्षे आमदार असल्याने ८४ हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचे जाहीर केले. नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जनता घरी बसवणार आहे. त्यानंतर शिंदे यांना ७० हजार, फडणवीस यांना ८० हजार तर अजित पवार यांना ९० हजार रुपये पेन्शन लागू होणार असल्याची कोटी केली.
चौकट-२ कंत्राटी कामगारांना ५० खोके
आम्ही राजकारणी लोक आहोत, म्हणजे कंत्राटी कामगार, तुम्ही परमनंट कामगार आहात. कंत्राटी कामगाराला ५० खोके मिळतात, मग परमनंट कामगाराला हक्काची पेन्शनसुद्धा का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
चौकट-३–पेन्शनचे टेन्शन घेऊ नका – नाना पटोले
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले, टेन्शन देणारा माणूस महाविकास आघाडीतून तिकडे गेला आहे. आता तुम्ही पेन्शनचे टेन्शन घेऊ नका. सध्याचे सरकार परत आले तर गोरगरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करतील. त्यांना आता सरकारी शाळांचेही खासगीकरण करायचे आहे. पूर्वी आमच्या सरकारने वस्ती तेथे जिल्हा परिषदेच्या शाळा दिल्या होत्या. आता हे सरकार वीसच्या आत पट असलेल्या शाळा बंद करीत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा प्रामुख्याने घेतला जाईल. जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा आरोप हे सरकार काँग्रेसवर करीत आहे. मात्र, ही योजना भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना बंद झाली आहे.आपले सरकार आल्यावर जुन्या पेन्शनचे काम झाल्याशिवाय राहणार नाही.
संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले, सरकारने लागू केलेली सुधारित पेन्शन योजना (यूपीएस) राज्यातील कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे या युपीएस आणि जीपीएसला विरोध करण्यासाठी आणि सरसकट जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे अधिवेशन आयोजित केले आहे.
चौकट-४–मंगेश धनवडे यांचा विशेष सत्कार..
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आयोजित “पेन्शन क्रांती महामोर्चा” विराट कर्मचाऱ्यांच्या जनसंख्येत यशस्वी केल्याबद्दल आणि संघटना बांधणीमध्ये जिल्हा, राज्यस्तरावर विशेष योगदान देत असल्याबद्दल कोल्हापूर जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांचा विशेष सत्कार अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आला.
प्रास्ताविक संघटनेचे राज्य सचिव गोविंद उगले यांनी केले. अधिवेशनास राज्य,जिल्हा,तालुका,केंद्र कार्यकारिणीतील विविध केडर चे असंख्य पेंशन शिलेदार तसेच राज्यभरातून कर्मचारी यासह जुनी पेंशन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,सांगलीचे अध्यक्ष अमोल शिंदे,सागर खाडे, अविनाश पाटील, राज्यसह कार्याध्यक्ष श्रीनाथ पाटील, संचालक अमर वरुटे,जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, मार्गदर्शक,राहुल कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, गजानन कुंभार, संजय पाटील, अमोल गायकवाड, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा आयटी विभाग प्रमुख सुनील पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा आरती पोवार, जिल्हा महिला सरचिटणीस संगीता कडूकर,चेतन शिंदे,प्रकाश भोसले,सागर पाटील,राम घोलप, सतीश रणशिंगे,प्रमोद पोवार, चेतन शिंदे,,दिलीप वाळवेकर, आनंद पाटील,दीपक गायकवाड, संतोष जुगळे, विठ्ठल पाटील,संदीप पाटील,सुनील सुतार, आनंदा बनकर, पवार, देवाप्पा पालके,बाबुराव निकम, मारुती पोवार,उमेश कुंभार, सागर पाटील, आनंद कांबळे, सत्यवान सोने,बाबुराव कांबळे, वैभव डाकरे,काशीराम बिरूनगी, ,संदीप शेंडगे, संगीता दिवटे,सादिया मुजावर, जैनब शेख,स्वप्नाली कतगर, दीपाली कतगर,यासह शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे पाटील, अर्जुन पाटील, गौतम वर्धन,गजानन कांबळे,तसेच राजेंद्र पाटील,संजय कुंभार,सचिन कोल्हापूरे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी-कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आयोजित राज्य अधिवेशनात उपस्थित राज्यातील विराट कर्मचाऱ्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,खा. संजय राऊत,सुभाष राऊत जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष रितेश खांडेकर, गोविंद उगले आदी पदाधिकारी.










