प्राथमिक शिक्षक बँकेला ३ कोटी २३ लाखाचा नफा,७.५०%लाभांश देणार- चेअरमन बाळासाहेब निंबाळकर
प्राथमिक शिक्षक बँकेला ३ कोटी २३ लाखाचा नफा,७.५०%लाभांश देणार- चेअरमन बाळासाहेब निंबाळकर
कोल्हापूर/मारुती फाळके :
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक बँकेची आर्थिक घडी सक्षम आहे. सभासदांच्या विश्वासावर सत्तेत आल्यानंतर गेल्या दोन वर्षात प्राथमिक शिक्षक बँकेची आर्थिक घडी बसवण्यात सध्याचे संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. गेल्या वर्षभरात नियोजनबद्ध वसुली व काटकसरीने कारभार केल्यामुळे शिक्षक बँकेला तीन कोटी २३ लाख ९हजार २१२ इतका विक्रमी नफा झाला आहे. बँकेच्या इतिहासातील हा सर्वाधिक नफा आहे यंदा बँकेतर्फे सभासदांना त्यांच्या हक्काचा साडेसात टक्के लाभांश दिला जाणार आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर, व्हाईस चेअरमन रामदास झेंडे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे होणार आहे. या सभेला शिक्षक सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सभासदांच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली जाणार आहेत. सभासदांच्या शंकांचे निरसन होईपर्यंत सभा सुरू राहील. सभा गुंडाळली जाणार नाही. कोणीही व्यक्तिगत दोषारोप करू नये. सत्ताधारी संचालक मंडळाने जे चांगले कार्य केले आहे त्या चांगल्या कार्याचे विरोधकांनी कौतुक करावे. संस्थेच्या आर्थिक विकासाचे प्रश्न विचारावेत. बँकेच्या हिताच्या सूचनांचे स्वागत करू. चांगल्याला चांगले म्हणण्याची सद्बुद्धी विरोधकांना मिळो असा टोलाही सत्ताधारी संचालक मंडळाने लगावला. आमच्यावर यंदाच्या खर्चाचा प्रश्न विचारताना मागील सहा वर्षात किती खर्च केला हे एकदा त्यांनी अंतर्मनाला विचारून पहावे अशा शब्दात सत्ताधारी संचालकांनी विरोधकांचा चिमटा काढला. निवडणुकीच्या कालावधीत राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने सभासदांना जी आश्वासने दिली आहेत त्यांची वचनपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे असे सांगून चेअरमन निंबाळकर म्हणाले, गेल्या वर्षी सभासदांना पाच टक्के लाभांश दिला होता. यंदा साडेसात टक्के लाभांश सभा झाल्यानंतर सभास्थळी दिला जाणार आहे.
यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत गेल्या १३ वर्षात सभासदांना लाभांश दिला नव्हता. पूर्वी बँकेची निवडणूक झाली की बँकेचा कर्जावरील व्याजदर लगेच वाढवला जात असे पण सध्याच्या संचालक मंडळाने गेली दोन वर्षे व्याजदर स्थिर ठेवला आहे. खर्चात काटकसर करून ठेवीवर ८.०५ टक्के व्याजदर दिला आहे. शिवाय साडेनऊ टक्के व दहा टक्के दराने कर्ज वाटप करून दीड ते १.९५ टक्के मार्जिनमध्ये बँक चालवले आहे. यंदा सर्व तरतुदी करून बँकेने तीन कोटी २३ लाखावर नफा मिळवला आहे. यापूर्वी येणे इन्कम टॅक्स दाखवून नफा दाखवला जात होता. तो सध्याच्या संचालक मंडळांनी बंद केला. शासकीय देणे कोणतीही ठेवली नाहीत. महत्वाचे म्हणजे अमृत संजीवनी योजनेत भविष्यात वाढ करण्यात येणार आहे. बँकेच्या सभासदासाठी अमृत संजीवनी योजना महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये २५ लाख पर्यंत कर्जमाफी व कर्ज नसेल तर मृत सभासदाच्या वारसांना आर्थिक मदत मिळणार आहे ज्या सभासदांचे बँकेत पगार होतात त्यांना ४० लाखाचे अपघात विमा कवच मिळेल.
बँकेच्या आर्थिक उन्नतीच्या अनुषंगाने बोलताना चेअरमन निंबाळकर म्हणाले, बँकेच्या चांगल्या सेवेमुळे वर्षभरात १०३ नवीन सभासद झाले . ठेवीमध्ये वाढ होत आहे. ३१ मार्च २०२४ अखेर ४१५ कोटी ७५ लाख इतक्या ठेवी झाले आहेत. बँकेने एकूण व्यवसाय ७०० कोटी पेक्षा जास्त केला आहे. नजीकच्या काळात बँकेची एकूण व्यवसायाची वाटचाल १००० कोटीकडे सुरू आहे. बँकेमार्फत सध्या ३०९ कोटी २३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचे मोबाईल अॅप अल्पावधीत सभासदांच्या सेवेत आले. यातील पुढील टप्पा म्हणजे गुगल पे आणि फोन पे लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे बँकिंग सेवा २४ तास ऑनलाईन सुरू राहणार आहे. बँकेचा शाखा विस्तार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मान्यतेचा प्रस्ताव सादर केला आहे. कळे, कागल, जयसिंगपूर, साळवण या ठिकाणी शाखा विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. रविवारी होणाऱ्या वार्षिक सभेपुढे स्टॉपिंग पॅटर्न मंजुरीचा विषय ठेवला आहे.पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक अर्जुन पाटील, सुनील एडके, एस.व्ही पाटील, राजेंद्रकुमार पाटील, शिवाजी बोलके, शिवाजी रोडे पाटील, बाळकृष्ण हळदकर, बाबू परीट, नंदकुमार वांईगडे, अमर वरुटे, गजानन कांबळे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, तज्ञ संचालक रईस अहमद पटेल, तोफिक मोमीन, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम आदी उपस्थित होते.










