शिक्षक बँकेचा नफा हा बोगस अन् चुकीचा, कामकाजात नियमबाह्य गोष्टी- विरोधी आघाडी
सत्ताधाऱ्यांनी दाखविलेला शिक्षक बँकेचा नफा हा बोगस अन् चुकीचा, कामकाजात नियमबाह्य गोष्टी
कोल्हापूर/प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी संचालक मंडळाने दाखविलेला तीन कोटी २९ लाख रुपयांचा नफा हा चुकीचा आणि बोगस आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाच्या काळात गुंतवणूक-चढ उतार निधीमध्ये तीस लाख रुपये गुंतवणूक केली होती. ती रक्कम सध्याच्या संचालक मंडळाने नफ्याला वर्ग केलीं. थकव्याज तरतूद निधीतील१५ लाख रुपये नफ्यात वर्ग केले आहेत. सध्याच्या नफ्यामध्ये मागील संचालक मंडळाचे एक कोटी पाच लाख रुपये आहेत.सत्ताधाऱ्यांनी नियमांना बगल देत अनेक गोष्टी केल्या आहेत असा पलटवार बँकेतील विरोधी आघाडी व प्राथमिक शिक्षक संघाच्या (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) पदाधिकाऱ्यांनी केला.
शिक्षक संघाचे नेते राजाराम वरुटे, बँकेचे माजी चेअरमन संभाजी बापट, राजमोहन पाटील, जी. एस. पाटील, प्रशांत पोतदार, साहेबराव शेख, बाजीराव कांबळे, दिलीप पाटील आदींनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांच्या कामकाजातील त्रुटी मांडल्या. २२ सप्टेंबर रोजी शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी संचालक मंडळाने चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेत बँकेला यंदा विक्रमी तीन कोटी २३ लाखहून अधिक नफा झाला आहे. तसेच बँकेमार्फत सभासदांना साडे सात टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले. तसेच मागील संचालक मंडळाने दहाहून अधिक वर्षे सभासदांना लाभांश दिला नाही असा आरोप केला होता.
सत्ताधारी संचालक मंडळाचा हा आरोप, बँकेच्या मागील संचालकांनी खोडून काढला. वरुटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की ‘आमच्या कालावधीत २०१४-१५ मध्ये दोन टक्के, २०१६-१७ मध्ये अडीच टक्के, २०१७-१८ मध्ये पाच टक्के, २०१८-१९ मध्ये सर्वाधिक चौदा टक्के आणि २०२०-२१ मध्ये नऊ टक्के लाभांश दिला आहे. तेव्हा सत्ताधारी संचालकांनी लाभांशवरुन सभासदांची दिशाभूल करु नये. शिवाय मागील संचालकांनी लाभांश दिला नाही हा आरोपही खोटा आहे.’
सत्ताधाऱ्यांच्या नफ्याच्या दाव्याविषयी बोलताना वरुटे म्हणाले, ‘गेल्या संचालक मंडळाच्या काळात झालेल्या नफ्यातून या संचालक मंडळाने आकसापोटी एक कोटी पाच लाखाचा एनपीए निध तरतूद करुन सभासदांना लाभांशपासून वंचित ठेवले होते. यावर्षी एनपीए वाढून सुद्धा नाममात्र तरतूद केली आहे. अन्यथा दीड कोटी रुपयांची तरतूद करावी लागली असती. तेव्हा सध्याच्या नफ्यामध्ये मागील संचालक मंडळाचे एक कोटी पाच लाख रुपये आहेत
यावर्षी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी रकमेची तरतूद केली नाही. कर्मचाऱ्यांची रजा पगार पंधरा लाखाची तरतूद नाही. शिवाय वेगवेगळया कर्जाची थकव्याज तरतूद पन्नास लाखांनी कमी केली आहे. यामुळे नफा पन्नास लाखांनी वाढून आहे. बँक गुंतवणूक नऊ कोटींनी वाढून सुद्धा व्याज कमी का मिळाले ? सध्याच्या संचालकांनी कम्प्युटर अवास्तव किंमतीने खरेदी केल्यामुळे बँकेला आर्थिक भुर्दंड बसला.व्यवस्थापकीय खर्चात वाढ, मिटींग भत्तामध्ये एक कोटी ८० लाख रुपयांनी जास्त झाल्याचे दिसून येत आहे. कर्जाचे नियमबाह्य वाटपाच्या तक्रारी आहेत. २०२१-२२ चा रिझर्व्ह बँकेचा बँक ऑडिट रिपोर्ट चांगला असल्याचे व २०२२-२३चा ऑडिट वर्ग घसरल्याचे समजेते.सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार आहे. त्याविरोधात लढत राहू. वार्षिक सभा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करू. सत्ताधाऱ्यांनी सभासदांना समाधानकारक उत्तरे द्यावीत. ’
पत्रकार परिषदेला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी. एस. पाटील, महिला आघाडी अध्यक्षा श्वेता खांडेकर, लता नायकवडे, दिलीप पाटील, सर्जेराव सुतार, श्रीकांत चव्हाण, मारुती दिंडे, नसिम मुल्ला, तानाजी धारपवार आदी उपस्थित होते.
…………………..
बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत
बँकेच्या कामकाजात गैरप्रकार केल्यामुळे एका कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. सध्याच्या संचालक मंडळाने त्या कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत सामावून घेतले. शिवाय ४२ हजार रुपये पगार दिला. अगोदर कामावर रुजू करुन घेतले आणि नंतर तसा ठराव केला. नियमबाह्य कामकाजाचे हे एक उदाहरण आहे असेही शिक्षक संघांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.










