March 24, 2026

विश्वास सुतार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी.

0
IMG-20240928-WA0043

विश्वास सुतार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी.

कोल्हापूर/मारुती फाळके

शाहूवाडी चे गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी शिवाजी विद्यापीठास सादर केलेल्या संशोधनपर प्रबंधास मान्यता देऊन शिवाजी विद्यापीठाने विश्वास सुतार यांना सन्मानपूर्वक पीएच.डी. पदवी जाहीर केली. मराठी विषयांतर्गत ‘डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनपर प्रबंधाचा विषय होता. डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे जीवन, कार्य, विचार आणि समग्र वाङ्मयाचा आलेख डॉ. विश्वास सुतार यांनी प्रबंधातून मांडलेला आहे.

डॉ. लवटे यांचा जन्म असाधारण परिस्थितीत झाला असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथून प्राचार्य पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. शिक्षणक्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक आणि बालकल्याण या क्षेत्रांतही मूलभूत कार्य केलेले आहे.

कोल्हापुरातील रिमांडहोमचे ‘बालकल्याण संकुल’ मध्ये रूपांतर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मराठी, हिंदी भाषेतील त्यांची ग्रंथसंपदा १४० इतकी आहे. ‘खाली जमीन वर आकाश’ हे त्यांचे आत्मचरित्र वंचित साहित्य प्रवाहात मैलाचा दगड ठरले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाचे संकलन आणि संपादन करून त्यांनी वैचारिक मराठी वाङ्मय निर्मितीत मोठे योगदान दिले आहे.नुकतेच डॉ.सुनीलकुमार लवटे संपादित, भाषा विकास मंत्री ना.दीपक केसरकर यांच्या हस्ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींसंदर्भातील १८ खंड नुकतेच प्रकाशित झाले आहेत.

विश्वास सुतार यांनी कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या समग्र वाङ्मयावर संशोधन केल्याने शिवाजी विद्यापीठासाठी ही भूषणावह आणि आनंददायी गोष्ट आहे’, असे मत मराठी अधीविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. बाह्य परीक्षक डॉ. संजय कांबळे, प्राध्यापक राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव यांनी प्रबंधातील आशय व मांडणीचे कौतुक केले. संशोधन कार्यासाठी डॉ. विनोद कांबळे यांनी संशोधक मार्गदर्शक म्हणून डॉ. विश्वास सुतार यांना मार्गदर्शन केले.

विश्वास सुतार हे पंचायत समिती शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी व माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. ते सुपरीचित साहित्यिक असून त्यांचे ‘भारतीय संविधान आणि लोक’, ‘तुकाराम नावाचा संत माणूस’, ‘महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष’, ‘मुलास पत्र’, ‘नाळ’ कथासंग्रह असे महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते गायक, संगीतकार असून आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. ‘समाजभान’ समूहाच्या माध्यमातून ते वंचित, गरजू घटकांना मदतीचा हात देण्यात पुढाकार घेतात. प्रशासनात सर्व घटकांबरोबर समन्वय साधत ते सकारात्मक काम करतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, शाखा कोल्हापूर या संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच डॉ. सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीचे ते सचिव आहेत.डॉ. विश्वास सुतार यांच्या पीएच. डी. पदवी यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फोटो ओळी-

मराठी विषयातील ‘डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या समग्र वाड्मयाचा अभ्यास’ या संशोधन प्रबंधास विद्यावाचस्पती पदवी मिळालेबद्दल मार्गदर्शक डॉ.विनोद कांबळे व संशोधक विश्वास सुतार यांचा सत्कार करताना डॉ.सुनीलकुमार लवटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!