कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा संविधानजागृती उपक्रम कौतुकास्पद- आ.अमल महाडिक
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा संविधानजागृती उपक्रम कौतुकास्पद- आ.अमल महाडिक
कोल्हापूर /मारुती फाळके
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असून २०२४ हे वर्ष अमृत महोत्सवी संविधान वर्ष म्हणून साजरे होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील शाळांना संविधानाबद्दल जाणीव जागृती व्हावी, शाळा शाळात संविधानाचा जागर व्हावा या हेतूने शासकीय कार्यालये, शाळांमध्ये संविधान वाटप करण्याचा जो समाजप्रबोधनपर विधायक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत कोल्हापूर दक्षिण चे आमदार आमल महाडिक यांनी व्यक्त केले.संघटनेच्या कोणत्याही प्रश्नासाठी निश्चितपणाने पाठबळ देणार असून संघटनात्मक शिक्षकांच्या प्रशासकीय समस्या सोडवणुकीसाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे आमदार महाडिक म्हणाले.
कास्ट्राईब शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांचे वतीने शाहूपुरी येथील महाडिक यांच्या कार्यालयात सत्कार प्रसंगी अमल महाडिक बोलत होते.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे म्हणाले, शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील सर्व शाळांना संविधान वाटप करण्याचा उपक्रम चालू केला असून सध्या हातकणंगले तालुक्यातून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. आजवर ७५ शाळा,१० शासकीय कार्यालये येथे सध्या संविधान वाटप केले असून जसजसे या उपक्रमास आर्थिक बळ मिळेल तसतसे या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.संविधान जागृती साठी संघटनेने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमास संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे, जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, सरचिटणीस संजय कुर्डूकर सर्व जिल्हा कार्यकारिणी यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे,जिल्हा प्रसिद्धिप्रमुख मारुती फाळके उपस्थित होते.
(फोटो ओळी)
कोल्हापूर दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांना संविधानग्रंथ देऊन सत्कार करताना शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे, तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे आदी.










