May 14, 2026

बिंदू नामावली रोष्टर पडताळणीस ३१ मार्च पर्यत मुदतवाढ द्या-खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ

0
IMG-20250203-WA0042

बिंदू नामावली रोष्टर पडताळणीस ३१ मार्च पर्यत मुदतवाढ द्या : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी

बिंदू नामावली रोष्टर पडताळणीस ३१ मार्च पर्यत मुदतवाढ द्यावी तसेच रोष्टर तपासणी कारणासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांचे पगार थांबू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने राज्याच्या शिक्षण मंत्री ना.दादा भुसे व शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक ) यांच्याकडे लेखीने निवेदनाद्वारे केली आहे.

पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी शाळांची बिंदू नामावली ( रोस्टर ) फेब्रुवारी अखेर पडताळणी करणे आवश्यक आहे. याबाबतचे शासन स्तरावरून आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच दर तीन वर्षानंतर शाळांची बिंदू नामावली ( रोष्टर ) तपासणी करणे आवश्यक असते. अनेक शिक्षण संस्थांनी वेळोवेळी रोस्टर तपासणी केलेली आहे.पण बऱ्याच खाजगी प्राथमिक संस्थां / शाळांमध्ये शिक्षक भरती नसल्यामुळे किंवा काही संस्थांनी गेले पाच किंवा त्याहून जास्त वर्षात बिंदू नामावली ( रोष्टर ) पडताळणी केलेली नाही.
मा. आयुक्त सो, मागासवर्ग कक्ष, महाराष्ट्र राज्य,पुणे ज्यांचे कडून सदरचे रोस्टर तपासणी /पडताळणी करणे आवश्यक आहे. मागासवर्गकक्षाकडे शिक्षण विभागासह राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील रोस्टर तपासणी प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे दिलेल्या विहित वेळेत रोस्टर तपासणी होऊन पवित्र पोर्टल वर रिक्त पदांची माहिती भरणे यासाठी संस्थांना वेळ होऊ शकतो.
बिंदू नामावली तथा रोस्टर तपासणी किंवा पडताळणी ही पूर्णपणे शिक्षण संस्थेची संबंधित प्रक्रिया आहे. पण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर सदरची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण न केल्यास पगार थांबवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश काही मा.शिक्षणाधिकारीसो यांनी दिले आहेत. ही बाब मुख्याध्यापक व शिक्षकांच्यावर अन्याय करणारी आहे.
बहुतांश खाजगी प्राथमिक शिक्षण संस्था व शाळा या रोस्टर तपासणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून लवकरात लवकर रोस्टर पडताळणी करून घेण्यास कार्यरत आहेत. पण सदरची प्रक्रिया गुंतागुंतीची वेळ खाऊ असल्यामुळे रोस्टर तपासणीसाठी 31 मार्च अखेर संस्था व शाळांना मुदतवाढ देण्यात यावा.
रोस्टर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हा /उपसंचालक विभाग किंवा प्रशासकीय विभागानुसार रोस्टर तपासणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. जेणेकरून रोस्टर तपासणीसाठी पुणे येथे दाखल करणे, त्रुटी पूर्तता करणे इत्यादी बाबींसाठी वारंवार शिक्षण संस्थेचे संस्थापक किंवा शाळेचे मुख्याध्यापक / शिक्षक यांना वारंवार प्रवास करावा लागणार नाही.
     तसेच रोस्टर तपासणी ही पूर्णपणे शिक्षण संस्थेशी संबंधित प्रक्रिया असल्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे वेतन थांबवले जाऊ नये. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे, जिल्हा सचिव नितीन पानारी, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, शहर सचिव रवींद्र नाईक, संदीप डवंग, दत्तात्रय मगदूम, अमित वळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!